केसांचे आरोग्य

सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले केस वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासले जातात. केस अकाली पांढरे होणे, केस तुटणे, केसात कोंडा होणे अशा विविध समस्या आपल्या केसांच्या बाबतीत झालेल्या हल्गर्जीपणामुळे उद्भवलेले असतात. केसांची योग्य काळजी न घेणे, चुकीच्या पद्धतीने कापलेले केस किंवा विटामिन/प्रोटिंन्सच्या अभावामुळे या समस्या उद्भवू शकतात.

Story: लावण्यव 'ती' | शिल्पा च्यारी |
01st September 2023, 10:25 pm
केसांचे आरोग्य

आजकाल स्त्री असो किंवा पुरुष केसांच्या विविध समस्यांनी सगळेच ग्रासलेले असतात. खास करून कोविड येऊन गेल्यानंतर माणसांच्या त्वचा, आरोग्य, नखे, याबरोबरच आपल्या केसांवरही परिणाम झाला. केस गळती, केस तुटणे हे तर सर्रास आजकाल दिसून येतं. या सगळ्या समस्यांसाठी आपल्या जीवनशैलीत आपण योग्य तो बदल केल्यास या समस्या चुटकीसरशी छू मंतर होऊन जातील. 

केसांचे आरोग्य आपल्या आरोग्यावरच अवलंबून असते. आपल्या शरीरातील रक्ताभिसरण ( Blood circulation) योग्य प्रकारे होत असल्यास त्यायोगे केसांच्या मुळांचे पोषण योग्य प्रकारे होते. यामुळे केसांची मुळे घट्ट होतात. परिणामी केस गळणे, तुटणे यासारख्या समस्या होत नाहीत.

 आयुर्वेदानुसार पाहायला गेल्यास पित्तदोष प्रकृती असलेल्यांना केस गळणे, केसात कोंडा होणे वगैरे केसांच्या समस्या होतात. यासाठी आहारात पित्त वाढवणारे पदार्थ म्हणजे तेलकट, आंबट, खारट, मसालेदार पदार्थ खाणे कमी केले पाहिजे. त्या ऐवजी आहारात दूध व दुधाचे पदार्थ, मांस, अंडी, हिरव्या भाज्या, फळे यांचा अधिक समावेश झाला पाहिजे.

 केसांच्या आरोग्यासाठी केसांना तेलाने मालिश करणे उत्तम. भृंगराज, आवळा, जटामांसी अशा आयुर्वेदिक घटकांनी युक्त असलेले तेल आजकाल बाजारात उपलब्ध आहे. कोणतेही केमिकल न वापरलेले असे आयुर्वेदिक तेल घेऊन रोज रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळाशी या तेलाने मालिश करा. यामुळे केस मजबूत व घनदाट होतात.

 केस नियमित आठवड्यातून दोनदा धुतलेच पाहिजेत. त्यासाठी एखादा माईल्ड शाम्पू वापरावा. केस मोकळे सोडून नीट धुवून घ्यावेत म्हणजे केसांचा गुंता होत नाही.

 केस वाढवण्यासाठी ड्रायरचा वापर कमीत कमी करावा. ते नैसर्गिकपणे कोरडे होऊ द्यावेत. टॉवेलने न घासता केस पाच ते सात मिनिटे टॉवेलमध्ये गुंडाळून हलक्या हाताने पुसावेत.

 ओले केस कधीही विंचरू नयेत. केस नियमित विंचरणे चांगले असते. रक्तभिसरण जर व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर कमीत कमी १०० वेळा केसात कंगवा फिरवणे चांगले. केस विंचरायच्या आधी गुंता बोटांनी सोडवून घ्यावा.

 कंडिशनरच्या वापराने केस मजबूत आणि चमकदार होतात त्यामुळे आठवड्यातून एकदा केसांना कंडिशनर लावावा.