बाणस्तारी अपघात प्रकरणी मेघनाला निर्देश; दोन आठवड्यांत २ कोटींची सुरक्षा रक्कम जमा करा

अपघातग्रस्तांचे नुकसान, वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्देश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd August 2023, 11:23 am
बाणस्तारी अपघात प्रकरणी मेघनाला निर्देश; दोन आठवड्यांत २ कोटींची सुरक्षा रक्कम जमा करा

पणजी : बाणस्तारी अपघातात तिघांचा बळी घेणाऱ्या मर्सिडिझ कारची मालकीण मेघना सिनाय सावर्डेकर हिने अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला आणि जखमींना वैद्यकीय खर्चापोटी २ कोटी रुपये देण्याचे मान्य केले असून ही सुरक्षा रक्कम २ आठवड्यांत न्यायालयात जमा करावी, असे निर्देश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जारी केले आहेत. मात्र, या रकमेचा मूळ भरपाईच्या रकमेवर जो निर्णय होईल त्यावर काहीही परिणाम होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा

बाणस्तारी अपघात; तपासाची सूत्रे निधीन वाल्सन यांच्या हाती

बाणस्तारी अपघातातील जखमींना सर्व अपघाती लाभ देणार !

भरधाव मर्सिडिझची तीन गाड्यांना धडक, बाणस्तारी पुलावर तिघे ठार

दि. ६ ऑगस्ट रोजी बाणस्तारी येथे झालेल्या भीषण अपघातात सुरेश फडते (५८), भावना फडते (५२, दोघेही रा. दिवाडी) व अरुप करमाकर (२६, रा. बांदोडा) या तिघांचा मृत्यू झाला. तर, वनिता भंडारी (२१, रा. सांताक्रूझ-फोंडा), शंकर हळर्णकर (६७, रा. बाणस्तारी), राज माजगावकर (२७, रा. ताळगाव) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते.


यालाच अनुसरून पोलिसांनी वैद्यकीय चाचणी व चौकशीसाठी नोटीस बजावून १० रोजी स्थानकावर हजेरी लावण्याची सूचना मेघनाला केली होती. याला मेघनाने गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. यावर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी मेघनाने न्यायालयाला स्वतःहून २ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. यांतील ५० लाख रुपये फडते कुटुंबाला तर ५० लाख रुपये अरुप करमाकर यांच्या कुटुंबाला दिले जातील. तसेच जखमींना प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र, भरपाईविषयी न्यायालयात प्रकरण प्रविष्ठ आहे. त्या प्रकरणावर या रकमेचा काहीही संदर्भ राहणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


मेघनाच्या अटकपूर्व जामिनावर आता २५ रोजी सुनावणी

दरम्यान, सोमवारी कार मालक मेघना सिनाय सावर्डेकर व तिच्या एका मुलाचा जबाब सोमवारी फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात घेण्यात आला. तर मेघना हिने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता फोंडा येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.