दिवाळी - देवदिवाळी

प्राचीन काळापासून हिंदू बांधव उत्सवप्रिय म्हणून ओळखला जाताे. निसर्गनिर्मित वस्तूंची महानता मानवापर्यंत पाेहचावी म्हणून मानवाने सण-उत्सवांची निर्मिती केली. पाेर्तुगीजांच्या जाचक धर्म बंधनांना झुगारुन संघटीतपणे प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी सण-उत्सव राखून ठेवले. धार्मिक परंपरांनी भरलेले सण-उत्सव एकात्मता, धार्मिक सहिष्णूता, नवचैतन्य फुलवण्याचे कार्य करीत असतात मग ती दिवाळी असाे वा देव दिवाळी.

Story: लोकसंस्कृती | पिरोज नाईक |
19th November, 03:12 am
दिवाळी - देवदिवाळी

दिवाळीला तर सणांचा राजा म्हटले आहे. शरद ऋतूत येणाऱ्या या सणाला कडू कडू कारीट खाल्ल्याशिवाय चहा-पाणी वर्ज्य असते. देव-दिवाळीत तर आवळा, चिंच, दिणा या रान वनस्पती बराेबरच ऊस, तुळस या राेपांना महत्त्वाचे स्थान दिल्याचे दिसून येते.

 धनत्रयाेदशीपासून देवदिवाळीपर्यंत साजऱ्या हाेणाऱ्या या सणामध्ये केवळ माैजमजा एवढेच उद्दिष्ट नसून श्रद्धा, प्रेम, आत्मीयता, पर्यावरण, आराेग्य, संघशक्ती या सर्व गाेष्टींचा विचार केलेला दिसून येताे. कष्टकरी समाज धनाच्या राशीवर दिवा पेटवून धनत्रयाेदशी साजरी करीत असतानाच सतत मानेवर जू ठेवून स्वत:बराेबर शेतात राबणाऱ्या बैलाना न विसरता बैलपाेळा साजरा करताे. त्यांना आंघाेळ घालून सजवताे. त्यांची पूजा करताे. स्वकष्टार्जित पिकवलेल्या भाताचे पाेहे पाेळे करुन खायला घालताे. एक दिवस त्याच्याकडून काम करुन न घेता त्यांना आराम देताे. केवळ त्यांची पूजा करुन ताे थांबत नाही तर त्याच्या विष्ठेचे महत्त्व जाणून घेतलेला कष्टकरी समाज पाडव्याच्या निमित्ताने शेणापासून गाेठा घालताे त्याची पूजा करताे. संध्याकाळी त्या शेणाची तुळस घालून दुसऱ्या दिवशी त्याच्या गाेवऱ्या घालून शेणाचे महत्त्व विशद करताे. या दिवशी ‘धेंडलाे’ नाचवण्याची प्रथा बऱ्याच भागातून पहावयाच मिळताे. धेंडलाे म्हणजे सांगाती. सतत आपल्याबराेबर राहून अडीअडचणींवर मात करण्यास शिकवणाऱ्या संकटसमयी अवतार घेऊन संकटमुक्त करणाऱ्या श्रीकृष्णाला डाेक्यावर बसवून प्रत्येकाच्या दारादारात फिरुन कृष्ण देवा प्रती आदराची भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. निरनिराळी गाणी गात साजरा करण्याची प्रथा आहे. 

दे धेंडलाे धेंडल्या पावस शेणलाे

आमचाे धेंडलाे गेलाे वांगडी

केळ्याच्याे साली खावन पाेट रगडी

इल्लीशी सांडशी सामराची

तितून बसल्या सातेरमाय भांगराची

माडावैयलाे कीर रे शेपडी हालैता

तरणे चेडू पान खाता फिरंगी आपैता

अशी गाणी गात धाेल-ताशांच्या गजरात वर्षभरातील थकवा विसरुन आनंद उपभाेगताे. 

मानवप्राणी निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग आपला परमेश्वर ताेच आपला रक्षणकर्ता आहे. मानवाने निसर्गाशी एकरुप हाेऊन त्याचे रक्षण करणे मानव जातीच्या कसे हिताचे आहे हे आपल्या सवंगड्यांना पटवून देऊन श्रीकृष्णाने साऱ्या गाेपगाेपींना इंद्र देवाच्या पूजेपासून परावृत्त केले व गाेवर्धनाची पूजा करण्यास भाग पाडले. संतप्त झालेल्या इंद्राने विजांच्या कडकडाटासह सारी पृथ्वी जलमय करुन साेडली. इंद्राचा काेप लक्षात येताच मुरलीधराने सर्व सवंगड्यांना एकत्र करुन काठीच्या सहाय्याने गाेवर्धन उचलून धरला व पावसापासून आश्रय घेतला. एकीचे बळ दाखवून सर्वांचे रक्षण करणाऱ्या कृष्णदेवाची पुजा करुन धेंडलाे नाचवण्याची प्रथा पडली. कार्तिक शु. द्वादशी तिथीच्या संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह करण्याची प्रथा सर्व हिंदू बांधवाकडे दिसून येते. तुळशी विवाह हे एक व्रत आहे. कार्तिक शु. एकादशीच्या दिवशी सुहासिनी उपवास करतात. घरातील कर्ता पुरुष तुळशीचे यजमान पद भुषवितो.

 यावेळी तुळशीवृदांवनामध्ये उस, चिंच, आवळा दिण्याची फांदी लावतात. कृषिसंस्कृतीशी निगडीत असलेल्या या सण - उत्सवाद्वारे निसर्ग जाेपासणे त्याचे संवर्धन करणे हेच उदीष्ट दिसून येते. दिवाळीच्या निमित्ताने धाकटी दिवाळीपासून व्हडली दिवाळी पर्यंत भातापासून बनवलेल्या पाेह्यानाच जास्त महत्त्व दिलेले आहे. जीवनशैली बदलली स्पर्धा, कुटुंबपद्धती, आधुनिकता यामुळे सण साजरे करण्याच्या पद्धतीत बदल झाला पण सणामागची श्रद्धा, धार्मिकता, उत्कंठा, ओढ मात्र कामय आहे. सण-उत्सव हे पुढच्या पिढीला संस्कृतीची ओळख करुन देणारे माध्यम आहे.