आठवणीतला पाऊस

Story: माझी डायरी। राई राणे |
17th September 2023, 12:32 am
आठवणीतला पाऊस

माझं घर जणू सृष्टीदेवतेच्या ओंजळीत विसावलेलं आहे. सभोवताली दाटी-वाटी करून असलेली विविध प्रकारची अनेक दशकांची झाडे; ज्यात आजोबांनी लावलेले आंब्याचे विस्तीर्ण वृक्ष आणि आकाशाला भिडू पाहणारे शेकडो माड. घरामागून अखंड वाहणारी वाळवंटी नदी, समोरच्या बाजूला शे-दोनशे वर्षापूर्वीचे वडाचे झाड. सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत सुरू झालेला पक्ष्यांचा अविरत किलकिलाट. अशा वातावरणात मी राहते, वाढते आहे.

रविवारचा दिवस होता. दुपार टळली होती. मी बाहेर बसून निसर्गाच्या नाना तर्‍हा न्याहाळत होते. अंगणातल्या जास्वंदीवर दोन छोटे बुलबुल आपल्या बालक्रिडा करीत होते. झाडांच्या दाटीवाटीतून वाट काढत वारा वाहत होता आणि अचानक वर आकाशात काळ्या ढगांची गर्दी होताना दिसली. लख्ख प्रकाशात उजळलेलं आकाश ग्रहण लागल्यासारखं काळवंडलं. डोळ्यांना काळोख जाणवू लागला. त्या वातावरणाने मला माझ्या बालपणातल्या त्या दिवसाकडे नेले. ज्या दिवशी मी पहिल्यांदा पाऊस अनुभवला.

मी ओसरीत खेळत होते. तीन-चार वर्षांची असेन मी कदाचित. तसे पावसाचे दिवस नव्हते. आभाळ स्वच्छ दिसत होतं. इतक्यात अनपेक्षितपणे आभाळ भरून आलं आणि बघता बघता आभाळातून शिडकावा सुरू झाला आणि हळूहळू त्यानं पावसाचं रूप घेतलं. माझ्यासाठी हा अनुभव नवीनच होता. मी ओसरीत बसलेले असले तरी पावसाच्या पाण्याचे तुषार अंगावर, चेहर्‍यावर उडत होते. चेहऱ्यावर उडणारे पावसाचे थेंब मला घराबाहेर पडायला उत्तेजन देत होते.

नकळत माझी पावलं अंगणाकडे वळली. आजूबाजूला आईचा पत्ता नव्हता. ती मागच्या नारळाच्या बागेत फेरफटका मारायला गेली असावी. हीच संधी साधून मी माझी चिमुकली पावले थंडगार पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात ठेवली. त्यावेळचा पावसाचा प्रत्यक्ष स्पर्श आणि त्यानंतरचे मंतरलेले काही क्षण माझ्या डोळ्यांसमोरून जात नाहीत. त्या दिवशीचे आनदांचे वातावरण कदाचित वेगळेच काहीसे असेल. आजही असंच काहीसं जाणवत होतं.

बदललेल्या त्या वातावरणाने मी हरखून गेले. मी धावतच अंगणात आले. इतक्यात पावसाचा छोटासा गार थेंब माझ्या गालावर पडला. आणि बघता बघता पावसाने जोर धरला. मातीचा स्वर्गीय सुगंध वातावरणात दरवळला. झाडाची पाने धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाली होती. कदाचित त्यांनाही माझ्या इतकाच आनंद झालेला. पाखरं अंग चोरून बसलेली. आणि मी... मी देहभान विसरून पावसाच्या अधीन झाले. चिंब भिजून गेले होते मी. पावसाचा जोर वाढतच होता. माझ्या वाळवंटीलाही आनंदाचं उधाण येणार होतं.