मुख्यमंत्र्यांच्या राजकीय नेतृत्वाचे कौशल्य

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सध्या इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा व्यस्त दौरा असतो. भाजपने त्यांना अनेक राज्यांमध्ये जबाबदारी दिली आहे. गोव्यात त्यांच्या कार्यकाळात भाजपने मिळवलेले यश, निवडून आलेल्या काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपात प्रवेश देऊन काँग्रेसला पाडलेले भगदाड या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्यमंत्री म्हणून डॉ. सावंत यांची बाजू उजवी ठरते.

Story: उतारा | पांडुरंग गांवकर |
24th September 2023, 03:45 am
मुख्यमंत्र्यांच्या राजकीय नेतृत्वाचे कौशल्य

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकींच्या प्रचारासाठी भाजपने सुरुवात केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे दौरेही या राज्यांमध्ये सुरू झाले . निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये जाऊन तिथे केंद्र सरकारचे महत्त्व पटवून देतानाच भाजपचे सरकार त्या राज्यांत आल्यास लोककल्याण कसे होईल ते लोकांना पटवून देण्याची जबाबदारी भाजप आपल्या नेत्यांवर देते. भाजपचे सरकार असलेल्या इतर राज्यांतील नेत्यांनाही निवडणुकांची जबाबदारी दिलेली असते. त्याशिवाय इतर मंत्री, खासदार, आमदारांना निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशा काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. 

काँग्रेस आणि इतर महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या तुलनेत भाजपने आतापासूनच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सध्या इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा व्यस्त दौरा असतो. भाजपने त्यांना अनेक राज्यांमध्ये जबाबदारी दिली आहे. गोव्यात त्यांच्या कार्यकाळात भाजपने मिळवलेले यश, निवडून आलेल्या काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपात प्रवेश देऊन काँग्रेसला पाडलेले भगदाड या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्यमंत्री म्हणून ड़ॉ. सावंत यांची बाजू उजवी ठरते. 

सध्या भाजपच्या यशस्वी मुख्यमंत्र्यांमध्ये डॉ. सावंत यांची गणना होते. त्यामुळेच त्यांना निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये पुन्हा पुन्हा पाचारण केले जाते. गोव्यातील सरकारमध्ये विशेषतः भाजपमध्ये असलेले अल्पसंख्यांक आमदार हे गोव्यातील भाजपचे वैशिष्ट्य आणि जमेची बाजू. गोव्यात सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या प्रकारामुळे डॉ. सावंत यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारासाठी बोलावले जाते. छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना पाचारण केले गेले. त्यानंतर अचानक कर्नाटकातील जनता दल (सेक्युलर) पक्षाने भाजपसोबत यावे यासाठी डॉ. सावंत यांनी मध्यस्थी केली आणि ती यशस्वी झाली. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त मध्यस्थी केली नाही तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत एच.डी.कुमारस्वामी, निखिल कुमार के, आमदार कृपेंद्र रेड्डी अशा जेडीएसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घडवून आणली. या सगळ्या घडामोडीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएसने भाजपसोबत जाण्याचे निश्चित केले. जेडीएस आणि भाजपाच्या मित्रत्वाचे नाते निर्माण करण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे आणि कर्नाटकाच्या ज्वलंत विषयांवर उपाय काढण्यासाठी ही मैत्री महत्त्वपूर्ण ठरेल असे कुमारस्वामी यांनी बैठकीनंतर म्हटले. ही चर्चा घडवून आणण्यासाठी डॉ. सावंत यांनी घेतलेला पुढाकार तितकाच महत्त्वाचा होता. 

कर्नाटकात भाजपकडून सत्ता गेली असली तरी लोकसभेच्या तब्बल २५ जागा भाजपकडे आहेत. फक्त तीन जागा काँग्रेस, जेडीएस आणि अपक्षांकडे आहेत. त्यामुळे भाजपला लोकसभेसाठी कर्नाटक फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा प्रभाव असलेल्या जनता दल (सेक्युलर) पक्षाची मदत घेणे फायद्याचे ठरेल असे भाजपला वाटते. कारण कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यांच्याकडून भाजपच्या जागा वाचवायच्या असतील आणि जास्तीत जास्त जागा मिळवायच्या असतील तर भाजपला तिथे मित्रपक्षांची फार गरज भासणार आहे. 

२०१९ च्या निवडणुकीत जनता दल सेक्युलरने एकच जागा मिळवली होती पण त्यांना ९.६७ टक्के मते मिळाली होती. भाजपला ५१.३८ टक्के तर काँग्रेसला ३१.८८ टक्के मते मिळाली होती. सात जागा लढवून फक्त एक जागा मिळाली असली तरी ९.६७ टक्के मताधिक्य मिळाल्यामुळे कर्नाटकात जेडीएसचा थोडा फायदा भाजपला निश्चितच होणार असे भाजपला वाटते. एरवी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा अशा अनेक राज्यांमध्ये काँग्रेसशी टक्कर द्यायची असेल तर अशा पक्षांची मदत घेऊन पुढे जाणे या गोष्टींना भाजपने नेहमीच महत्त्व दिले आहे. त्यामुळेच जनता दल सेक्युलरच्या नेत्यांशी समझोता करून त्यांना भाजपसोबत राहण्यासाठी मनधरणी करण्याचे काम डॉ. सावंत यांना दिले गेले आणि त्यांनी ते पारही पाडले. 

कर्नाटकात काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत बाजी मारल्यामुळे काँग्रेसचा गड भेदून पुन्हा भाजपला तिथे लोकसभेच्या जास्त जागा मिळवता येतात का ते येत्या काळात कळेल. कारण कर्नाटकाच्या विजयानंतर काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलरला सोबत घेण्यासाठी भाजपने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर दाखवलेला विश्वास सावंत यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रगल्भ करणारा आहे. दिलेली जबाबदारी पेलण्यासाठी मुख्यमंत्रीही कुठला गाजावाजा न करता तितक्याच कुशलतेने काम करून राजकीय परिपक्वता, नेत्यांमधील हवे असलेले कौशल्य सिद्ध करत आहेत हे विशेष.