चिंताजनक! गोव्यात दर महिन्याला सरासरी २६ जण करतात आत्महत्या!

दहा वर्षांतील आकडेवारीतून स्पष्ट; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th September 2023, 04:14 pm
चिंताजनक! गोव्यात दर महिन्याला सरासरी २६ जण करतात आत्महत्या!

पणजी : गोव्यात गेल्या काही वर्षात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विविध कारणांमुळे राज्यात २०११ ते २०२१ या दहा वर्षांत ३,१५१ व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. याची सरासरी काढल्यास दर महिन्याला साधारणपणे २६ लोकांनी आपले जीवन संपवले आहे. गोव्यासारख्या लहान राज्यासाठी ही आकडेवारी चिंताजनक आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार, राज्यात दर लाख लोकसंख्येमागे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण देखील जास्त आहे. २०१९ मध्ये १ लाख लोकसंख्येत आत्महत्येचे प्रमाण १६.९ टक्के होते. २०२० मध्ये हे प्रमाण १९.९० टक्के तर २०२१ मध्ये २०.८० टक्के इतके होते. राज्याचे दर लाख माणसांमागील आत्महत्येचे प्रमाण राष्ट्रीय सरासरी पेक्षाही जास्त होते.

एनसीआरबीच्या अहवालात आत्महत्या करण्याची विविध कारणे स्पष्ट केली आहेत. यामध्ये मानसिक ताण, नैराश्य, व्यावसायिक किंवा करिअरमधील समस्या, एकटेपणा, छळ, कौटुंबिक समस्या, आर्थिक नुकसान, मद्यपानाचे व्यसन, दीर्घकालीन आजार यांचा समावेश आहे.

उद्या ( दि. १० ) रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आहे. आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांची लक्षणे वेळेस ओळखून त्यामध्ये हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. त्यांच्याशी बोलल्यास किंवा त्यांना स्वत:च्या भावना मोकळ्या करण्याची संधी दिल्यास त्यांच्या मनातून आत्महत्याचा विचार जाऊ शकतो, अशी माहिती गोमेकॉच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित डायस यांनी गोवन वार्ताशी बोलताना दिली आहे.

आपण सर्वजण कठीण काळातून किंवा दुःखातून जात असतो. याकडे सकारात्मक पद्धतीने बघितले पाहिजे. एक दिवस हा अनुभव आपल्याला मजबूत होण्यास नक्कीच मदत करेल, अशी आशा ठेवली पाहिजे. कुटुंब, समुदायाशी जोडलेले राहिल्यास आणि आरोग्य सेवा सहज उपलब्ध झाल्यास आत्महत्येचे विचार आणि वर्तन कमी होऊ शकते, असेही डॉ. डायस यांनी म्हटले आहे.

समाजात आत्महत्येला मिथक किंवा कलंक समजले जाते. याविषयी कोणीही उघडपणे बोलत नाही. परंतु, जर आपण या गोष्टी उघडपणे बोलल्या तरच आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीच्या मनात आशा जागृत होऊ शकते.

- डॉ. अमित डायस, सहाय्यक प्राध्यापक, सामाजिक औषध विभाग, गोमेकॉ