विश्वचषक अखेर निसटलाच !

अहमदाबादेत जे घडले त्याची रूखरूख कायम राहील. पराभवामागील कारणे शोधण्याचा हा प्रयत्न असल्याचे अनेकांना वाटू शकेल, पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन करताना भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत केलेली कामगिरीही नव्या पिढीला अधिकच प्रेरणा देणारी असल्याने रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांचेही अभिनंदन करावेच लागेल.

Story: विचारचक्र | वामन प्रभू |
20th November 2023, 09:43 pm
विश्वचषक अखेर निसटलाच !

देशात मागील सुमारे दीडेक महिना चालू असलेले क्रिकेटचे महायुद्ध अखेर आम्ही हरलो. आयसीसी क्रिकेटचा झळाळता विश्वचषक आपला कर्णधार रोहित शर्मा स्वीकारतानाचा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी आतुर असलेल्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींची घोर निराशाच झाली. अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यासाठी प्रत्यक्ष हजेरी लावणारे लाख सव्वालाख प्रेक्षक म्हणा वा टीव्ही तसेच अन्य माध्यमांवर क्रिकेटच्या महायुद्धाचा अंतिम सामना पाहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांचे तिसऱ्यांदा आपण विश्वविजेते होताना पाहण्याचे उराशी  बाळगलेले स्वप्न पार भंगले. भारतीयांचा अपेक्षाभंग होणे स्वाभाविकच आहे. विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून अंतिम लढतीपर्यंतच्या प्रत्येक सामन्यात आपल्या क्रिकेटपटूंनी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशीच नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळेच तर विश्वचषक जिंकण्याच्या अपेक्षा खूपच वाढल्या होत्या. त्यामुळेच तर अंतिम सामन्यातील पराभव देशवासीयांच्या खूपच जिव्हारी लागला. विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक संघाला मैदानावर अक्षरशः लोळवण्याचे काम केवळ आपल्याच संघाने केले असताना पहिल्याच सामन्यात आमच्याकडून सपाटून मार खाणारा, दक्षिण आफ्रिकेकडूनही हरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेतेपद कसा घेऊन जाऊ शकतो, हा प्रश्न जगभरच्या कोट्यवधी भारतीयांना पडलेला असेल. पण शेवटी 'हे क्रिकेट आहे रे बाबा' हेच त्याचे उत्तर आहे आणि ते आम्हाला स्वीकारूनच पुढचा प्रवास करावा लागेल. विश्वचषक अखेर हातातून निसटला असला तरी विश्वविजेतेपदासाठी करावी लागणारी कामगिरी प्रत्यक्ष मैदानात करून आपण स्वतःला सिद्ध केले आहे, याकडे जग दुर्लक्ष करू शकणार नाही.

रोहित शर्माची भारतीय सेनाच यावेळचे क्रिकेटचे विश्वयुद्ध कसे जिंकेल, हे पटवून देणारी अनेक समीकरणे या सेनेच्या तब्बल दहा सामन्यांतील सलग अशा धडाकेबाज कामगिरीनंतर मांडली गेली. पण एकच समीकरण खरे ठरले, ते म्हणजे आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाकडून झालेल्या दारूण पराभवाचा वचपा ऑस्ट्रेलियाच्या संघाने  अंतिम सामन्यात भारतीय संघाला भारी ठरेल अशी कामगिरी करून काढला आणि विश्वचषक आपल्या हातातून निसटत चालला आहे, हे पाहत राहण्याव्यतिरिक्त रोहित शर्मा आणि त्याच्या शूर वीरांकडे अन्य कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. तब्बल पाचवेळा विश्वचषक पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला या स्पर्धेत प्रथम भारताकडून तर त्यानंतर लगेच दक्षिण आफ्रिकेकडून असे सलग दोन पराभव स्वीकारावे लागल्यानंतरही या संघाने  केलेले जबरदस्त कमबॅक यातूनच विश्वविजेता एका रात्रीत बनला जात नाही, हेच सिद्ध झाले. विशेष म्हणजे उपांत्य फेरीत त्याच दक्षिण आफ्रिकन संघाचा तर अंतिम लढतीत भारतीय संघाचा पराभव करून त्यानी सहाव्यांदा पटकावलेले विश्वविजेतेपद केवळ योगायोग म्हणता येणार नाही. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने तीन बाद दोन धावावरून ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना फिरवताना जी हुन्नर दाखवली, तीच हुन्नर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दाखवत विश्वचषक पळवला. तीन बाद ४७ अशा अवस्थेतून कमिन्सच्या संघाने सामना फिरवत भारतीय संघाच्या आशा अपेक्षांवर पुरते पाणी फेरले. विराट कोहली - के. एल. राहुल यांनी पहिल्या सामन्यात जे काम केले त्याचीच पुनरावृत्ती अंतिम सामन्यात दिसून आली. ट्रॅविस हेड आणि मार्क्स लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियन संघासाठी तेच काम केले आणि त्याच फरकाने विजयही मिळवून दिला.

भारतीय संघ अखेर एका चॅम्पियन संघाकडून हरला असल्याने हा पराभव मनाला लावून घेण्याचे वा ओशाळून जाण्याचे काहीही कारण नाही. मान्य आहे की, दहा सलग विजयानंतर अखेरच्या सामन्यात आपल्याला अपेक्षित असा खेळ करता आला नाही वा तो झाला नाही. निर्णायक क्षणी आपण नांगी टाकली, त्यामागे अन्य बरीच कारणे असून त्याचाही विचार व्हायला हवा असला तरी रोहित आणि त्याच्या संघावर वा प्रशिक्षकांवर याचे सारे खापर फोडणे उचित ठरणार नाही वा तसा कोणी प्रयत्नही  करू नये. रोहितच्या संघाने या स्पर्धेत देशवासीयांना जे भरभरून दिले आहे, त्याचाही विचार व्हायला हवा. मागील दीडेक महिन्यात या संघाने अशी काही चमकदार कामगिरी करून दाखवली केली की, त्याचा आम्हा सर्वांना अभिमान बाळगायला हवा. कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघातील प्रत्येक खेळाडूने केलेल्या अफलातून कामगिरीमुळेच तर दीडेक महिना आम्ही सगळेच सातव्या अस्मानात तरंगत होतो. देशवासीयांच्या चेहऱ्यावर सातत्याने दीडेक महिना जो आनंद दिसून येत होता तो केवळ या कामगिरीमुळेच. पण केवळ एका सामन्याचा निकाल प्रतिकूल गेल्याने त्याना फासावर चढवणे कितपत योग्य आहे, याचाही विचार व्हायला हवा. भारतीय क्रिकेट आज ज्या सर्वोच्च स्तरावर पोचले आहे, तिथपर्यंत ते नेण्याचे काम तर याच खेळाडूंनी केले आहे. अर्थातच यास विश्वचषकाची जोड वा किनार मिळाली असती तर ते सोनेपे सुहागा ठरले असते. शेवटी क्रिकेटमध्ये जर - तरच्या भाषेला अजिबात स्थान नसते हे क्रिकेटकडे एक धर्म म्हणून पाहणाऱ्या देशवासीयांना नव्याने सांगायची गरज नाही.

विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीकडे नजर टाकल्यास आपला संघ विश्वविजेत्याच्या थाटातच अखेरपर्यंत खेळला. अपवाद फक्त अंतिम सामन्याचा. सर्वच्या सर्व संघांवर विजय तर मिळवलाच, पण त्याचबरोबर उपविजेत्या न्यूझीलंडवर दोनवेळा मात. सर्वाधिक विक्रमी धावा आपल्या विराट कोहलीच्याच. विराटने केलेल्या ७६५ धावांचा विक्रम बराच काळ अबाधित राहू शकेल. सर्वाधिक म्हणजे २४ बळी आपल्याच शमीचे. बुमराह, कुलदीप, जडेजा, सिराज हेही तसे खूप मागे नाहीत. तीन वेळा पाच किंवा अधिक बळी घेणारा पुन्हा शमीच. सर्वोत्तम गोलंदाजी आपलीच. सर्वाधिक ३१ षटकार रोहित शर्माचेच. सर्वाधिक नऊ निर्धाव षटकेही आपलीच. आता विश्वचषकाची जोड या अफलातून कामगिरीला मिळू शकली नाही, हे दुर्दैव. यासाठी अर्थातच स्पर्धा आयोजकांनाही काही प्रमाणात दोष देता येईल. विश्वचषकासारख्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांसाठी स्टेडियमवर समान परिस्थिती असायला हवी तरच अंतिम लढतीतील थरार वाढू शकतो, हा अलिखित नियम असतानाही असा सामना दिवस-रात्र खेळवून एखाद्या संघावर अन्याय का केला जावा हे कळत नाही. अहमदाबादेत याचा लाभ ऑस्ट्रेलियन संघाने उठवला नसता तर ते आश्चर्यच ठरले असते. खेळपट्टी फलंदाजीस कशी पोषक बनत गेली, हे समस्त क्रिकेट जगतानेही पाहिले. रविवारच्या दिवशी जर अंतिम सामना खेळवत असाल तर निदान तो दिवसाच ठेवला असता तर कोणाही एका संघावर अन्याय होण्याची शक्यता संपुष्टात आली असती. नाणेफेक निर्णायक ठरण्याने विश्वचषक विजेतेपद सहजी हाती लागेल, असे होणे हा एका संघावर अन्यायच ठरतो. अहमदाबादेत जे घडले त्याची रूखरूख कायम राहील. पराभवामागील कारणे शोधण्याचा हा प्रयत्न असल्याचे अनेकांना वाटू शकेल, पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन करताना भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत केलेली कामगिरीही नव्या पिढीला अधिकच प्रेरणा देणारी असल्याने  रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांचेही अभिनंदन करावेच लागेल.