घरातली जबाबदारी सांभाळून आज स्त्रिया अनेक क्षेत्रे पादाक्रांत करत आहेत. विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे. विविध कंपन्या, व्यवसाय यामध्ये जबाबदारीचे काम करताना त्या आपल्या अंगातील गुणांची चमक दाखवतात. घर, संसार, मुले, नातेवाईक या सर्व कौटुंबिक जबाबदार्या सांभाळतानाच त्या बाहेरील क्षेत्रातही आपली भरारी घेताना त्या आपला छंद, आपल्या अंगात असणारी कलाही जोपासतात.
मूळ रिवण गावातील परंतु लग्नानंतर मडगावात स्थायिक झालेल्या शर्मिला प्रभू आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आपल्या पतीच्या व्यवसायातही आपले योगदान देत आहेत. त्याचबरोबर त्या साहित्यिक क्षेत्रातही आपल्या लेखणीची कमाल दाखवत आहेत. विविध वृत्तपत्रांतून विविध विषयावर सामाजिक, ललित लेखन तर त्या करतातच परंतु विविध विषयावरील त्यांच्या कविता मनाला भुरळ पाडल्याशिवाय रहात नाहीत. आज एक उत्तम कवयित्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय एकदा जडली की मग आपल्या लिखाणातही त्याचे प्रतिबिंब उमटते. अगदी तसेच काहीसे आपल्याला शर्मिला प्रभू यांच्या कवितेत प्रतिबिंबित होते. जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची त्यांची नजर त्यांना अधिक प्रतिभावान बनवते.
शर्मिला या एक उत्तम सूत्रसंचालिका असून एक उत्तम मुलाखतकार आहेत. अनेक कार्यक्रमांचे उत्तम सूत्रसंचालन त्यांनी केले आहे, त्यामुळे त्यांच्या अंगात सभाधीटपणा आहे. दूरदर्शनवर त्यांनी अनेक स्त्रियांच्या मुलाखती घेताना त्यांचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. मडगाव येथील अशोक बोरकर : काव्यमैफलच्या संचालिका कविता बोरकर, अभिनेत्री रती भाटीकर, गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रंजीता पै, समाजसेविका विंदा देसाई यांच्यासह अनेकविध क्षेत्रातील मान्यवर स्त्रियांच्या कार्याचा परिचय त्यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे समाजाला करून दिला आहे.
शर्मिला या एक उत्तम कवयित्री तसेच अभिनेत्रीही आहेत. त्यांच्या कवितेत निसर्गाप्रती त्यांचे प्रेम व्यक्त होते. तसेच त्यांच्या सभोवताली घडणार्या प्रसंगाचे चित्रणही त्यांच्या कवितेत आपल्याला आढळते. त्यांनी लिहिलेल्या अनेक कवितांना विविध स्पर्धेत पारितोषिके प्राप्त झाली आहेत. केवळ गोव्यातच नव्हे, तर साहित्य अकादमी नवी दिल्ली येथेही त्यांच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम झाले असून गोव्यातील अनेक साहित्य संमेलनात त्यांच्या कवितांचे सादरीकरण होत आहे. त्यांचा "गंधमोती" हा कवितासंग्रह तसेच अस्तुरी, गांवगिरी, भूयचाफी, मनदर्पण, आठवणीचे गाठोडे ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रसार भारतीच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या आकाशवाणी व दूरदर्शनवरुनही त्यांच्या कथा-कविता यांचे वाचन तसेच सादरीकरण प्रसारित झाले आहे. महिला मंडळ, शिगमोत्सव आदी उत्सव, कार्यक्रमातून त्यांनी अनेक भूमिकाही उत्तम रीतीने वठवल्या आहेत. एक स्त्री असूनही पुरुषाचा अभिनय त्या उत्तम रीतीने साकारतात.
आपल्या अंगातील कलेचा आदर हा प्रत्येक स्त्रीने करावा, असे सांगताना शर्मिला पुढे म्हणतात की, ही कला जपताना त्या कलेतील इतर स्त्रियांनाही आपण पुढे आणण्याचा प्रयत्न प्रत्येक स्त्रीने करावा. आज घरातील कुटुंबाची जबाबदारी सांभाळून आपली कला, लेखनाची आवड जपताना शर्मिला या आपल्या पतीच्या बांधकामाच्या व्यवसायातही त्यांना लागेल ती सर्व मदत अगदी स्वत: जातीने करतात. या शिवाय त्यांच्या घरात दोन श्वान, मांजरी आहेत. त्यांची देखभालही त्या जातीने करतात. घराच्या प्रवेशद्वाराजवळील श्वानांना रोज जेवण देताना त्यांच्यातील प्राणी प्रेम व मुक्या प्राण्यांबदलची आस्था दिसून येते. या सर्व गोष्टी सांभाळताना त्यांची अक्षरश: तारेवरची कसरत होते. पण तरीही या सर्व गोष्टी त्या अतिशय प्रामाणिकपणाने करत आहेत.