केंद्रीय कर्मचारी असल्याचे सांगून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला अज्ञातांकडून गंडा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th September, 07:05 am
केंद्रीय कर्मचारी असल्याचे सांगून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

फोंडा : केंद्रीय कर्मचारी असल्याची थाप मारून तोतयांनी एका निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला २.५० लाखांच्या दागिन्यांना लुबाडले. कोने-प्रियोळ येथील अंतर्गत रस्त्यावर सोमवारी दुपारी ही घटना घडली.
फिर्यादी रस्त्यावरून चालत जात होते. यावेळी दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी फिर्यादी आपण केंद्रीय कर्मचारी असल्याचे सांगितले. या परिसरात चोऱ्या होत असून एकटे तेही अंगावर दागिने घालून फिरणे धोक्याचे आहे, असे सांगून संशयितांनी फिर्यादींना हातातील मास्कोट आणि गळ्यातील सोनसाखळी काढायला लावली. हे दागिने संशयितांनी एका कागदात गुंडाळून त्यांना परत केले. घरी गेल्यावर फिर्यादींनी तो कागद उघडला, तेव्हा आत दगड आढळून आले.
आपली लुबाडणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी म्हार्दोळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, यापूर्वी पोलीस कर्मचारी असल्याचे भासवून लुबाडणुकीचे प्रकार घडले होते. पण केंद्रीय कर्मचारी असल्याचे सांगून चोरीचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे. अशा चोरांपासून लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.