दिल्लीत मुसळधार पाऊस; चार विमान उड्डाणे जयपूरकडे वळविली

७० किमी प्रतितास वाऱ्याचा वेग; सात राज्यांत ३१ मेपर्यंत पाऊस


28th May 2023, 12:18 am
दिल्लीत मुसळधार पाऊस; चार विमान उड्डाणे जयपूरकडे वळविली

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : सात राज्यांमध्ये ३१पर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राजधानी दिल्लीत शनिवारी सकाळी कडाक्याची उष्णता जाणवत असताना विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दिल्ली-एनसीआरच्या भागात ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू लागले आणि रस्ते जलमय झाले. पुढील दोन-तीन दिवस दिल्लीत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

वादळ आणि पावसाच्या खराब हवामानामुळे विमानतळावरील उड्डाणे प्रभावित झाल्याचे विमानतळाने प्रवाशांना सांगितले. अशा परिस्थितीत प्रवाशांनी उड्डाण करण्यापूर्वी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खराब झाल्याने चार उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आली आहेत.

मध्य प्रदेश : या राज्यातील बदललेल्या हवामानामुळे नवतपाच्या दुसऱ्या दिवशीही थंडी कायम होती. शुक्रवारी भोपाळसह २२ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि जोरदार वारे वाहू लागले. २९ जिल्ह्यांतही पाऊस झाला. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात ४० मिमी पाऊस झाला. यासोबतच मे महिन्यातील पावसाचा गेल्या दहा वर्षांचा विक्रमही मोडला.

हरियाणा-पंजाब-हिमाचल : हिमाचल, पंजाब आणि हरियाणामध्ये शुक्रवारी झालेल्या पावसामुळे तापमानात सुमारे ९ अंशांनी घट झाली आहे. हिमाचलमध्ये पावसामुळे ९ रस्ते बंद झाले आहेत. पंजाबमध्ये शुक्रवारी ३.३ मिमी पावसाची नोंद झाली.

राजस्थान : जयपूर हवामान केंद्राचे संचालक राधेश्याम शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी नवतपामध्ये तीव्र उष्णता असणार नाही. नवतपामध्ये दिवस आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहील. त्याचवेळी मेघगर्जनेचा कालावधी २९ मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. २७ मे रोजी बिकानेर, जयपूर, भरतपूर, अजमेर, कोटा विभागातील जिल्ह्यांमध्ये गडगडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

झारखंड : शुक्रवारी राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका होता, मात्र सायंकाळपर्यंत पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान अनेक ठिकाणी गाराही पडल्या. रांचीमध्ये वादळामुळे झाडे पडल्याने दोन कारचे नुकसान झाले आहे. हवामानतज्ज्ञ अभिषेक आनंद यांनी सांगितले की, उत्तर बिहार ते उत्तर ओडिशा आणि हरियाणा ते सिक्कीमपर्यंत मान्सूनची ट्रफ लाइन झारखंडमधून जात आहे.

मान्सूनच्या आगमनापूर्वीच अल-निनोचा प्रभाव

देशात मान्सूनने अद्याप दस्तकही दिली नाही. तोच एल-निनोने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जूनमध्ये पाऊस कमी आणि उष्मा जास्त येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मान्सूनच्या हंगामात सामान्यपेक्षा ९२ टक्के कमी पाऊस पडेल.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम आणि दक्षिण भारतात मध्यम पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये पाऊस न पडल्याने येत्या काही महिन्यांत त्याची भरपाई होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे.