वनडे विश्वचषकाच्या बक्षिसांवर कोट्यवधीची उधळण

विजेत्याला मिळणार ३३ कोटी; उपविजेत्याला १६ कोटींचे बक्षीस

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
23rd September 2023, 12:00 am
वनडे विश्वचषकाच्या बक्षिसांवर कोट्यवधीची उधळण

दुबई : क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला अवघा दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकाची गल्ली, दिल्ली ते जगातील सर्व क्रीडा चाहते वाट पाहत आहेत. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या बक्षीसाची रक्कम आयसीसीने शुक्रवारी जाहीर केली. स्पर्धेत बक्षीसांवर १० मिलिअन डॉलरची उधळण होणार आहे. भारतीय रुपयात ही रक्कम ८२ कोटी ९३ लाख ५५ हजार रुपये इतकी होत आहे. म्हणजेच, विश्वचषक स्पर्धेत कोट्यवधींची उधळण होणार आहे.
कुणाला किती मिळणार बक्षीस ?
भारतात होणारी विश्वचषक स्पर्धा पाच ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. दहा संघामध्ये रणसंग्राम होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी स्पर्धेतील विजेता मिळणार आहे. विजेत्या संघाला तब्बल ३३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर उप विजेत्या संघाला १६ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर सेमीफायनलमध्ये आव्हान संपणाऱ्या दोन्ही संघाला प्रत्येकी सहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये आव्हान संपलेल्या संघाला प्रत्येकी ८२ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकाची अंतिम लढत होणार आहे. विजेत्याला संघाला चार मिलिअन डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे. तर उपविजेता संघाला दोन मिलिअन डॉलरवर समाधान मानावे लागेल.
यंदाची स्पर्धा राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये
राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने १० संघामध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला ९ सामने खेळावे लागणार आहेत. वनडे क्रिकेट विश्वचषकात तिसऱ्यांदा राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा होत आहे. याआधी २०१९ आणि १९९२ मध्ये राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने विश्वचषक स्पर्धा झाली होती. २०१९ मध्ये इंग्लंडने, तर १९९२ मध्ये पाकिस्तानने विश्वचषक उंचावला होता.