डोळ्यांच्या आरोग्यासाठी 'मोबाईल पार्किंग'

Story: स्वस्थ रहा मस्त रहा । वैद्य कृपा नाईक |
17th September, 12:39 am
डोळ्यांच्या आरोग्यासाठी 'मोबाईल पार्किंग'

डोळे हा आपल्या शरीराचा एक नाजूक अवयव आहे. डोळे आहेत म्हणून तर आपण सुंदर निसर्ग, देखावे बघू शकतो, एकमेकांचे चेहरे, फोटो, तसेच मनोरंजनाच्या सर्व गोष्टी बघू शकतो, गोष्टी वाचू शकतो, अनेक गोष्टी पाहून शिकू शकतो. म्हणून या डोळ्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. डोळ्यांची नीट काळजी घेतली नाही तर डोळे दुखणे, डोळ्यात पाणी येणे, डोळे लाल होणे, खाज सुटणे, फळ्यावरची अक्षरे न दिसणे अशा समस्या उद्भवू लागतात. असे त्रास होऊ नये म्हणून पुढीप्रमाणे डोळ्यांची काळजी घ्यावी -

लवकर झोपावे, शांत व पुरेशी झोप घ्यावी.

बाहेरुन आल्यावर डोळे पाण्याने स्वच्छ धुवावे.

नियमित डोळ्यांचे व्यायाम करावे. 

रात्री झोपताना तळपायांना साजूक तूप चोळावे. 

पपई, गाजर, मनुका, साजूक तूप, आवळा कँडी, आवळा मुरंबाचे सेवन करावे.

फोन, टॅब आणि टीव्हीवर जास्त वेळ घालवल्याने आपल्या डोळ्यांवर सर्वात जास्त ताण येतो. त्यामुळे डोळ्यांची शक्ती कमी होते, चश्मा लागतो, तरीसुद्धा आपण मोबाईलवर व्हिडिओ बघणं , गेम्स खेळणं कमी करत नाही....बरोबर? पण आपले डोळे चांगले रहावे यासाठी ही सवय मोडली पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला एक छान आयडिया सांगते. त्यासाठी आजपासून रोज आपण *'मोबाईल पार्कींग'* सुरू करायचं आहे.

काय आहे हे *'मोबाईल पार्किंग'*? 

यामध्ये आपल्याला जसं कार पार्किंगसाठी आपण जागा घराबाहेर ठरवलेली असते तशी मोबाईल व टॅबसाठी घरात जागा ठेवावी.

आणि जसं गाडी वापरायची नसेल तेव्हा आपण ती पार्क करून ठेवतो त्याचप्रमाणे मोबाईल  *'मोबाईल पार्किंग'* च्या जागेत  पार्क  करावा?

*'मोबाईल पार्किंग'* कधी करावं?

अभ्यास करताना २. स्तोत्र/प्रार्थना म्हणताना ३. जेवताना, खाताना, पाणी पिताना ४. झोपण्यापूर्वी दोन तास

अशा या छान सोप्या युक्तीने आपले डोळे निरोगी ठेवू शकतो. चला तर लगेच मोबाईल पार्किंगसाठी जागा ठरवा आणि आपल्या मित्रमैत्रीणींनाही ही आयडिया सांगा.