भारतीय संस्कृतीत अनेक प्राचीन कला आहेत ज्याचे जतन आणि संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. भारतीय नृत्य शास्त्र ही प्राचीन कला असून यात विविध नृत्य कला समाविष्ट आहेत. भारतात दहा शास्त्रीय नृत्य शैली प्रचलित आहेत. यातील भरतनाट्यम ही नृत्य कला जगभरात फार लोकप्रिय आहे. या भरतनाट्यम कलेचे जतन आणि संवर्धन करतानाच कित्येक शास्त्रीय नृत्यांगना ही कला पुढे नेण्याचा प्रयत्न करतानाच अनेक विद्यार्थ्यांना या कलेचे शास्त्रोक्त शिक्षण ही देत आहेत.
पणजी येथील निधी संके या शास्त्रीय नृत्य कलाकार गेली कित्येक वर्षे या कलेची आराधना करत असून आपली ही कला देवाशी संलग्न झाल्याचे त्या मनोमन मानत आहेत. मूळ कर्नाटकच्या पण लग्नानंतर गोव्याची सून बनलेल्या निधी यांनी संपूर्णपणे या कलेला वाहून घेतले आहे. या कलेची उपासना करत असताना निधी या कलेचे शास्त्रोक्त शिक्षण निधी स्कूल ऑफ डान्स या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना देत आहेत. "मी अशा पद्धतीने माझ्या सर्व विद्यार्थिंनींना या कलेत पारंगत केले आहे की, जर परिस्थितीमुळे त्या कधीही कुठेही एकट्या जरी पडल्या, तरी त्या स्वत:च्या पायावर समर्थपणे उभे राहू शकतात." असे निधी अभिमानाने सांगतात.
निधी यांना नृत्याचा ध्यास लहानपणापासूनच होता. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून नृत्य शिकायला सुरुवात केली. बालपणात गणेशोत्सवाच्या काळात उभालेल्या मंडपात त्यांनी आपले पहिल्या नृत्याचे सादरीकरण केले. त्यावेळी त्यांचे नृत्यातील कौशल्य पाहून तिच्या आई वडिलांनी निधी यांना शास्त्रोक्त नृत्य शिकवायचे ठरवले आणि निधी यांनी बी. नागराज यांच्याकडे शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली.
दहावीची परीक्षा दिल्यावर त्यांनी शास्त्रीय नृत्याच्या कार्यशाळा घ्यावयास सुरुवात केली. शास्त्रोक्त शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी आपल्या भरतनाट्यम कलेचे पहिले सादरीकरण गायत्री तपोवन येथे सादर केले. त्यावेळी १०८ स्वामीजींची उपस्थिती होती. या तपोवनातील मंगल वातावरणात आपले पहिले नृत्य सादर करताना निधी यांना प्रचंड ऊर्जा मिळाल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांना जिथे जिथे संधी मिळाली, तिथे तिथे आपल्या नृत्याचे सदरीकरण केले.
नृत्याला आपले जीवन समर्पित केलेल्या निधी यांनी लग्नाच्या वेळेस ही जो कोणी आपल्याला आपले नृत्य पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्णत: सहकार्य करेल, अशा व्यक्तीकडेच लग्न करून द्या अशी गळ आपल्या आई वडिलांना घातली. त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या नृत्य शिकण्यासाठी सहकार्य करण्यासाठी तयार असलेल्या अमित यांच्याशी लग्नगाठ बांधली गेली आणि त्यांचे गोव्याशी नाते जोडले गेले.
गोव्यात आल्यावर भरतनाट्यमचे वर्ग घेणे तितके सोपे नव्हते कारण इथले वातावरण नवीन आणि इथे त्यांची कोणाशी ओळख ही नव्हती. तेव्हा त्यांनी घरातूनच १/२ मुलींना शिकवण्यास सुरुवात केली. असे करता करता कामाचा व्याप वाढत गेला आणि आता त्यांच्याकडे जवळपास १०० मुली शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेत आहेत. वय वर्षे ४ ते ८८ वयाच्या महिला ही त्यांच्याकडे नृत्य शिकायला आपली रुचि दाखवत असून या सर्वांना शास्त्रीय नृत्य शिकवणे हे निधी यांना एक आव्हान असून निधी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलत आहेत.
निधि या एक उत्तम शास्त्रीय नृत्य शिक्षिका आहेतच शिवाय त्या एक उत्तम अभिनय कलाकार ही आहेत. भरतनाट्यम या नृत्यासोबत त्या गरबा, पार्टी डान्स, लोकनृत्य यांचे ही प्रशिक्षण देतात आणि एखाद्या समारंभासाठी सामूहिक नृत्य ही शिकवतात. नृत्य ही आवड म्हणून पाहिली तर त्यात आपल्याला खूप फायदे मिळतात असे निधि या सांगतात. नृत्यामुळे आपल्या स्वभावात धीटपणा येतो. ताणतणाव कमी होतो. आत्मविश्वास वाढतो, आपण समाजात सहज मिसळायला शिकतो. नृत्य हा एक चांगला व्यायामसुद्धा असून त्याच्या नियमित सरावाने आपले शरीर व मन ही संतुलित आणि सदृढ राहण्यास मदत होते असे निधी सांगतात.
भविष्यकाळात नृत्य हे आपले करियर म्हणून घेण्यास ही खूप फायदे असणार आहेत. शिक्षण हे असायलाच हवे पण आपल्या अंगातील कला ही आपल्याला नेहमीच जगायला शिकवते असे मानून आपली ही भारतीय कला जिवंत ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणाऱ्या निधी यांना अनेक शुभेच्छा .