केवळ नर्सरीचे वर्गच ३ जुलैपासून

केजी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५ जूनपासूनच; शिक्षण संचालकांची माहिती


29th May 2023, 12:40 am
केवळ नर्सरीचे वर्गच ३ जुलैपासून

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : येत्या शैक्षणिक वर्षापासून नर्सरी ते तिसरीपर्यंतच्या वर्गांसाठी ३ जुलै २०२३ पासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परंतु, केवळ नर्सरीचे वर्ग ३ जुलैपासून सुरू होतील. इतर वर्ग ५ जूनपासूनच सुरू होतील, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.            

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नर्सरी ते तिसरीपर्यंतच्या वर्गांसाठी ३ जुलैपासून या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. धोरणाअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण, साधनसुविधा आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम जून महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी केवळ नर्सरीचे वर्ग ३ जुलैपासून आणि केजी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे झिंगडे म्हणाले.             

दरम्यान, नव्या शैक्षणिक धोरणानुसार नर्सरी ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांशिवाय शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण खात्याने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे.

खासगी शाळा मात्र ५ जूनपासूनच सुरू : शेट्टी            

अखिल गोवा विनाअनुदानित शाळा असोसिएशननेही असोसिएशनमध्ये नोंदणीकृत असलेल्या ५० ते ५५ पूर्व प्राथमिक खासगी शाळांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांचे वर्ग ५ जूनपासून सुरू होणार असून, तेथेही ३ जुलैपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी म्हटले आहे.             

तीन वर्षे वयोगटातील विद्यार्थी शालेय शिक्षणप्रणालीमध्ये नवीन असल्याने, त्यांना जुळवून घेण्यास वेळ लागेल. त्यामुळे त्यांचे वर्गही ५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे त्यांनी नमूद केले.            

हेही वाचा