भारताचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे यश

१४ वर्षात केले असे काम, आता ठेवले २०३० चे नवीन लक्ष्य

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th December 2023, 05:12 pm
भारताचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे यश

नवी दिल्ली : जगातील विकसित देश होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल झपाट्याने होत आहे. आज जागतिक व्यासपीठांवर भारताचे विचार गांभीर्याने घेतले जातात. भारत ताकदीने आपले म्हणणे मांडतो, कारण भारतातील विकास वेगाने होत आहे, तर जगातील इतर अर्थव्यवस्था मंदीच्या काळात आहेत. अशा स्थितीत भारताने आणखी एक मोठी कामगिरी केली असून जगही भारताकडे चांगल्या नजरेने पाहत आहे.
भारताने १४ वर्षात ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन ३३ टक्क्यांनी कमी करण्याचा पराक्रम केला आहे. हा कालावधी २००५ ते २०१९ दरम्यानचा आहे. एका सरकारी अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) मध्ये निर्धारित लक्ष्यानुसार २०३० पर्यंत ४५ टक्क्यांनी घट केली जाणार आहे. भारत या लक्ष्याच्या अगदी जवळ आला आहे.
अशा प्रकारे यश मिळाले
नवीकरणीय ऊर्जेचे उत्पादन आणि वनक्षेत्रात वाढ झाल्यामुळे हे यश मिळाले आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०१९ पर्यंत वनक्षेत्र २४.५६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या कालावधीत, कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचे योगदान ७५ टक्के वरून ७३ टक्क्यांवर आले आहे.
अहवाल यूएनला करणार सादर
'द थर्ड नॅशनल कम्युनिकेशन टू द युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज' या शीर्षकाचा अहवाल दुबईमध्ये सुरू असलेल्या हवामान शिखर परिषदेदरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल मंडळाला सादर केला जाईल. अहवालात असेही म्हटले आहे की या १४ वर्षांमध्ये भारताचा जीडीपी ७ टक्क्यांच्या एकत्रित वार्षिक विकास दराने वाढला आहे, परंतु या कालावधीत ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन दर वर्षी केवळ ४ टक्के वाढले आहे. पर्यावरणाला हानी न पोहोचवता भारत आपली आर्थिक प्रगती साधण्यात यशस्वी झाल्याचे यावरून दिसून येते. नवीकरणीय ऊर्जेचे उत्पादन आणि वनक्षेत्रात वाढ झाल्यामुळे हे यश मिळाले आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन झपाट्याने झाले कमी 

अहवालात असेही समोर आले आहे की २०१४-१६ दरम्यान ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन वार्षिक १.५ टक्के दराने कमी होत आहे. त्याच वेळी, २०१६-१९ दरम्यान, ते तीन टक्के दराने कमी होऊ लागले. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, भारताने २००५ ते २०१९ दरम्यान जीडीपी उत्सर्जनाची तीव्रता ३३ टक्क्यांनी कमी केली आहे. तसे पाहिले तर जवळपास ११ वर्षांपूर्वी आपण हे ध्येय गाठले आहे. उत्सर्जन कमी होत असले तरी भारतीय अर्थव्यवस्था वाढत आहे.
तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत भारतावर कोळशापासून वीजनिर्मिती केल्याबद्दल विकसित देशांमध्ये टीका होत आहे. आता हे देश यासाठी आमच्यावर दबाव आणू शकणार नाहीत, कारण आम्ही उत्सर्जन कमी करण्यासाठी निश्चित केलेले उद्दिष्ट खूप आधीच गाठत आहोत, असे भूपेंद्र यादव म्हणाले.