तुला शिकवीन चांगलाच धडा !

मुलांना चांगले वळण लागावे यासाठी काय करता येईल, त्याचा विचार पालकांनी गांभीर्याने करावा. तक्रारी, गुन्हे दाखल करून फक्त 'तुला चांगला धडा शिकवला' एवढेच समाधान असेल त्यापेक्षा मूल थोडे चांगल्या वळणाचे व्हावे, यावर लक्ष दिले तर आयुष्यभराचे समाधानही मिळू शकते. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही वृत्ती थोडी बदलण्याची वेळ आली आहे.

Story: संपादकीय |
29th November 2023, 01:05 am
तुला शिकवीन चांगलाच धडा !

सर्वांना कुठे तरी जायची घाई आहे. 'तू मला ओळखत नाहीस. थांब तुला शिकवतो,' असे म्हणून प्रत्येकाला धडा शिकवण्याच्या नादात आम्ही माणुसकी आणि सहिष्णुता घालवून बसत आहोत. यातून एकमेकांच्या विरोधात तक्रारी करणे, खटले गुदरणे, लगेच हातघाईवर येणे यातच काहींना समाधान वाटते. ज्या गोष्टी चर्चेतून सुटू शकतात, चर्चेतून तोडगा येऊ शकतो, त्या गोष्टी तुला धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाही असे म्हणून आव्हान देत सगळेच काळाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहेत. धडा शिकवण्याच्या कामातून कोणाला सवड मिळत नाही. शिक्षकांनी शिस्तीसाठी विद्यार्थ्यांना थोडे आवाज चढवून बोलले तरीही तो गुन्हा ठरवून शिक्षकांना तुरुंगात टाकण्याचे आटोकाट प्रयत्न केले जातात. एखाद्या शिक्षकाची चांगली बाजू दुर्लक्षित करून त्याच्या एकाच चुकीवर बोट ठेवून त्याला गुन्हेगार ठरवण्यासाठी धडपडणारे पालक हे शिक्षण क्षेत्रासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठीही धोकादायक ठरत आहे.

साखळी येथील सेंट जॉन हायस्कूलच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी एका शिक्षिकेला अटक करण्यात आली. त्याच दरम्यान विठ्ठलापूर येथील प्रसिद्ध सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षिकेने एका तिसरीच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची पोलीस तक्रार झाली. त्या प्रकरणात विद्यालयाने तसा प्रकारच घडला नाही, असे म्हणत घडलेली स्थिती सांगितली ती वेगळीच आहे. जी शिक्षिका चांगली शिकवते अशा शिक्षिकेवरच आरोप केल्यामुळे हा सगळा प्रकार सध्या डिचोली परिसरात चर्चेचा ठरला आहे. पोलिसांनीही खातरजमा न करता थेट गुन्हा नोंदवला. शाळा व्यवस्थापन, संबंधित मुलाचे पालक आणि शिक्षिका यांना एकत्र बसवून घडल्या प्रकाराची पडताळणी करण्याची आवश्यकता होती. कारण खरोखरच तसा प्रकार घडला असेल तर तो गंभीर आहे, अन्यथा शिक्षिकेच्या भवितव्याशीही हा खेळ ठरणार आहे. अशा प्रकरणात सामंजस्याची भूमिका घेऊन पालकांशी चर्चा करून तोडगा काढण्याची गरज होती. शाळा व्यवस्थापन आणि पोलीस यांची यात महत्त्वाची भूमिका असायला हवी. शिक्षण खात्याकडे समुपदेशक आहेत, त्यांचीही मदत घेण्याची आवश्यकता होती. पण तसे न करता थेट गोवा बाल कायद्याखाली गुन्हा नोंदवला गेला. त्यामुळे हे प्रकरण कुठे पोहचेल, ते सांगता येणार नाही. प्रत्येकाला आपली 'वरपर्यंत' ओळख आहे हेच सिद्ध करायचे असते. एकमेकांना समजून घेण्याची तयारी नाही. संवाद होत नसल्यामुळे चर्चा करून तोडगा काढला जात नाही. आता पूर्वीचा काळ राहिला नाही. पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून जो 'प्रसाद' मिळायचा तो आताच्या काळात गुन्हा आहे, याची जाणीव सर्वांनाच असायला हवी. पण विद्यार्थ्याच्या भल्यासाठी दमटावण्यासारखे प्रकार होत असतील तर त्या सगळ्या गोष्टी गुन्ह्यात मोडाव्यात का, या विषयावर खऱ्या अर्थाने उघडपणे चर्चा व्हायला हवी. त्यासाठी शाळा व्यवस्थापनांनी शिक्षक आणि पालकांमधील संवाद वाढवण्याची, शाळेच्या संकुलात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे. कायद्यात कितीतरी तरतुदी आहेत. एकदा कायद्यानेच जायचे ठरले की नंतर मागे येणेही कठीण होते. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही, याचा विचार शाळा व्यवस्थापनांनी करायला हवा आणि आपल्याकडून खोटा आरोप होणार नाही, याचा विचार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी करायला हवा. डोळे वटारणे, दमटावणे हे प्रकार हात उचलण्यापर्यंत जाणार नाहीत, यावर शिक्षकांनी विचार करायला हवा. कारण कायद्याने सर्वांना अधिकार दिले आहेत. एकदा गुन्हा नोंद झाला की त्यातून निर्दोष सुटेपर्यंत पोलीस स्थानक आणि कोर्टाच्या खेपा सुटत नाहीत. हा सगळा प्रसंग येण्यापूर्वीच पालक आणि शिक्षकांनी विचारपूर्वक पाऊल उचलायला हवे.

गेल्या काही काळात काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी केलेल्या गंभीर दुष्कर्मांची शिक्षण क्षेत्रात चर्चा होती. आता शिक्षकांकडून होणाऱ्या मारहाणीचे विषय चर्चेत येत आहेत. असे प्रकार होऊ नयेत यासाठी आपली शाळा सुरक्षित आहे, याची हमी शाळा व्यवस्थापनाने पालकांना द्यायला हवी. विद्यार्थ्यांचे चांगले भवितव्य घडावे यासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांच्या चुकांवर बोट ठेवणे सोपे असते आणि त्यातून त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करणेही आजकाल सोपे झाले आहे. मुलांना चांगले वळण लागावे यासाठी काय करता येईल, त्याचा विचार पालकांनी गांभीर्याने करावा. तक्रारी, गुन्हे दाखल करून फक्त 'तुला चांगला धडा शिकवला' एवढेच समाधान असेल त्यापेक्षा मूल थोडे चांगल्या वळणाचे व्हावे, यावर लक्ष दिले तर आयुष्यभराचे समाधानही मिळू शकते. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही वृत्ती थोडी बदलण्याची वेळ आली आहे.