कोलवाळ कारागृहात तंबाखू नेत असताना सुरक्षारक्षकाला पकडले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd December 2023, 11:26 pm
कोलवाळ कारागृहात तंबाखू नेत असताना सुरक्षारक्षकाला पकडले

म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात सुरक्षा रक्षकाकडून तंबाखूजन्य पदार्थ तस्करीचा प्रकार घडला. शिवराम नाईक असे या मानव संसाधन विकास महामंडळाच्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

ही घटना शनिवारी सकाळी १० वा. सुमारास घडली. संशयित सुरक्षारक्षक सकाळी ड्युटीवर जात होता. कारागृहाच्या फाटकावरील आयआरबी पोलीस पथकाने त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या चप्पलमध्ये लपवलेल्या तंबाखूच्या पुड्या सापडल्या. पथकाने त्याला पकडून चौकशी केली असता कारागृहातील कैदी चंद्रकांत तलवार याच्यासाठी हा तंबाखू आणल्याची त्याने कबुली दिली. आयआरबी पथकाने तंबाखू जप्त केला व कारागृह प्रशासनाच्या स्वाधीन केला. कारागृह प्रशासनाकडून शिवराम नाईक व कैदी चंद्रकांत तलवार यांची चौकशी करण्यात आली.

तुरूंग प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कारागृहात तंबाखू तस्करी प्रकरणी एका सुरक्षारक्षकाला पकडल्याच्या माहितीला दुजोरा दिला. सदर सुरक्षारक्षकाविरूद्ध कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

कैद्याच्या सेलमध्ये सापडले दोन मोबाईल

कारागृहात तंबाखू तस्करीचा प्रकार घडल्यानंतर कैदी चंद्रकांत तलवार याला ठेवण्यात आलेल्या सेलची अधिकाऱ्यांनी झडती घेतली. तिथे त्याच्याजवळ दोन मोबाईल सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा