कंबरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे

Story: विशेष | डॉ. सोनाली सरनोबत |
25th August, 10:54 pm
कंबरेच्या वेदना किंवा कंबर दुखणे

ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे, व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली, कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे यासारख्या गोष्टींमुळे अगदी तरुण वर्गात सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. एकाच जागी खूप वेळ बसून काम करणे सुद्धा याला कारणीभूत आहे. सुरुवातीला या वेदना अतिशय कमी असतात आणि त्यामुळे आपण त्याकडे फार लक्ष देत नाही. पण जस जसा काळ लोटतो आणि आपण यावर काहीच उपाय करत नाही तेव्हा या वेदना अतिशय वाढतात. इतक्या वाढतात की त्या कधीही त्रास देऊ शकतात. अशावेळी मग वैद्यकीय सल्ला घेण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यामध्ये खर्च सुद्धा खूप येतो. 

कंबरदुखीची मुख्य कारणे

कंबरदुखीची काही मुख्य कारणे आपण पाहूया. जर हे करणे तुम्ही थांबवले तर त्याचा सुद्धा फायदा दिसू शकतो, अतिशय मऊ गादीवर झोपणे, जास्त काळ हाई हिल परिधान करणे, जास्त वजन वाढणे, शरीरात कॅल्शियमची कमतरता भासणे, तासनतास एकाच जागेवर बसणे, शारीरिक हालचाल जास्त न करणे, व्यायाम करायला टाळाटाळ करणे, योग्य स्थितीमध्ये न बसणे यासारख्या काही गोष्टी मुख्यत: कंबरदुखीला कारणीभूत असतात. त्यामुळे उपचारासोबत या गोष्टी करणेसुद्धा थांबवावे.

साधारणत: दर दहा व्यक्तींमध्ये आठ व्यक्तींनी आयुष्यात मानदुखी व कंबरदुखी कधी ना कधी अनुभवली असते. दैनंदिन जीवनातील बदलती जीवनशैली व चुकीच्या पध्दतीने हाताळलेल्या शारीरिक हालचाली ही प्रामुख्याने या व्याधींच्या प्रमाणात वाढ होण्यास कारणीभूत आहे. मात्र सांधेरोपणाप्रमाणे मणक्यांचे रोपण होऊ शकत नाही. म्हणूनच मणक्यांच्या आजारावरील उपाययोजना समजून घेणं गरजेचं आहे.

मानवी पाठीचा कणा हा मणके व दोन मणक्यांमधील गादी अशा पध्दतीने ही एक मालिका असते. एकूण ३३ मणक्यांनी ही मालिका बनलेली असते. त्यात ७ मानेचे मणके (सर्व्हायकल), १२ मणके पाठीचे (थोरॅसिक), ५ कंबरेचे (लंबार), ५ जोडलेले सेक्रम आणि ४ जोडलेले मणके (कॉसीक्स) असे असतात. हे मणके एकत्र जोडले जाऊन एक पोकळी निर्माण होते. त्यातून नसांचे बंडल डोक्यापासून कंबरेपर्यंत जाते त्याला मज्जारज्जू संस्था अर्थातच स्पाईनल कॉर्ड म्हणतात. दोन मणक्यांच्या मधून असलेल्या पोकळीतून क्रमश: डावी व उजवी नस निघते. या नसा स्नायूंना ताकद व त्वचेला संवेदना देतात. ज्यावेळी या नसांवर ताण येतो त्यावेळी वेदना होतात.

ज्या ठिकाणी या नसांवर दबाव येतो जसे मानेतील मणक्यांजवळ अथवा कंबरेच्या मणक्यांजवळ त्याप्रमाणे क्रमश: वेदना होतात. तळ हातात तसंच पायात, पोटरीत व तळ पायापर्यंत वेदना होतात. त्याचप्रमाणे हातापायाला येणाऱ्या मुंग्या यामुळेच जाणवतात. अतीव दाबामुळे क्वचित रुग्णांना स्नायूंची ताकद कमी झाल्याचं जाणवतं. मणक्यांना आधार देण्यासाठी व सुयोग्य हालचालींसाठी ही मणक्यांची रचना लिगामेंटस व स्नायूंनी सक्षम असते.

९०% मानदुखी व कंबरदुखी ही यांत्रिक स्वरुपाची अर्थातच मेकॅनिकल असते. हाताच्या बोटांना जर मागच्या दिशेने वळवलं व त्याच स्थितीतील अधिक काळ दाब दिल्यास वेदना निर्माण होऊन जोपर्यंत दाब कमी होत नाही तोपर्यंत वेदना वाढते व स्नायूंच्या भागात पसरते. ही वेदना एक शारीरिक संकेत असतो. पुढे होणारी इंज्युरी टाळण्यासाठी हाच प्रकार मणक्यांमधील वेदना निर्माण होण्यास कारणीभूत असतो.

मानदुखी व कंबरदुखीचे प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या उठण्याच्या व बसण्याच्या पध्दती जसे १) खूप वेळ बसणं, २) जास्त वेळ वाकून काम करणं, ३) पुन्हा पुन्हा वाकावं लागणं, ४)जड वस्तू उचलणं, ५) चुकीचा ताण पडेल अशा स्थितीत झोपणं.

मी दररोज व्यायाम किंवा योगासने करतो/ करते त्यामुळे मला मानदुखी किंवा कंबरदुखी होऊ शकत नाही. अशा प्रकारचे समज, गैरसमजामुळे योग्य उपचारपध्दती मिळण्यास विलंब होतो व तेवढाच जास्त काळ रिकव्हरीला लागतो. तसंच यामुळे निष्क्रियता वाढते, दैनंदिन जीवनातील कार्यशील जीवनशैली मंदावते, त्यामुळे नैराश्य, चिडचिड होणं, कुणावर तरी आपण निर्भर असल्याची भावना न्यूनगंड निर्माण करते, सामाजिक कार्यात सहज सहभागी होण्यास स्वारस्य राहत नाही. थोडक्यात काय तर या वेदना या रुग्णाचे दैनंदिन जीवन विस्कळीत करतं.

उपचार पध्दती

फिजीओथेरपीद्वारा अशा प्रकारच्या कंबरदुखी व मानदुखीवर सहज मात करता येते.

रुग्णांना वेदना मुक्तीसाठी महत्त्वाची टीप म्हणजे होणाऱ्या वेदना दोन दिवसांपेक्षा अधिक काळ असतील तर त्वरीत योग्य मार्गदर्शन घेणं. 

उपचार

तज्ज्ञ होमिओपॅथिक डॅाक्टर व व्यायाम यांच्या एकत्रित मार्गदर्शनाने व उपचाराद्वारे वेदनामुक्ती सहज शक्य आहे. तुमच्या मणक्यांचे आरोग्य तुमच्या हातात, हे लक्षात ठेवा.

रूटा, रसटॅाक्स, प्लंबम मेट, लेडम पाल सारखी औषधे वापरता येतात. मणके पूर्णतः पूर्ववत होत नाहीत, परंतु झीज होण्याचे प्रमाण कमी होते. दुखणे ९०% कमी होते.