नांदा सौख्यभरे

Story: समुपदेशन |
01st December 2023, 10:28 pm
नांदा सौख्यभरे

मला सकाळी सकाळी पणजी बाजारात भाज्या, मासे घ्यायला आवडतं. त्याचं एक कारण म्हणजे सकाळी पणजीच्या आजूबाजूच्या भागातील शेतकरी बायका ताज्या भाज्या इथे विक्रीसाठी आणतात. रापणीचे, मानशीवरचे, फुटणीचे रुचकर मासेही या वेळी मिळतात. दुसरी माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे, या विक्रेत्या बायकांशी भाजी खरेदी करताना गप्पा मारणे. त्यांच्याशी आता जणू एक ऋणानुबंधच जोडला आहे. 

अशीच तुळशी विवाहाच्या आदल्या दिवशी मी बाजारात गेले होते. "बाय नवरो व्हर" अशी हाक पावलोपावली ऐकू येत होती.  गोव्यात दिण्याची काठी, ऊस, आवळा आणि चिंचेची फांदी एकत्र बांधून तुळशीत तो लावला जातो. यालाच नवरा म्हणतात. बाय नवरो व्हर म्हणजे 'ही दिण्याची काठी घेऊन जा' असा तो अर्थ होता.

 मी भाज्या घेऊन घरी आले. दिण्याची काठी 'नवरा' घेतला नाही. कारण सुदैवाने माझं सासर निसर्गसंपन्न अश्या बार्देश तालुक्यातील नादोडा गावात आहे त्यामुळे ही साधन सामग्री आमच्या घराच्या आजूबाजूला मिळते. कारण तिथे निसर्ग अजूनही जपला जातो आणि तिथे त्याची खऱ्या अर्थाने पूजाही होते. गोव्यात तुळशी विवाहानंतर लग्नाची लगबग सुरु होते.

आमच्या घरीही तुळशी विवाह संपन्न झाला. घरात एका नातेवाईकाच्या लग्नाची लगबग चालू होती. गावातल्या लग्नाची आमंत्रणंही येत होती. “मनात मात्र बाय नवरो व्हर” ही हाक मात्र मनात घोळत होती. एरवी ही हाक तशी कुणाला खुणावणारी नाही की एवढी फार लक्षात ठेवण्या जोगीही नाही. पण माझ्यातला समुपदेशक या वाक्याचा वेगळा अर्थ लावत होता. लग्नासारख्या एका पवित्र  ऋणानुबंधाला आलेले व्यावसायिक स्वरूप पाहून मन बेचैन होत होते. माझे हे विधान पटत नसेल तर एखाद्या लग्नाची बोलणी चालत असलेल्या घरात बसा, नुसतं साड्यांच्या दुकानात बसलात तरी माझं हे वाक्य बऱ्यापैकी पटेल. एखादं लग्न ठरलं म्हणजे वधू-वरांची माहिती मिळवण्याचं काम एखाद्या उमेदी पाहुण्याकडे सोपवलं जातं. ती माहिती मनाजोगी मिळाली की लग्न ठरतं. वधू-वराचे वार्षिक उत्पन्न आणि आर्थिक परिस्थिती, कुळ ही सर्वात पहिली विचारली जाणारी प्रमुख माहिती. तेवढयावरच बरीचशी लग्नं ठरतात. काही मंडळी स्वभाव, व्यसन अशा बाबी चाचपडून बघतात, काही लग्नानंतर सगळं होईल ठीक म्हणून काही महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्षही करतात.

एकदा पसंती कळवली की, मग बोलणी करण्याचा असा एक कार्यक्रम असतो. लग्न वधु-वर सूचक मंडळातून ठरवलेले असो की प्रेमविवाह असो, हा बोलणी करण्याचा कार्यक्रम होतोच. इथे मग नात्याला लागते ती देवाण-घेवाणीची दृष्ट. आम्ही चार बांगड्या, पिचोडी, तोडा सगळे दागिने केलेले आहेत तुम्ही बाजूबंद तरी घातलाच पाहिजे अशी वधूपक्षाकडून एक मामी/काकी हळूच सूर लावते. तसे तिला वधूपक्षाकडून आधीच ट्रेनिंग मिळालेले असते. वर पक्षातही मग एखादे अण्णा, भावजी चढ्या आवाजात सांगतात, “एका तोळ्याची चेन आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी आणि पाच परतवण हवेच, त्यावेळी मग एकदा दागिना नाहीतर वॉशिंग मशीन वैगरे द्या तुम्ही. आम्ही पाच ओट्या भरणार तुम्ही सात तरी भरल्या पाहिजेत.” ही अशी बोलणी कानी आली की वाटतं हा सौदा पुढे महागातच पडणार. कारण वरपक्ष आणि वधूपक्षाकडून सुरु झालेली ही हमरी-तुमरी नवरा बायकोच्या नात्यातही विष कालवते. अगदी तो प्रेमविवाह असला तरी.

लग्नानंतर पहिल्या वेळी घरी आलेल्या मुलीला आपल्याला साधी साडी देऊन आपला अपमान केला म्हणून जेव्हा मुलीची आई डोळ्याला पदर लावते त्यावेळी ही नवरी मुलगी द्वेषाची ठिणगी घेऊनच सासरी जाते. नातेवाईकातला ‘तुमचं आणि आमचं’ वाद नव्या नवलाईच्या नात्याला नकळत पोखरू लागतो. “डेकोरेशन काय तुमी बेकार केलं! एक साधा सेल्फी स्टॅन्ड पण तुम्हाला ठेवता आला नाही” असं नववधु बोलली की तो लगेच म्हणतो, “हो तर तुमचा तो केटरर काय थर्ड क्लास जेवण घेऊन आला! आमच्या अर्ध्या पाहुण्यांना जिलेबी मिळालीच नाही. लाईव्ह काउंटर लावून शो ऑफ नुसता.” ही भूणभूण मग वाढत जाते.

चतुर्थीला मोठ्या दोनशे करंज्या, चांदीने मढवलेला पाट दिलाच पाहिजे. तुमचे पाहुणे आमच्याकडे येऊन आमच्या नातेवाईकांना बोलून जातात अशी वादाची सुरुवात होते. नात्यात कटुता येऊ लागते. मग लेक दर दोन दिवसांनी माहेरी जायला लागते, नव्या संसारात रमायचं सोडून नवराही मग दोस्तांना आई आणि बायकोने दोन्ही बाजूने वाजवून आपला कसा ढोल केला आहे हे सांगत, दुःख विसरायला एक-दोन पेग रिचवून घरी येतो. लाखो रुपये आणि काहींच्या ऐपतीप्रमाणे किंवा ऐपतीपेक्षा जास्त खर्च करून केलेला हा सौदा हा घाट्याचा ठरला असं वाटायला लागतं. नाती दुरावतात आणि काही बाबतीत तर अवघ्या काही महिन्यातच पटत नाही तर आत्ताचं मोकळे व्हा. पुढे मुलाबाळाची भानगड नको अशा चर्चा करायला पुन्हा आत्या, मामा, मावश्या जमू लागतात आणि पुन्हा सुरु होतात बोलणी! “आमचं आम्हाला परत द्या अन् नुकसान भरपाईही.” परग्रहावर जर कुठे लोकवस्ती असेल आणि त्यांना हे सगळं दिसत किंवा ऐकू जात असेल तर त्यांना हा नक्की बाजाराचं वाटेल.

ऐन लग्न सराईत एवढं कटू बोलते आणि दूषण लावते असं अनेकांना वाटेल. या रीतीभाती कराव्याच लागतात असे अनेक जण म्हणतील. मात्र हे सगळं मांडण्याचा अट्टाहास एवढ्यासाठीच करत आहे की दर दिवशी विभक्त होण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जाचा वाढणारा आकडा, शारीरिक आणि मानसिक छळाच्या नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारींचा आकडा,  उद्याच्या कुटुंब व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतो. ज्या तरुणांच्या मनावर याचा वाईट परिणाम झाला आहे, त्यांचा तर लग्न संस्थेवरचा विश्वास कमी होताना दिसत आहे. अजूनही जेव्हा हुंडाबळी, अत्याचार, एकमेकांच्या जीवावर उठणे, मरणे किंवा मारणे अशा कुटुंब संस्थेच्या चिंधड्या उडताना पहिले की वाटते हेच का ते कलियुग विनाशाकडे घेऊन जाणारे? आई-बाबा पुरतं बोलायलाही न येणारे बाळ कोणाकडे राहणार असे खटले लढणारे आणि लढवणाऱ्यांच्या यातना तेच जाणतील. त्या बाळावरही कालांतराने या गोष्टीचा परिणाम दिसून येतो आणि पुढे चालत राहत हे वेदनाचक्र.

 हा बाजार थांबला पाहिजे. जन्मभराची लग्नगाठ बांधून घेताना डोळसपणे विचार करणे आवश्यक आहे. एका नव्या नात्याची सुरुवात करताना आधी बोलणी झाली पाहिजेत ती दोन माणसांच्या स्वभावाची, गुण, दोषांची. देवाणघेवाण व्हायला हवी ती मायेची, आपलेपणाची. तुमची नवरी आणि आमचा नवरा हा वाद सुरु करून डाव डाव मांडण्यापूर्वी विस्कटून टाकायला हा काही भातुकलीचा खेळ नव्हे हे समाजतल्या प्रत्येकाने ध्यानी ठेवलं पाहिजे. खास करून वधूवरांच्या कुटुंबीयांनी, लग्न ठरवणाऱ्यांनी आणि लग्नाची बोलणी करायला जाणाऱ्यांनी. लग्नाच्या बोलणीत सांगा ना त्यांना तुमच्या २०/२५ वर्षातील सुखी संसरचे रहस्य. बायको रुसली तेव्हा तुम्ही कशी तिची समजूत काढली, तुमच्या तुटपुंज्या पगारातही राजाराणीचा संसार फुलावताना नेमकी तिने काय जादू केली. चार मुलं, दीर जावा, नणंदा  यांच्याशी जुळवत घेऊन कसं तिने सासर-माहेर जपलं. तिच्या माहेरच्यांच्या कठीण प्रसंगी धावून आलेला तो, तिला कसा जास्त प्रिय झाला हे गूढ येऊ द्या ना ओठावर. 

या स्पर्धात्मक युगात चौकोनी कुटुंबातील युवापिढीला आपण सगळ्यासाठी तयार करतो. बोर्डाची परीक्षा, स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक शिक्षण या सगळ्यासाठी त्यांना आपण उत्तमोत्तम मार्गदर्शन देतो कारण त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी यशस्वी व्हावं म्हणून. मग आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरच त्यांना असं न शिकवता, तयारी न करून घेता, योग्य मार्गदर्शन न करता पाठवून त्यांचा कडेलोट करणे अयोग्य नाही का? दोष कुणाचा, ही व्यक्ती त्या व्यक्तीसाठी कशी अयोग्य होती या टप्प्यावर जर यायचं नसेल तर आपल्या पाल्ल्यांना उत्तम कुटुंबव्यवस्था घडवण्याचे आणि ती जपण्याचे धडे देणे खरंच गरजेचे आहे. याचा विचार समाजाच्या सगळ्या घटकांनी करायची आवश्यकता आहे. या पुढे आपल्या आप्त इष्टांच्या लग्नात महागडा आहेर देण्यापेक्षा लाखमोलाचा आशीर्वाद आणि सुखी संसाराची गुरुकिल्ली देण्यास प्राधान्य द्या. त्या नवदाम्पत्याला नांदा सौख्यभरे हा आशीर्वाद देताना त्या आशीर्वादाचा अर्थ नक्की सांगा. हीच त्यांना अमूल्य भेट ठरेल आणि उद्याच्या सुजाण, सक्षम समाज व्यवस्थेचा तो पायाही ठरेल.  

सुलक्षा मनेश गावस