अल सीक : खडकातून दिसणारी संस्कृती

Story: प्रवास । भक्ती सरदेसाई |
17th September, 12:46 am
अल सीक : खडकातून दिसणारी संस्कृती

अल सीक ही उंच वाळूच्या खडकांनी बनलेली अरुंद, वळणं घेणारी घाटी. हा मार्ग अधूनमधून कोरीव काम, प्राचीन नाबेटियन वास्तुकला आणि आकर्षक खडक रचनांनी सजलेला आहे. इथे प्रत्यक्ष आल्याशिवाय ह्याची सुंदरता समजणं अशक्य. प्रत्येक दगड निरनिराळे रंग आणि अनेक छटा असलेला. त्यामुळे त्यावरून रिफ्लेक्ट होणारा प्रकाश देखील अनेक रंगांच्या छटा लेवून नांदत होता आणि चालणाऱ्या वाटसरूला त्या सगळ्या अनुभवायला मिळत होत्या. 

जसजसे आम्ही सिकमध्ये खोलवर गेलो, तसतसे त्याच्या उंच भिंती आम्हाला आधार  वाटू लागल्या. उन्हापासून बचाव तर त्या करतंच होत्या पण थंडीपासूनही त्यांनी आम्हाला वाचवलं. जॉर्डनमध्ये थंडी भरपूर. जर सूर्य तळपत असताना इतकी थंडी तर रात्री काय होणार कोणास ठाऊक! माझ्या मनात विचार आला. मला 'पेट्रा बाय नाईट' अनुभवायचं होतं. 

पेट्रा व्हिसीटर सेंटरपासून अल सीकच्या मुखापर्यंतची पायपीट करून आम्ही दोघेही थकलो. अद्वैतने आदित्यच्या खांद्यावर झोपून दिलं होतं. मी अधूनमधून त्याला घेत असले तरीही आदित्यनेच अधिक तो वेळ पेलल्यामुळे मला पेट्राची वारी शक्य झाली. अल सीक हे साधारण तीन किलोमीटर लांबीचं कॅन्यन. एका दोन वर्षांच्या निद्राधीन झालेल्या चिमुकल्यासह हे अंतर मापणं म्हणजे माझ्या मते खरोखरच एक उल्लेखनीय साहसंच होतं. 

जसजसं हे अंतर कमी होत होतं, तसतसं दर वळण शेवटचं वाटत होतं. आता ह्या पुढे अल खजाने दिसेल अशी उत्साहाची भावना निर्माण झाली होती. आणि शेवटी ते वळण आलं. समोर दोन भिंतींमधल्या निमुळत्या फटीतून ‘अल खजाने’ चा साक्षात्कार झाला. मी वळून पाहिलं तर आदित्य देखील माझ्यासारखा वाटेत थबकला होता. अल खजनेची एक झलक इतकी मोहून टाकणारी तर पूर्ण इमारत किती विलोभनीय असेल असा विचार मनात आला तोच अद्वैतवर दृष्टी गेली आणि ‘अरेरे हा जागा असता तर, त्यालाही मजा आली असती. ह्या निमुळत्या खोल वाटेवरून घुमणार्‍या आवाजाशी तोही खेळला असता. शेवटचं वळण घेऊन समोर जेव्हा अल खजाने उभं राहिलं तेव्हा त्याचेही डोळे कुतूहलाने चमकले असते.’ अश्या अनेक गोष्टी मनात आल्या. पण डाराडूर झोपून दिलेल्या त्याला ह्या साऱ्या प्रपंचापेक्षा त्याची स्वप्ननगरीच जास्ती प्रिय वाटत होती. 

शेवटी अल सिकमधून बाहेर येताच ट्रेजरी तिचा भव्य दिव्य देखावा घेऊन प्रकट झाली. मावळत्या सूर्याच्या उबदार सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेल्या ह्या अल खजानेने आपले दर्शन देऊन आम्हा सर्व यत्रिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले ह्याची जाणीव जणू तिला होती. त्याच थाटात जणू ती उभी राहिली होती. 

आम्ही काही क्षण तिच्याकडे पाहतंच राहिलो. ही इमारत इतकी सजीव वाटत होती. जणू ही आम्हाला बघतेय, आमच्याशी संवाद साधतेय असा भास होत होता. या लपलेल्या वाळवंटी शहरात, एकेकाळी अविश्वसनीय भरभराट झालेल्या प्राचीन सभ्यतेची आठवण करून ती आम्हाला देत होती.

इथे उंच भिंतींचं संरक्षण नसल्याने वारा झोंबू लागला. आमचे चिमुकले साहेब उठले. जांभया देत त्यांनी आजूबाजूला बघून घेतलं आणि काही खास इंप्रेस झाले नाहीत. पण त्याची चूक नाही. ह्या जागेचं पूर्ण महत्त्व समजण्यासाठी तो खूपच लहान आहे. तिथले उंट पाहून मात्र त्याच्या डोळ्यांवर रेंगाळणारी झोप उडाली. पण त्याला त्या उंटाच्या जवळ जाऊ देण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. 

अल खजानेच्या पलीकडे थडगं, मंदिरं, अॅम्फीथिएटर्स आणि निवासस्थानांचा एक विस्तीर्ण संकुल आहे, जे नबेटियन्सच्या प्रगत सभ्यतेचं दर्शन घडवतं. चॅनेल आणि टाक्यांसह कल्पक जल व्यवस्थापन प्रणाली असलेलं, या रखरखीत वाळवंटात जगण्याची परवानगी देणारं हे नेटवर्क आजही शाबूत आहे. 

पेट्राने अरबी द्वीपकल्प, इजिप्त आणि लेव्हंट यांना जोडणारं प्रमुख व्यापार केंद्र म्हणून काम केलंय. त्याच्या मोक्याच्या स्थानामुळे त्याच्या समृद्धीला हातभार लागला. १९८५ मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून या साइटची ओळख आणि नुकतीच जगातील नव्या सात आश्चर्यांपैकी एक म्हणून तिला सूचीबद्ध केल्यामुळे इथल्या पर्यटनाला अजूनही चालना मिळाली आणि तिचा वारसा जपला गेला. पेट्राला भेट देणं म्हणजे भूतकाळात जाण्यासारखं आहे. प्रत्येक कोरीव काम आणि रचना उल्लेखनीय! इथल्या नबेटीयन सभ्यतेचा इतिहास सांगणाऱ्या! त्यामुळेच तर इथल्या शहराचं कालातीत सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व जगभरातल्या प्रवाशांना मोहित करतं.                                  क्रमशः