इस्रायल-हमास युद्ध, २४ तासांत ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th December 2023, 03:34 pm
इस्रायल-हमास युद्ध, २४ तासांत ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू

तेल अवीव : गेल्या २४ तासांत इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात शेकडो पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायली लष्कराने गाझाचे दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या खान युनिसच्या आसपासचा परिसर रिकामा करण्याचे आदेशही दिले आहेत. अल्-जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, सात दिवसांचा युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सातशेहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

लाल समुद्रात अमेरिकन युद्धनौका, व्यावसायिक जहाजांवर हल्ले

इस्रायल-हमास युद्ध विरामानंतर काल लाल समुद्रात अमेरिकन युद्धनौका आणि अनेक व्यावसायिक जहाजांवर हल्ला करण्यात आला. येमेनच्या हुत्थी बंडखोरांनी दोन जहाजांवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. यमेनच्या हुत्थी बंडखोरांकडून लाल समुद्रात जहाजांवर हल्ले केले जात आहेत. बंडखोर इस्रायलला लक्ष्य करत ड्रोन आणि क्षेपणास्त्रेही डागत आहेत.


इस्रायल-हमास युद्धादरम्यान हा हल्ला एक मोठी घटना मानली जात आहे. पश्चिम आशियातील सागरी हल्ल्यांच्या वाढत्या घटनांकडे याकडे पाहिले जात आहे. हा हल्ला येमेनजवळ झाला असून अद्याप कोणीही त्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
याआधी येमेनच्या हुत्थी बंडखोरांनी लाल समुद्रात एका जहाजाचे अपहरण केले होते. हे जहाज भारतात येत होते. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हुत्थी बंडखोरांनी ते इस्रायली जहाज असल्याचे समजून त्याचे अपहरण केल्याचे बोलले जात होते. येमेनच्या या भागात हुत्थी बंडखोर खूप सक्रिय आहेत. या भागात बंडखोर स्वतःचे सरकार चालवतात. ज्या युद्धनौकेवर हल्ला करण्यात आला ती अमेरिकन नौदलाची अर्ली बर्क क्लास यूएसए कार्नी ही युद्धनौका आहे. यापूर्वी लाल समुद्रात संशयास्पद ड्रोन हल्ला आणि स्फोट झाल्याची भीती ब्रिटिश लष्कराने व्यक्त केली होती.