असे एकही क्षेत्र नाही, जिथे महिलांनी आपल्या गुणांनी, कर्तृत्वाने छाप पाडली नाही. घराची जबाबदारी सांभाळताना ती समाजात आपल्या आवडत्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याने स्वतःचा ठसा उमटवायचा प्रयत्न करत आहे. अशाच एका स्त्रीची आपण आज ओळख करून घेणार आहोत, त्या आहेत प्रसिद्ध मुलाखतकार श्रुती हजारे.
गोवा दूरदर्शन माध्यमाद्वारे श्रुती हजारे यांनी २०२२ पासून विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कलाकारांच्या मुलाखती घेताना त्यांना बोलते केले आहे. मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीचे अंतरंग जाणून घेताना त्याच्यातील कलागुण, त्यांनी व्यक्तिगत जीवनात पेललेली आव्हाने समाजासमोर कशी येतील हे श्रुती खुबीने विचारतात. मुलाखत झाली की त्यांच्या या खास शैलीचे कौतुक मुलाखत देणारा स्वत:च करतो, तेव्हा त्यांना आपल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटते.
मुलाखत घेताना समाजातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्या परंतु अजूनही प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या व्यक्तींविषयीचे गुण व त्यांची माहिती समाजाला व्हावी या हेतूने त्या समोरच्या व्यक्तीशी संवाद साधतात. हे सर्व करताना त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
श्रुती यांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून एम.ए.पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले आहे. गुरुकुल क्लासेस या प्रायव्हेट ट्यूशनच्या त्या संचालिका आहेत. दिवाळी आणि मे महिन्याच्या दीर्घ सुट्टीत त्या विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश आणि ग्रामर कोर्स शिकवतात. कविता करण्याचा त्यांचा छंद असून त्यांच्या कवितांतून त्यांनी अनेक सामाजिक विषय हाताळलेले आहेत. जीवनातील घडणार्या अनेक घटनांचे चित्रण आपल्या शब्दांतून त्या अतिशय सुंदरपणे व्यक्त करताना दिसतात.
दूरदर्शन तसेच यूट्युब चॅनेलवर विविध माननीय व्यक्तींच्या मुलाखती त्या घेत असतात. अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेताना त्यांच्या कार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचा त्यांना फार जवळून परिचय होतो. कोणत्याही घटनेकडे पाहायचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांचे आचार विचार कसे आहेत, या सर्व बाबींचा त्या अतिशय सखोलपणे अभ्यास करतात. याचेच पडसाद पुढे त्यांच्या कवितेत उमटत राहतात.
श्रुती यांना अभिनयाचीही आवड असून त्यांनी अनेक नाटक आणि शॉर्टफिल्म्समध्ये आपला अभिनय साकारला आहे. त्याचा फायदा त्यांना दूरदर्शनवर लाईव्ह कॅमेराला सामोरे जाताना झाला. स्टुडिओमध्ये अनकट, अनपॉज शूट चालू असताना सातत्याने योग्य, स्पष्ट आणि अचूक बोलण्याचे बंधन असते. सातत्याने योग्य, समर्पक अशा बोलण्याचा कळत नकळत कुठेतरी सकारात्मक ताण तुमच्यावर असतो. त्यामुळे श्रुती आपल्याच मुलाखतींचा अभ्यास करून आपल्यातील मुलाखतकार कसा अधिक प्रभावी ठरेल, याकडे लक्ष देत स्वतःला अपडेट ठेवताना दिसतात. आतापर्यंत विविध कार्यक्रमासाठी त्यांनी सूत्रसंचालन केले असून विविध वृत्तपत्रांतून सामाजिक जाणीव असलेल्या विषयांवर लेखनही केले आहे.
आजच्या चंगळवादाच्या दुनियेत आपली संस्कृती जतन आणि संवर्धन करण्याकडेही त्यांचा कटाक्ष असतो. आजची तरुण पिढी ही उद्याच्या बलवान भारत देशाचा पाया आहे. त्यासाठी मुलांवर लहानपणापासून संस्कार होणे आवश्यक होणे गरजेचे असते. यासाठीच मुलांच्या सुट्टीमध्ये संस्कार शिबीरे आणि छंद शिबीरांचे आयोजन करताना या शिबीरातील मुलांना संस्कार देण्यासोबत श्लोक, मंत्र यांची शिकवण देण्यातून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडल्याचे समाधान त्यांना मिळते.