भारतीय सिनेमा म्हणून भारतातील सर्व चांगल्या सिनेमांकडे पाहण्याची दूरदृष्टी ठेवावी लागेल आणि भारतासह जगभरातील चांगल्या सिनेमांना, त्यातील तंत्रज्ञांना, कलाकारांना लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. जागतिक सिनेमाला व्यासपीठ देणे, हा एकच हेतू इफ्फीच्या आयोजनामागे असायला हवा.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. गेले नऊ दिवस गोव्यात सुरू असलेल्या सिने उत्सवाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली छाप सोडली. ७८ देशांचे ८५ भाषांमधील २५० सिनेमे या महोत्सवात दाखवले गेले. भारतीय सिनेमा क्षेत्रासह जगभरातील चांगले तंत्रज्ञ, कलाकार आमंत्रित करून इफ्फीला वैश्विक करण्याचा प्रयत्न होत आहे. याला काही गोष्टी अपवाद आहेत. गोव्यात गेल्या वीसेक वर्षांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाने गोव्यात आपले कायमस्वरुपी स्थान पक्के केलेच, शिवाय पाहुणचारात गोवा अग्रेसर राहिल्याचे इतक्या वर्षांतील आयोजनातून गोव्याने सिद्ध केले. या महोत्सवात जगभरातून सिनेमा तज्ज्ञांना आमंत्रित करून गोव्यातील कलाकारांना व्यासपीठ देण्याचा एक प्रयत्न राज्य सरकारकडून महोत्सवाच्या काळात समांतरपणे व्हायला हवा. ३५ व्या महोत्सवापासून गोव्यात इफ्फी सुरू झाला. यंदा ५४ वा चित्रपट महोत्सव होता. दरवेळी गोव्याने पूर्ण जोर लावून महोत्सवाचे आयोजन केले. १९५२ साली सुरू झालेला हा महोत्सव त्यानंतर काही वर्षांच्या अंतराने वेगवेगळ्या शहरांमध्ये झाला. २००३ मध्ये गोव्यात महोत्सव भरवण्याचे निश्चित झाल्यानंतर २००४ पासून आतापर्यंत सलगपणे इफ्फीचे गोव्यात आयोजन होत आहे. इफ्फीसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या साधनसुविधांमध्ये गोवा मागे राहिलेला नाही. चित्रपट महोत्सवाचे सगळे कार्यक्रम एकाच ठिकाणी करण्यासाठी कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचे एक काम वगळता इतर सगळे प्रयत्न गोव्याने केले आहेत. जगभरातून हजारो प्रतिनिधी इफ्फीच्या निमित्ताने आठ दहा दिवस गोव्यात रहायला येतात. या महोत्सवामुळे पर्यटनाच्या दृष्टीने गोव्याचे नावही आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असते. गोव्यात आलेले चित्रपट क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकार आणि चित्रपटांच्या ओढीने आलेले सर्व प्रतिनिधी गोव्यातील चांगल्या आठवणी घेऊन जात असतील, यात शंका नाही.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच वैश्विक पातळीवर वेगवेगळ्या भाषांमधून तयार झालेल्या चित्रपटांसाठी होत असलेला जगातील काही महत्त्वाच्या महोत्सवांपैकी एक. गोवा चित्रपट निर्मितीत मागे असले तरी आयोजन आणि निर्मितीचा तसा संबंध लावण्याची गरज नाही. इतक्या वर्षांमध्ये चांगले आयोजन करण्यात गोव्याने कुठलीही कसर सोडलेली नाही, हे विशेष. मास्टर क्लाससोबतच इन-कन्व्हर्सेशनसारख्या सत्रांनी इफ्फीचा दर्जा आणखी वाढवला आहे. मात्र हिंदी सिनेमाभोवतीच महोत्सव ठेवण्याचा सोस टाळणे गरजेचे आहे. हिंदी सिनेमाने तयार केलेले कलाकारांचे ग्लॅमर विश्व हे इफ्फीला चर्चेत ठेवण्यासाठी फायद्याचे ठरत असेल, पण जागतिक सिनेमा आणि त्या सिनेमांतील कलाकारांना हा महोत्सव आपला वाटण्यासाठी त्याचा वापर व्हायला हवा. हिंदी सिनेमाच म्हणजे भारतीय सिनेमा, असा जो काहीजणांचा समज आहे आणि हिंदी सिनेमाभोवतीच काहीवेळा महोत्सवाचे स्वरूप फिरत राहते, हे टाळायला हवे. गंभीर प्रेक्षक महोत्सवाकडे कसा आकर्षित होईल, ते पाहण्याचे सोडून हिंदीतल्या सिने तारे, तारकांना पाहण्यासाठी झुंबड उडते हे काहीसे विचित्र आहे.
वेगवेगळ्या भाषांमधून तयार होणारे चित्रपट पाहून जे प्रेक्षक महोत्सवाचा आनंद लुटतात, ते खरे सिने रसिक आहेत. अशा गंभीर प्रेक्षकांसाठी वैचारिक खाद्य देणारा हा महोत्सव कधी कधी हिंदीवाल्यांसाठीच आहे की काय, असे वाटायला लागते. भारतीय सिनेमाला मागील काही वर्षांमध्ये घरघर लावणाऱ्या दाक्षिणात्या सिने क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची जाणीव सर्वांनाच व्हायला हवी आणि विशेष करून आयोजकांना. कन्नड, तेलगू, मल्याळम, तामीळ सिनेमा हा भारतीय सिने क्षेत्रात आता आघाडीवर आहे. त्यामुळे तिथल्या चांगल्या सिनेमांसह कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. बहुतांश ठिकाणी हिंदीतील कलाकारांनीच इफ्फीच्या सगळ्या व्यासपीठांना व्यापून ठेवले आहे की काय, असे महोत्सवाच्या काळात दिसत होते. हिंदी सिनेमाचा प्रेक्षकवर्ग जरी मोठा असला तरी गेल्या काही वर्षांमध्ये इतर भारतीय भाषांमधून चांगले दर्जेदार सिनेमे येत आहेत याची जाणीव ठेवायला हवी. कदाचित हिंदीकडून जो प्रेक्षक गेल्या काही वर्षांमध्ये दुसऱ्या भाषांमधील सिनेमांकडे आकर्षिक होत आहे, त्याची जाणीव असल्यामुळे महोत्सवातील कार्यक्रमांमध्ये हिंदीतील कलाकारांकडून रसिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असतो, असे दिसत होते. भारतीय सिनेमा म्हणून भारतातील सर्व चांगल्या सिनेमांकडे पाहण्याची दूरदृष्टी ठेवावी लागेल आणि भारतासह जगभरातील चांगल्या सिनेमांना, त्यातील तंत्रज्ञांना, कलाकारांना लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. जागतिक सिनेमाला व्यासपीठ देणे, हा एकच हेतू इफ्फीच्या आयोजनामागे असायला हवा.