भरधाव मर्सिडिझची तीन गाड्यांना धडक, बाणस्तारी पुलावर तिघे ठार

पाच वाहनांचा अपघात : तिघे जण उपचारांसाठी गोमेकॉत दाखल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
06th August 2023, 09:31 pm
भरधाव मर्सिडिझची तीन गाड्यांना धडक, बाणस्तारी पुलावर तिघे ठार

पणजी : चुकीच्या बाजूने समोरून भरधाव आलेल्या मर्सिडिझ कारने तीन कार व दोन दुचाकींना धडक दिल्याने बाणास्तरी पुलावर भीषण अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला, तर तिघा जणांना उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. एकूण पाच वाहनांचे यात नुकसान झाले आहे. मर्सिडिझ चालक दारूच्या नशेत असल्याचा संशय आहे. अपघातानंतर कारमधून बाहेर पडून त्याने घटनास्थळावरून पोबारा केला. अपघातग्रस्त मर्सिडिझमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

दांपत्यासह तिघांचा मृत्यू, तिघांवर जीएमसीत उपचार

बाणस्तारीतील अपघातात सुरेश फडते (५८), भावना फडते (५२, दोघेही राहणार दिवाडी), अरुप करमाकर (२६, रा. बांदोडा) या तिघांचा मृत्यू झाला, तर वनिता भंडारी (२१, रा. सांताक्रूझ-फोंडा), शंकर हळर्णकर (६७, रा. बाणस्तारी), राज माजगावकर (२७, रा. ताळगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जीएमसीत उपचार सुरू आहेत.


बाणस्तारी पूल वाहतुकीने नेहमीच गजबजलेला असतो. अशातच रविवारी रात्री​ ८ वाजण्याच्या सुमारास या पुलावर अपघात घडला. एक भरधाव मर्सिडिझ कारने तीन कारना तसेच दोन दुचाकींना धडक ​दिल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सहा जण जखमी झाले. त्यांना तातडीने बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. 


या अपघातात एक दुचाकी सापडली असून दोन कारच्या मध्ये सापडल्याने दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. 


स्थानिक प्रचंड संतप्त

घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. दरम्यान, या अपघातामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. आलिशान गाड्या भरधाव चालविणारे सर्वसामान्यांच्या जीवावर उठले असून अशा बेफिकीर लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मृतांत दांपत्याचा समावेश

मृतांत एका दांपत्याचा समावेश असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातादरम्यान कारच्या धडकेने एक व्यक्ती उसळून पुलाखाली पडल्याचे दिसून आले. जोपर्यंत मर्सिडिझचालक घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत या अपघाताला कारणीभूत ठरलेली मर्सिडिझ कार हटवू देणार नसल्याचा पवित्रा स्थानिकांनी घेतला.