मनीष सिसोदियांनी नष्ट केले दोन फोन

सीबीआयचा दावा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th May 2023, 11:55 pm
मनीष सिसोदियांनी नष्ट केले दोन फोन

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात, सीबीआयने आपल्या पुरवणी आरोपपत्रात मनीष सिसोदिया यांनी दोन फोन नष्ट केल्याचा दावा केला आहे. २५ एप्रिल रोजी सीबीआयने राऊस एव्हेन्यू कोर्टात हे आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेतली आहे. मनीष सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यासाठी न्यायालयाने तुरुंग प्राधिकरणाच्या नावाने प्रॉडक्शन वॉरंट जारी केले.

सिसोदिया यांच्याशिवाय सीए बुची बाबू गोरंटला, मद्यविक्रेते अर्जुन पांडे आणि अमनदीप धल्ल यांनाही समन्स पाठवण्यात आले आहेत. या सर्व आरोपींना २ जून रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात दावा केला आहे की, सिसोदिया यांनी त्यांचे दोन फोन नष्ट केल्याचीही कबुली दिली आहे. १ जानेवारी २०२० ते १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत सिसोदिया यांनी तीन मोबाईल हँडसेट वापरल्याचे तपासात समोर आले आहे.

२२ जुलै २०२२ पूर्वी वापरलेले दोन हँडसेट नष्ट करण्यात आले आहेत. सिसोदिया यांनी सीआरपीसीच्या कलम ९१ अंतर्गत पाठवलेल्या नोटिसीला दिलेल्या उत्तरात याची पुष्टी केली आहे.