पेडणे ते काणकाेणपर्यंत पसरलेल्या आपल्या गोव्यात अनेक मंदिरे आहेत. त्यातील बहुतेक मंदिरांमधून त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी मंदिरामधून दिव्यांची आरास पहावयास मिळते. दिपराधना, खांबपौर्णिमा, दिवजाेत्सव अशा विविध पद्धतीने मंदिराच्या परिसरात लक्ष-लक्ष दिवे उजळले जातात. या निमित्ताने मंदिरात चार-पाच दिवस उत्सवांचेही आयोजन असते. देवाला निरनिराळ्या आसनात बसवून प्राकारात मिरवणूक काढतात. नौका विहाराचा कार्यक्रम असतो. केळीच्या गभ्यावर वाती, कापूर पेटवून पाण्यात सोडतात. त्रिपुरी हा शिवशंकराचा उत्सव ब्रम्हदेवाकडून मिळवलेल्या वराने उन्मत्त झालेल्या त्रिपूरासूर दैत्याने वराचा सदुपयोग करण्याचे सोडून देव देवताना सळाे की पळाे करून सोडले. शेवटी सर्व देवांनी शंकराची आराधना करून संकटमुक्त करण्याची विनंती केली तेव्हा श्री शंकरानी त्रिपुरासुराचा वध करून सर्वांना संकटमुक्त केले. हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता त्यामुळे शिव-शंकराना ‘त्रिपुरारी’ असे ही म्हणतात. त्रिपुरासुराच्या वधाने हर्षभरीत झालेल्या सर्वांनी ठिकठिकाणी दीप प्रज्वलन करून हा आनंदोत्सव साजरा केला.
आपले सण उत्सव हे असुरांच्या निर्दालनाचे व पराक्रमाच्या पूजनाचे द्योतक आहेत. जालंधराच्या वधाचा उत्सव श्री भगवान विष्णुच्या तुलसी विवाहाने, तर त्रिपुरासुर दैत्याच्या वधाचा उत्सव त्रिपुरारी पाैर्णिमेला दीप पेटवून साजरा करण्याची प्रथा आहे.
विठ्ठलापूर-साखळी येथील वाळवंटी नदीच्या पात्रात तरंगत्या रंगमंचावर दशावतारी कलाकार 'त्रिपुरासुराचा वध' सादर करून त्रिपुरासुराच्या प्रतिकृतीचा बाण मारुन वध करतात. दारूकामाची आतषबाजी होते. पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात विहार करणाऱ्या एकापेक्षा एक सरस-आकर्षक नौकांनी वाळवंटीचे पात्र खुलून जाते.
यावेळी सुहासिनींनी वाळवंटीच्या पात्रात सोडलेल्या दीपांमुळे त्या वेगळ्या वातावरणात एक आगळी वेगळी शोभा अनुभवण्यास मिळते. बोरी फोंडा येथील मंदिरात का. शु. त्रयोदशीपासून नवदुर्गेच्या उत्सवास प्रारंभ होतो. त्रयोदशीच्या दिवशी आवळी भोजनाचा कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी देवीची नौकेतून मिरवणूक काढतात. त्रिपूरी पौर्णिमेच्या दिवशी सुहासिनींचा दिवजोत्सव साजरा करतात. श्री नवदुर्गा देवीला विधिवत अभिषेक, पूजा-अर्चा, पंचायतन देवतांची पूजाअर्चा झाल्यानंतर श्री देवीचे तरंग सजवतात. अवसरी तरंग तळयेवाडा-बोरी येथील श्री नारायण देवाच्या मंदिरात जाते. त्या ठिकाणी पारंपरिक विधी झाल्यानंतर तरंगाचे पुनश्च मंदिरात आगमन होते. सर्वांना कौल देण्यात येताे. यावेळी कौल घेण्यासाठी भाविक गर्दी करतात.
म्हार्दाेळ येथील महालसा नारायणी मंदिरात आवळी भोजनाचा कार्यक्रम असतो. त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिर परिसरांत एक लाख वाती पेटवण्याचा संकल्प असल्याने व एवढ्या पणत्या पेटवणे शक्य नसल्याने वाती आरतीत घालून देवीची ओवाळणी करतात. प्रत्येक आरतीच्यावेळी ३३ हजार वाती पेटवतात. दुपारी, रात्री व दुसऱ्या दिवशी दुपारी अशा पद्धतीने ओवाळणी करतात. मंदिर परिसरात, पाच हजार पणत्यांची आरास पहावयास मिळते. अशाप्रकारे प्रत्येक मंदिरातून दिव्यांची आरास करून त्रिपुरारी पौर्णिमचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात.
पिरोज नाईक