भारताचा एचएस प्रणॉय ठरला मलेशिया मास्टर्स सुपर विजेता

संपवला ६ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ


28th May 2023, 11:59 pm

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

क्वालालंपूर : जागतिक क्रमवारीत ९व्या स्थानावर असलेला भारताचा अनुभवी शटलर एचएस प्रणॉयसाठी रविवारचा दिवस संस्मरणीय ठरला. प्रणॉयने ६ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. त्याने मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रणॉयने तीन गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात चीनच्या वेंग हाँग येंगचा पराभव करून प्रथमच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूररचे विजेतेपद पटकावले.

३० वर्षीय प्रणॉयने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानावर असलेल्या वेंगचा २१-१९, १३-२१, २१-१८ असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. हा सामना ९४ मिनिटे चालला. यावर्षी प्रथमच भारतीय खेळाडू एकेरीचे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. प्रणॉयने गेल्या वर्षी थॉमस कपमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती, परंतु २०१७ च्या यूएस ओपन ग्रँड प्रिक्स गोल्डनंतर त्याने वैयक्तिक विजेतेपद जिंकले नव्हते. 

केरळच्या या शटलरने गेल्या वर्षी स्विस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचून विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या जवळ पोहोचला होता. याशिवाय मलेशिया आणि इंडोनेशिया सुपर १००० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्यातही प्रणॉयला यश आले. प्रणॉयने २०२१ च्या उत्तरार्धापासून अनेक दुखापती आणि आरोग्य समस्यांशी झुंज दिल्यानंतर सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

प्रणॉय मिळाले मेहनतीचे फळ

प्रणॉयने गेल्या दोन वर्षांत भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक सातत्य राखले आहे, परंतु असे असूनही तो बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरचे विजेतेपद जिंकू शकला नाही. जागतिक क्रमवारीत ९व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयच्या मेहनतीचे रविवारी फळ मिळाले. त्याने २३ वर्षीय चिनी खेळाडूविरुद्ध जेतेपद पटकावले. प्रणॉयने या आठवड्यात चमकदार कामगिरी करत विजेतेपदाच्या शर्यतीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या चौ तिएन चेन, ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंग आणि जपानच्या केंटा निशिमोटो यांना पराभूत केले.