ज्या घरात काम केले, त्यांनाच लुटले! ८.९० लाखांच्या चोरीप्रकरणी वास्कोत मोलकरणीला अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September 2023, 01:16 pm
ज्या घरात काम केले, त्यांनाच लुटले! ८.९० लाखांच्या चोरीप्रकरणी वास्कोत मोलकरणीला अटक

म्हापसा : चिखलीतील आल्त-दाबोळी परिसरात हॅमिल्टन फुर्तादो यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला चोरी प्रकरणात आज दुपारी वास्को पोलिसांनी अटक केली आहे. ही मोलकरीण काम करता करता अधूनमधून मौल्यवान दागिने आणि रोकड लंपास करायची, असा संशय आहे. २५ सप्टेंबर रोजी घरातील ६.९० लाखांचे दागिने व सुमारे दोन लाखांची रोकड असा एकूण ८.९० लाखांचा मुद्देमाल गायब असल्याचे फुर्तादो यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

आल्त-दाबोळीतील ७३ वर्षीय हॅमिल्टन फुर्तादो यांनी घरकामासाठी एक मोलकरणी ठेवली होती. पण, तिने घरातील मौल्यवान दागिने आणि पैशांवर हळूहळू डल्ला मारल्याचे २५ सप्टेंबर रोजी त्यांच्या लक्षात आले. घरातील कामे केल्यानंतर जाताना ती दागिने आणि पैशांवर हळूच डल्ला मारायची, असा संशय आहे. अशाप्रकारे ६.९० लाखांचे दागिने व सुमारे दोन लाखांची रोकड लंपास झाल्याचे फुर्तादो यांच्या लक्षात आल्यानंतर तेही चक्रावून गेले. त्यांनी लगेच ८.९० लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार वास्को पोलिसांना दिली.

फुर्तादो यांच्या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी भा.दं.सं.वि. कलम ३७१ खाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या तपासाअंतर्गत त्यांनी आज मोलकरणीला अटक केली. सध्या तिची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा