उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

Story: स्वस्थ रहा मस्त रहा |
03rd December 2023, 03:24 am
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

(भाग ३)

भोजनाच्या यज्ञकर्माचा आज शेवटचा भाग आहे आणि या भागात तुम्ही जे वाचणार आहात ते तुमच्यासाठी नवीन असेल त्याचबरोबर आश्चर्यकारक सुद्धा असेल. चला तर मग सुरुवात करुया. 

  • यज्ञामध्ये स्वच्छ आणि उत्तम तीच द्रव्ये वापरली जातात तसंच आपण आहार घेताना सुद्धा ताजे, स्वच्छ पदार्थ घ्यावे. शिळे पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे.
  • शरीरातील सर्व घटक योग्य प्रमाणात निर्माण व्हावे यासाठी आहारात ६ चवींचे पदार्थ असणे आवश्यक आहे. सहा चवी तुम्हाला आठवतात का बघा. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट. हे पदार्थ क्रमाने खावे म्हणजे सुरुवातीला गोड आणि शेवट तुरट पदार्थाने करावी. जसे यज्ञात हवनासाठी वेगवेगळी द्रव्ये क्रमाक्रमाने अर्पण केली जातात. 
  • काही जण फक्त दूध भात किंवा दही भात जेवतात, काहींना नेहमी गोड खायला आवडतं, काहींना झणझणीत तिखट पदार्थंच आवडतात तर काहींना चपाती बरोबर आंबट तिखट लोणचंच पाहिजे असतं. कडू - तुरट चवी तर आपल्या गावी नाहीतच बरोबर??  पण या चवी सुद्धा आवश्यक आहेत. आवळा, हळद, मेथी, कारले, जांभूळ हे कडू, तुरट पदार्थ खूप थोड्या प्रमाणात रोज खावे. भात, आमटी, तूप, भाजी, कोशिंबीर, लोणचं, चटणी असे पदार्थ आपण सेवन करावे.
  • स्वीट डिश नेहमी जेवल्यानंतर आपण खातो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की गोड पदार्थ हे पचायला कठीण असतात म्हणून ते नेहमी जेवणाच्या सुरुवातीला खावे. शेवटी खाल्ल्यास पोट जड होते, फुगते आणि ते अर्धवट पचवले जातात. म्हणून आजपासून स्वीट डिश जेवणाआधी खाण्यास सुरुवात कराल ना?
  • जेवढी भूक असेल तेवढं जेवावं कारण खूप कमी जेवल्यास ताकद वाढणार नाही आणि खूप जास्त जेवल्यास पचन होणार नाही, पोट टम्म फुगेल आणि झोप येईल. 
  • खूप फास्ट फास्ट जेवू नये आणि हळूहळू रेंगाळत सुद्धा जेवू नये. जेवताना मिडीयम स्पीड ठेवावी.
  • जेवणानंतर पोटाला जेवण पचवायला थोडी विश्रांती द्यावी. लगेच धावणे, चालणे, खेळणे, झोपणे या क्रिया करू नये. शक्यतो वज्रासनात बसावे म्हणजे जेवण नीट पचेल. 
  • पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर जेवण्याची पद्धत आणि आपण आता पर्यंत बघितलेले सर्व नियम सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींनाही सांगा.

  • वैद्य कृपा नाईक