चीनमध्ये रहस्यमय आजाराचा मुलांना विळखा

Story: विश्वरंग |
29th November 2023, 12:54 am
चीनमध्ये रहस्यमय आजाराचा मुलांना विळखा

तुम्हाला नोव्हेंबर २०१९ हा महिना आठवत असेल. चीनमध्ये श्वसनाशी निगडित एका आजाराने थैमान घातल्याच्या बातम्या, व्हिडिओ आणि छायाचित्रे झळकत होती. जगाने ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. चीननेही तो आजार काही भयंकर आहे, असे स्पष्ट केले नाही. या रोगाचे नामकरणही झाले नव्हते. नंतर, संशोधन करून याला ‘कोविड-१९’ असे नाव देण्यात आले आणि बघता-बघता जगात हाहाकार माजला. २१ मार्च २०२० या दिवशी भारतात लॉकडाऊन लागला अन् चक्क दोन वर्षे सगळे जग यात भरडले गेले. कोट्यवधी लोकांचा नाहक बळी गेला. आजही त्या आठवणी ताज्या आहेत. इतक्यात चीनमधून नवीन साथीच्या रोगाची छायाचित्रे, व्हिडिओ बातम्या येऊ लागल्या आहेत. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही जगाला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

नोव्हेंबरच्या मध्यापासून चीनमध्ये लहान मुलांना रहस्यमय विषाणूचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. या रोगाचे अजून नामकरण झालेले नाही. पण, या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर मुलांमध्ये न्यूमोनियासारखी लक्षणे दिसून येत आहेत. इन्फ्लुएंझा विषाणूमुळे हा रोग पसरत चालल्याचे चीन प्रशासनाकडून सांगितले जात आहे. चीनच्या नॅशनल इन्फ्लुएंझा सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील दोन्ही प्रांतांमध्ये इन्फ्लुएंझा विषाणूने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्या आजारी मुलाला बीजिंग चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेल्या एका पालकाने आपली व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. हॉस्पिटलमध्ये तीनशेहून अधिक मुले उपचारांसाठी दाखल झाली आहे. त्यांना डॉक्टरांना भेटण्यासाठी चार तास थांबावे 

लागले.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ऑक्टोबरच्या मध्यापासून श्वसनाच्या आजारांमध्ये देशात वाढ झाल्याचे म्हटले आहे. याची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने चीनकडून या अज्ञात न्यूमोनियाची अधिक माहिती मागितली आहे. मात्र, चीनने हा अहवाल न देता एक निवेदन जारी केले आहे. २४ नोव्हेंबर रोजी हे निवेदन जारी केले आहे. ‘हा हिवाळ्यात मुलांना होणारा सामान्य आजार आहे. त्यात काही असामान्य नाही. नाविन्य नाही. कोविडसारखे काहीही गंभीर नाही,’ असे स्पष्ट केले आहे. कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही, असेही नमूद केले आहे.

दरम्यान, कोविडचा इतिहास बघता चीन आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यावर विशेषतः कोणत्याच देशाचा विश्वास राहिलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने नोव्हेंबर २०१९ मध्ये असेच जगाला शेवटपर्यंत गाफिल ठेवले. तेव्हा चीनच्या विषाणू संशोधन केंद्रात काम करणारे डॉक्टर ली वेनलियांग उन यांनी सर्वांत प्रथम कोविड रोगाविषयी व्हिडिओ व्हायरल करत चीन सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. तेथेच त्यांचा गूढरित्या मृत्यू झाला होता. त्यामुळे आतातरी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर विश्वास कसा ठेवायचा?


 - संतोष गरुड