युनियन कार्बाइड कॉर्पोरेशनच्या अक्षम्य चुकीमुळे तब्बल १६,००० निष्पाप जीवांना आपल्या प्राणास मुकावे लागले
भोपाळ : २ डिसेंबर ते ३ डिसेंबर १९८४ दरम्यान घडलेली भोपाळ वायू दुर्घटना ही जगातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटनांपैकी एक आहे. अवघ्या दोन रात्रीत सुमारे १६,००० लोकांना आपला जीव गमवावा लागला. अमेरिकन फर्म युनियन कार्बाइड कॉर्पोरेशनच्या भारतीय उपकंपनीच्या भोपाळस्थित औद्योगिक प्लांटमधून सुमारे ४५ टन घातक मिथाइल आयसोसायनेट (एमआयसी) वायूच्या गळतीमुळे ही दुर्घटना घडली. विषारी वायूच्या संपर्कात आलेल्या इतरांना श्वसनाच्या समस्या, डोळ्यांची जळजळ किंवा अंधत्व आणि इतर विकृतींचा सामना करावा लागला होता.
मिथाइल आयसोसायनेट या वायुवर प्रक्रिया करून कीटकनाशक बनवले जाते. तपासणी केली असता, असे आढळून आले की प्लांटमध्ये ते चालवण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत आणि अनेक सुरक्षा प्रक्रियांचाही अभाव आहे. याप्रकारच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या दुर्घटनेचे परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागले.
मृतांची संख्या १६,००० पेक्षा जास्त होती. पण, सरकारी आकडेवारीनुसार केवळ ३००० लोकांचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते .
अपघातानंतर युनियन कार्बाइड कॉर्पोरेशनने US$ दशलक्ष भरपाई दिली खरी. पण , त्यासाठी पीडितांच्या नातेवाईकांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागले, त्यानंतर काही दोषींना शिक्षा झाली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी यूसीसीचे अध्यक्ष वॉरन अँडरसन होते. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे त्याला कधीही शिक्षा झाली नाही. मात्र, भोपाळ न्यायालयाने या प्रकरणी कंपनीच्या ७ अधिकाऱ्यांना २ वर्षांच्या कारावासाची नाममात्र शिक्षा सुनावली.
१ फेब्रुवारी १९९२ रोजी भोपाळ न्यायालयाने अँडरसनला फरार घोषित केले. १९९२ आणि २००९ मध्ये दोनदा त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले, परंतु त्याला अटक करता आली नाही. सप्टेंबर २०१४ मध्ये अँडरसनचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला आणि त्यामुळे या प्रकरणात कधीही शिक्षा झाली नाही. तत्कालीन सरकारी यंत्रणेच्या अनास्थेमुळे या दुर्घटनेतील पीडितांना म्हणावं तसा न्याय मिळालाच नाही.