गिरीश चोडणकर यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
पणजी : भाजप सरकार महिलांचा सन्मान करीत असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील तिन्ही महिला आमदारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करून महिलांना खराखुरा ‘सन्मान’ मिळवून द्यावा, असे आवाहन काँग्रेस कार्यकारिणी समितीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी रविवारी दिले.
३३ टक्के महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना सन्मान देत असून, गोवा विधानसभेत महिलांसाठी १३ जागा राखीव ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चार दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यावर, भाजप सरकार खरोखरच महिलांचा सन्मान करते तर राज्यातील तीनपैकी एकही महिला आमदार मंत्रिमंडळात का नाही, असा सवाल चोडणकर यांनी केला. विद्यमान तीन महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी जनगणना किंवा प्रभाग फेररचनेची आवश्यकता नाही. त्यावर मुख्यमंत्री स्वत: निर्णय घेऊ शकतात. गोवा विधानसभेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. तिन्ही महिला आमदार भाजपच्याच आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीही रोखू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तिन्ही महिलांना मंत्री करावे आणि भाजप महिलांचा सन्मान करीत असल्याचे आपले वक्तव्य सिद्ध करून दाखवावे, असेही चोडणकर यांनी नमूद केले.
महिला आरक्षण जुमलाच
भाजप सरकार प्रत्येक गोष्टीवरून जनतेची दिशाभूल करीत आहे. आताही महिला आरक्षणावरून लोकांची फसवणूक करणेच सुरू आहे. अदानी प्रकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपयशावरून लक्ष हटवण्याचा हा आणखी एक जुमला आहे, अशी टीकाही गिरीश चोडणकर यांनी केली.
भाजप महिला मोर्चाही पाठिंबा देईल!
भाजपकडे तीन महिला आमदार असतानाही महिला व बाल कल्याण खाते पुरुष आमदाराकडे आहे. त्यामुळे भाजप महिला मोर्चा देखील आपल्या मागणीला पाठिंबा देईल. आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी करून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देतील, असा विश्वासही गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला.