गोवा राज्य संग्रहालय

Story: माझा गोवा | आदित्य सिनाय भांगी |
19th November 2023, 04:16 am
गोवा राज्य संग्रहालय

१९७३ मध्ये, पुरातत्त्व आणि संग्रहालय युनिट गोव्यात स्थापन करण्यात आले.  त्यानंतर २९ सप्टेंबर १९७७ रोजी सांत इनेज येथे भाड्याच्या इमारतीत एक छोटेसे संग्रहालय उघडण्यात आले आणि ते लोकांसाठी खुले करण्यात आले. १८ जून १९९६ रोजी त्याचे पाटो येथे स्थलांतरण झाले आणि भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी त्याचे उद्घाटन केले. याला गोवा स्टेट म्यूझियमच्या नावाने ओळखले जाते. सध्या जून २०१७ पासून संग्रहालय तात्पुरते पणजी येथील जुन्या सचिवालयात स्थलांतरित करण्यात आले आहे.

पाटो येथे असताना या संग्रहालयात दगडी शिल्पे, लाकडी वस्तू, कोरीव काम, कांस्य, चित्रे, हस्तलिखिते, दुर्मिळ नाणी आणि मानववंशशास्त्रीय वस्तूंसह सुमारे ८,००० कलाकृती प्रदर्शनात होत्या. सध्या जागेअभावी मोजक्याच वस्तू आदिल शाहच्या राजवाड्यात (जुने सचिवालय) प्रदर्शनास ठेवलेल्या आहेत.

या संग्रहालयात थिमॅटिक पद्धतीने मांडलेल्या चौदा गॅलरी होत्या ज्या खालीलप्रमाणे आहेत: शिल्पकला दालन, ख्रिश्चन आर्ट गॅलरी, प्रिंटिंग हिस्ट्री गॅलरी, बॅनर्जी आर्ट गॅलरी, धार्मिक अभिव्यक्ती गॅलरी, सांस्कृतिक मानववंशशास्त्र, समकालीन आर्ट गॅलरी, न्युमिस्मॅटिक्स गॅलरी, गोवा फ्रीडम गॅलरी, मेनिसमॅटिक्स गॅलरी, ब्रागांझा गॅलरी, फर्निचर गॅलरी, नॅचरल हेरिटेज ऑफ गोवा गॅलरी, पर्यावरण आणि विकास गॅलरी आणि भूगर्भशास्त्र गॅलरी.

शनिवार-रविवार सोडून हे संग्रहालय अन्य दिवसात खुले असते.