रेड मूनच्या साक्षीने सांगता

काही वेळाने तो रेंगाळणारा अवाढव्य ढग पूर्णपणे बाजूला झाला नि आम्हाला चंद्र दिसला. ती रात्र आम्ही जुन्या भरीव सोन्याला कढवून केलेल्या गोळ्याप्रमाणे दिसणारा चंद्र बघत घालवली. हळूहळू चंद्राचा रंग बदलला. त्याचं शीतल चांदणं नेहमीसारखं स्वच्छ शुभ्र झालं आणि त्या संथ सोनप्रकाशात न्हाऊन आम्ही आमच्या जॉर्डनच्या दौऱ्याची सांगता केली.

Story: प्रवास |
03rd December 2023, 03:09 am
रेड मूनच्या साक्षीने सांगता

आम्हाला डेड सीला टेकून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुंदर रूम मिळाला होता. एका बाजूला मृत समुद्र दिसत होता. दुसऱ्या बाजूला दूरचे डोंगर. इंटरनेटवरच्या माहितीप्रमाणे आज रात्री खास “रेड मून” दिसणार होता. त्यामुळे मी या रूमच्या गॅलरीच्या अवाढव्य स्पॅनवर भारी खूश होते. आज पौर्णिमा होती, चंद्र ग्रहणही होतं. रेड मून म्हणजे पृथ्वीच्या छायेत लपलेला आणि पृथ्वीच्या वातावरणरूपी पदरातून प्रथम फिल्टर केलेला प्रकाश प्रतिबिंबित करणारा चांदोबा. हा तांबूस दिसतो म्हणून तो रेड मून. अनेकदा याला ‘ब्लड मून’ म्हणूनही ओळखलं जातं. आणि आज तो आम्हाला एकूण १५ मिनिटांसाठी दिसणार होता. पण चंद्रोदय व्हायला अजून खूप वेळ बाकी होता. 

दुपारी जेवून झाल्यावर काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही डेड सी पर्यंत चालत जायचं ठरवलं. या कामाकरता हॉटेलची खास बस सर्व्हिस होती. पण ती न घेता आम्ही चाललो. समुद्र, रूममधून पाहताना जवळ वाटला होता. पण तिथपर्यंत पायी पोहोचायला आम्हाला निदान दहा मिनिटं तरी लागली असावीत. इथे माश्या मात्र फार! का कोणास ठाऊक? सतत आपलं गाणं गुणगुणत गुणगुणत आमच्या अंगाची सवारी करण्याच्या बेतात. हा परिसर स्वच्छ होता, पण कदाचित हवेतल्या क्षारामुळे त्यांना इथली ओढ? असो, पण त्यांचा त्रास होत होता. हळूहळू संध्याकाळचा वारा सुरू झाला आणि त्या माशांनी आमची पाठ सोडली आणि आमचा डेड सीचा अनुभव अजूनही चांगला झाला. 

आदित्य सोडला तर आम्ही कोणच आज पाण्यात उतरलो नाही. याचं कारण असं की, एरव्ही संथ वाटणाऱ्या या समुद्राच्या आज लाटांवर लाटा येत होत्या. मी आदित्यला म्हटलं देखील, “या पाण्यात जाऊन तरंगण्याचा अनुभव मिळणार तरी कसा?” पण तरीही तो गेला. इथे मी नि अद्वैत स्विमिंग पूलच्या दिशेने निघालो. अद्वैतला स्विमिंग पूलची भारी हौस. त्यामुळे त्याला त्या पाण्यात डुंबूदेत थोडा वेळ म्हणून मी त्याला नेलं. 

अद्वैत बरोबर असल्याने आम्ही लहान मुलांच्या स्विमिंग पूलमध्ये उतरलो. तिथे मला कंबरेएवढं देखील पाणी नव्हतं बसून पूर्ण बुडून राहायला. आणि पाण्यावरती तर वारा झोंबत होता. स्विमिंगची ही एक मजा आहे. पाण्याखालच्या शरीराला त्या मानाने गरमी मिळते. पृष्ठभागावरचं शरीर मात्र कुडकुडतं. नोव्हेंबरमध्ये, म्हणजे हिवाळ्यात जॉर्डनला गेलो असल्याने आम्हाला ९/१० डिग्री इतक्या तापमानात हे स्टंट बालहट्टापाई करावे लागत होते. असो. त्याने फार एन्जॉय केलं. आणि मलाही मग सवय झाली त्या थंडीची. 

काही वेळाने हे तिघे परतले. आदित्यचा एक डोळा लाल झाला होता. डेड सीचं ते मिठाचे concentrated पाणी त्याच्या डोळ्यात गेले होते. डोळे धुवायला जवळ पाणी नाही. मग तसाच बाहेर आला. ती आग आग सहन करत. बघून भीती वाटेल इतके डोळे लालेलाल. मी ती अवस्था पाहून माझ्या डोक्यावर हात मारला. त्याचंही बरोबर. हातालाही ते खारं पाणी लागलेलं असल्याने डोळे चोळायलाही मिळाले नाहीत बापड्याला. पण तिथे पूलपाशी शॉवर्स होते. त्यांचा वापर करून त्याने डोळे साफ केले आणि मग आम्ही रूमवर परतलो. 

आंघोळ बिंघोळ उरकून आम्ही लवकर जेवणं आटोपली. चंद्रही पहायचा होता. रेड मून म्हणतात तो काय हे बघायला पटपट जेवून मी सांगितलेल्या वेळेवर गॅलरीत गेलो. एका बाजूने फक्त लालसर ढग दिसले. मी बसून राहिले, हे ढग सरतील आणि मला रेड मून दिसेल. पण ते सरता सारेनात. हळूहळू प्रवास सुरू होता त्यांचा. ग्रहणाची फक्त १५ मिनिटं सांगितली होती. त्यामुळे मी घाबरले. दिसला नाही तर चंद्र? पण काही वेळाने तो रेंगाळणारा अवाढव्य ढग पूर्णपणे बाजूला झाला नि आम्हाला चंद्र दिसला. ती रात्र आम्ही जुन्या भरीव सोन्याला कढवून केलेल्या गोळ्याप्रमाणे दिसणारा चंद्र बघत घालवली. हळूहळू चंद्राचा रंग बदलला. त्याचं शीतल चांदणं नेहमीसारखं स्वच्छ शुभ्र झालं आणि त्या संथ सोनप्रकाशात न्हाऊन आम्ही आमच्या जॉर्डनच्या दौऱ्याची सांगता केली.


भक्ती सरदेसाई