दिल्लीत दाखल झाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; बायडन यांची मोदींसोबत चर्चा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
09th September 2023, 12:44 am
दिल्लीत दाखल झाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; बायडन यांची मोदींसोबत चर्चा

नवी दिल्ली : दिल्लीत होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी परदेशी पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरूच आहे. शुक्रवारी (८ सप्टेंबर) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन हेही दिल्लीत पोहोचले. केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विमानतळावर स्वागत केले.

दिल्लीत पोहोचल्यानंतर बायडन यांनी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतली. जी सुमारे ५० मिनिटे चालली. पीएमओने या भेटीबाबत ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. त्यांच्या चर्चेत विविध मुद्द्यांचा समावेश होता आणि त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील.

बायडन यांचे स्वागत करून आनंद झाला!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचे स्वागत करताना आनंद झाला. आमची बैठक खूप अर्थपूर्ण होती. आम्ही भारत आणि अमेरिकेतील आर्थिक आणि नागरिक संबंधांशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा करू शकलो. आमच्या देशांमधील मैत्री जागतिक कल्याणासाठी मोठी भूमिका बजावत राहील.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी बैठकीपूर्वी सांगितले होते की, या बैठकीत दोन्ही नेते पंतप्रधान मोदींच्या जूनमधील अधिकृत अमेरिका भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांवरील प्रगतीचा आढावा घेऊ शकतात. ज्यामध्ये जीई जेट इंजिन डील, प्रीडेटर ड्रोन खरेदीचा समावेश आहे.

मोदी, बायडन यांची द्विपक्षीय बैठक

या बैठकीत ५जी आणि ६जी स्पेक्ट्रम, युक्रेन, नागरी आण्विक क्षेत्रातील प्रगती आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. जेक सुलिव्हन यांनी आखाती देश आणि इतर अरब देशांना जोडण्यासाठी अमेरिका भारत आणि अरब देशांसोबत एक मोठा रेल्वे करार जाहीर करण्याची योजना आखत असल्याच्या वृत्तांना पुष्टी दिली नाही, परंतु ते म्हणाले की हा एक उपक्रम आहे ज्यामध्ये अमेरिकेने आपल्या सहकार्यांसह प्रयत्न केला आहे.

ते म्हणाले की, आमचा विश्वास आहे की भारतापासून, संपूर्ण मध्यपूर्वेतील, युरोपशी कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे आणि यामुळे सामील असलेल्या सर्व देशांना महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ तसेच धोरणात्मक लाभ मिळतील. मात्र, याबाबत अद्याप फारसे काही सांगता येणार नाही. राष्ट्राध्यक्ष बायडन पंतप्रधान मोदींसोबत अधिकृत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यानंतर ते जी-२० नेत्यांसोबत अनेक बैठकांमध्ये सहभागी होतील.

बायडन देतील राजघाटलाही भेट

ज्यो बायडन व्हिएतनामला रवाना होण्यापूर्वी रविवारी राजघाट स्मारकालाही भेट देणार आहेत. जी-२० गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.

हेही वाचा