जमीन हडपप्रकरणी त्रिकुटाला पुन्हा अटक

एसआयटीची कारवाई : वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली सुहैल, रॉयसन, इस्टिवन डिसोझा अटकेत

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st December 2023, 12:20 am
जमीन हडपप्रकरणी त्रिकुटाला पुन्हा अटक

पणजी : जमीन हडप प्रकरणी विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) संशयित मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस या मुख्य सूत्रधाराला नवव्यांदा अटक केली आहे. त्याच्यासह एसआयटीने वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली राॅयसन राॅड्रिग्ज आणि इस्टिवन डिसोझा या संशयितांना अटक केली आहे.

या प्रकरणी मुंबईस्थित मार्क लोबो यांनी म्हापसा पोलीस स्थानकात प्रथम तक्रार केली होती. त्यानुसार, आसगाव-बार्देश येथील सर्व्हे क्र. २२३/८ मधील जमीन हडप केल्याचे म्हटले आहे. त्यात संशयित दामोदर यशवंत सिनाई काकोडकर, गुलाब सिनाई काकोडकर, अमृत गोविंद गोवेकर आणि इतर अज्ञात व्यक्तींनी तक्रारदारांचे बनावट विक्रीपत्र (सेल डीड) तयार केल्याचे म्हटले होते. त्यानंतर संशयितांनी बनावट वारसदार प्रमाणपत्र (सक्सेशन डिड) तयार करून बार्देश मामलेदारांकडून म्युटेशन करून जमीन विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले होते. याची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी वरील संशयितांसह इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सरकारने एसआयटी स्थापन केल्यानंतर ही तक्रार पोलिसांनी एसआयटीकडे वर्ग केली होती. या प्रकरणी एसआयटीने अमृत गोवेकर आणि राजकुमार मैथी या दोघांना अटक केली होती. याच प्रकरणी एसआयटीने संशयित मोहम्मद सुहैल या मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. याप्रकरणाची पुढील चौकशी उपनिरीक्षक योगेद्र गारुडी करत आहे.

दरम्यान दुसऱ्या एका प्रकरणात एसआयटीने संशयित राॅयसन राॅड्रिग्ज याला अटक केली आहे. या प्रकरणाची तक्रार नाईकवाडा-कळंगुट येथील डेब्रा मास्कारेन्हास यांनी केली होती. त्यानुसार १० जुलै २०२२ पूर्वी तक्रारदारांच्या पूर्वजांची कळंगुट येथील सर्व्हे क्र. २५/२ मधील २,१५० चौ.मी. आणि सर्व्हे क्र. २४/५ मधील ६७५ चौ.मी. जमिनीचे बनावट वारसदार प्रमाणपत्र व इतर दस्तावेज तयार करून तसेच षडयंत्र रचून मालमत्तेचे हस्तांतरण करून घेतल्याचे म्हटले. याची दखल घेऊन एसआयटीने संशयित सेड्रिक फर्नांडिस याच्यासह अँटोनेटे ऊर्फ अँटोनिटा फर्नांडिस आणि मारिया अँजेला ऊर्फ अँजेलिका फर्नांडिस व इतर संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर एसआयटीने मुख्य सूत्रधार महंमद सुहैल उर्फ मायकल, सेड्रिक फर्नांडिस, ओमकार पालयेकर या संशयितांना अटक केली होती. आता एसआयटीने राॅयसन राॅड्रिग्ज याला अटक केली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी उपनिरीक्षक योगेश गडकर करत आहे.

तर तिसऱ्या प्रकरणात एसआयटीने संशयित इस्टिवन डिसोझा याला अटक केली आहे. या प्रकरणाची पॅट्रिसिया डी डिसोझा यांच्यातर्फे प्रदीप हरमलकर यांनी एसआयटीकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल ऊर्फ मायकल, इस्टिवन डिसोझा, मारिया रोझा डिसोझा ई गोम्स, अनिल गोयल, अमन ची व इतरांनी गुन्हेगारी कट रचून हणजूण येथील सर्व्हे क्र. ५३८/५ व ५३७/१२ च्या ९ मे २०१२ पूर्वी जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर विक्रीपत्र उपनिबंधक कार्यालयात नोंद करून तक्रारदारांच्या पूर्वजांची जमीन हडप करून फसवणूक केल्याचे म्हटले. या प्रकरणी एसआयटीने संशयित इस्टिवन डिसोझा याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रीतेश मडगावकर तपास करीत आहेत.