प्रिगोझिनच्या हत्येमागे पुतीन यांचाच हात; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा दावा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
09th September 2023, 10:30 pm
प्रिगोझिनच्या हत्येमागे पुतीन यांचाच हात; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा दावा

कीव : रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी येवगेनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूवर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना खासगी लष्कर वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.
झेलेन्स्की यांनी आपल्या दाव्यासाठी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. गेल्या महिन्यात प्रीगोझिनचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. यावर अमेरिकेसह अनेक तज्ज्ञांनी पुतिन यांना जबाबदार धरले होते. मात्र, क्रेमलिनने हे आरोप फेटाळून लावले.
अशा परिस्थितीत आता युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी प्रीगोझिन यांच्या मृत्यूमागे पुतिन यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. झेलेन्स्की यांनी प्रीगोझिनच्या मृत्यूमागे पुतिन यांचा हात असल्याचा दावा कोणत्याही पुराव्याशिवाय केला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी राजधानी कीवमध्ये आयोजित एका परिषदेदरम्यान हे वक्तव्य केले.
पुतिन आता दुर्बल झाले आहेत!
आपल्या भाषणादरम्यान, झेलेन्स्की म्हणाले की जगाला सत्य माहिती आहे की पुतिन यांनीच प्रीगोझिनची हत्या केली. रशियन नेते आता राजकीयदृष्ट्या कमकुवत झाल्याचे या घटनेवरून दिसून येते. त्याच वेळी, रशियाच्या अध्यक्षीय कार्यालय क्रेमलिनने दावा केला आहे की अपघाताच्या सर्व संभाव्य कारणांची चौकशी केली जाईल. यापूर्वी, क्रेमलिनने पाश्चात्य देशांकडून उपस्थित केलेले प्रश्न पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे वर्णन केले होते.
प्रीगोझिन यांनी केलेले पुतीनविरुद्ध बंड
जूनच्या उत्तरार्धात वॅग्नरचे प्रमुख प्रिगोझिन यांनी एका छोट्या बंडाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर वॅगनरच्या सैन्याने मॉस्कोच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे पुतिन प्रशासन हादरले. कसा तरी या प्रकरणात हस्तक्षेप करून बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रकरण शांत केले. १९९९ मध्ये सत्तेत आल्यानंतर अध्यक्ष पुतिन यांच्या राजवटीला हे सर्वात मोठे आव्हान होते.

हेही वाचा