देण्यातलंं सुख

Story: छान छान गोष्ट |
26th November 2023, 03:18 am
देण्यातलंं सुख

बनसोडे बाईंनी फर्मान काढलं, "मुलांनो, प्रत्येक बाकावरच्या मुलांनी आपल्या शेजाऱ्यासोबत डबा वाटून खायचा."

मुलांना ही कल्पना आवडली. अक्षयला आईने डब्यात मेथीची भाजी, चपाती दिली होती जी त्याला मुळीच आवडत नसे. त्याच्या शेजारी बसलेल्या रोहितच्या डब्यात भोपळ्याचे घारगे होते. घारगे बघून अक्षयच्या तोंडाला पाणी सुटलं. रोहितने अक्षयला दोन घारगे दिले व अक्षयने रोहितच्या डब्यात आपल्या डब्यातली एक पोळी व भाजी ठेवली. गप्पांत डबा कधी संपला ते कळलंच नाही.

दुसऱ्या दिवशी अक्षयच्या घरी त्याची बनुआत्या आली होती. तिने अक्षयसाठी खास घरच्या चक्क्याचं श्रीखंड बनवून आणलं होतं. अक्षयला शाळेत कधी एकदा सुट्टी होतेय नि आपण श्रीखंडपुरीचा डबा उघडतोय असं झालं होतं. त्याला बाईंनी विचारलं देखील, "अक्षय, आज तंद्री कुठे लागलीय तुझी!" तेव्हा कुठे अक्षयने बाईंच्या शिकवणीकडे बळे बळे ध्यान दिलं.

बाईंनी मुलांकडून चालीत कविता म्हणून घेतल्या. सिद्धीला उभं करून सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हात वरती करून हलवायला सांगितलं. सिद्धीने लिमलेटच्या गोळ्या मुलांना वाटल्या इतक्यात मधल्या सुट्टीची घंटा झाली. 

सिध्दी गोळ्या देऊन बाईंच्या पाया पडली तशी बाईंनी तिला आयुष्यमान भव: असा आशीर्वाद दिला व जाताना मुलांना म्हणाल्या, "मुलांनो, लक्षात आहे नं, डबा वाटून खायचा." बाईंनी परत आठवण करून दिली.

अक्षयने रोहितच्या डब्यात पाहिलं. त्याने कोबीची भाजी, चपाती आणली होती. कोबीची भाजी बघूनच अक्षयच्या पोटात मळमळायचं. "आज माझा डबा मी खाऊ का रे रोहित? आज नको वाटणीबिटणी." अक्षय म्हणाला. रोहितने पाहिलं, अक्षयच्या डब्यात श्रीखंडपुरी होती. त्यालाही खावीशी वाटली पण त्याने मुकाट्याने आपला डबा संपवला. बाईंनाही अक्षयचं नाव सांगितलं नाही.

शाळा सुटली. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. अक्षयने दप्तरात छत्री शोधली पण आत्याशी बोलण्याच्या नादात तो दप्तरात छत्री ठेवायला विसरला होता. आता घरी कसं जायचं! अक्षयला काही सुचेना. रोहितला अक्षयची अडचण समजली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "अक्षय, मित्रा माझी छत्री आहे की. आपण दोघं एका छत्रीतनं जाऊ." 

दोघं मग एका छत्रीतून जाऊ लागले. "अक्षय, माझ्यामुळे तुझा खांदा, पाठ भिजली. एकटा असतास तर भिजला नसतास ना."

रोहित म्हणाला, "अक्षय, माझी आज्जी नेहमी सांगते, देण्यात सुख असतं. दुसऱ्याला मदत करण्यात सुख असतं."

अक्षयला रोहितचं म्हणणं पटलं. एकट्याने दुपारी श्रीखंडपुरी फस्त केल्याचं वाईटही वाटलं आणि तरीही मनात कोणताही राग न ठेवता कठीण समयी मदतीचा हात पुढे करणाऱ्या रोहितचं कौतुक वाटलं." घरी जाताच त्याने आईला, बनुआत्याला रोहितबद्दल सांगितलं. बनुआत्या म्हणाली, "उद्या साटोऱ्या करून देते डब्यात. वाटून खाशील ना."

आत्याच्या कुशीत शिरत अक्षय म्हणला, "हो. आता मी ठरवलंय. वाटून खायचं. देण्यातलं सुख उपभोगायचं. एकट्याने नाही फस्त करायचं पण जरा अधिकच्या दे हो."

बनुआत्या तोंडाला पदर लावून खुसूखुसू हसू लागली.


गीता गरुड