शंभरहून नागरिक जखमी, वाहनांची तोडफोड
ढाका : बांग्लादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागून एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून शंभरच्यावर लोक जखमी झाले आहेत. सुमारे १ लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत.
अवामी लीगचे काही कार्यकर्ते पिकअप व्हॅनमधून त्यांच्या रॅलीला जात असताना हिंसाचार सुरू झाला. बीएनपीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून पिकअप व्हॅनची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी बीएनपीच्या एका कार्यकर्त्याला अटक केली. हळूहळू बीएनपीचे इतर कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांशी झटापट झाली.
हिंसक आंदोलकांनी डझनभर वाहने पेटवून दिली आणि सरकारी इमारतींचे नुकसान केले. राजधानी ढाका येथे हजारो लोक जमले आणि शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. विरोध वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या.
आंदोलकांनी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानावर दगडफेक केली आणि पोलीस बूथही पेटवून दिला. चोरट्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीने हा निषेध पुकारला होता, ज्यामध्ये निष्पक्ष निवडणुकांची मागणी करत पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
ककरेल, नयापल्टन, विजयनगर, मालीबाग, आरामबाग भागात आणि मत्स्य भवनाजवळ झालेल्या चकमकींमध्ये किमान तेरा वाहने आणि एक पोलीस चौकी जाळण्यात आली. डझनहून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली.