दामोदर मावजोंना ज्ञानपीठ प्रदान

मावजोंकडून साहित्याद्वारे समाजाला एकत्र आणण्याचेच प्रयत्न : राज्यपाल


28th May, 12:17 am
दामोदर मावजोंना ज्ञानपीठ प्रदान

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो. सोबत मंत्री गोविंद गावडे, गुलजार, प्रतिभा रे, वीरेंद्र जैन व इतर. (नारायण पिसुर्लेकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : प्रसिद्ध गोमंतकीय साहित्यिक दामोदर मावजो यांना शनिवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुप्रसिद्ध गीतकार गुलजार, भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष वीरेंद्र जैन, ज्ञानपीठ निवड समितीच्या अध्यक्ष प्रतिभा रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशाचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार वितरण प्रथमच राजभवनात होत असल्याचा आणि तो आपल्या हस्ते देण्यात आल्याचा आपल्याला विशेष आनंद झाल्याचे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले. लेखणी तलवारीपेक्षा बलशाली असते. समाज बदलण्याची ताकद लेखणीमध्ये असते. साहित्यिक दामोदर मावजो अनेक वर्षांपासून साहित्याच्या माध्यमातून हेच काम प्रभावीपणे करत आहेत. त्यामुळेच त्यांना ‘ज्ञानपीठ’सारखा सर्वोच्च साहित्य पुरस्कार प्राप्त झाला, असे ते म्हणाले. भारताची​ साहित्य परंपरा ही मानवतेइतकीच जुनी आहे. रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असून, देशाला एकत्र आणण्याचे महान कार्य केले आहे. दामोदर मावजो यांचे साहित्यही समाजाला एकत्र आणण्याचेच काम करत आहे, असेही राज्यपालांनी नमूद केले.                   

दरम्यान, दामोदर मावजो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे गोव्याचे दुसरे साहित्यिक ठरले आहेत. याआधी २००८ मध्ये रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. मावजो यांची सुमारे २५ पुस्तके कोकणी भाषेत आणि एक पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कथा, कादंबरी, लघुकथा, पटकथालेखन, स्तंभ लेखन, नाट्य लेखन, निबंध, समीक्षा अशा विविध प्रकारांत त्यांनी लिखाण केले आहे. १९८१ मध्ये आलेली ‘कार्मेलिन’ ही त्यांची कादंबरी बरीच गाजली होती. या कादंबरीला १९८३ साली साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. या कादंबरीचे हिंदी, मराठी, इंग्रजी, पंजाबी, सिंधी, तामिळ, उडिया, मैथिली अशा भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

मावजोंच्या साहित्यात वास्तवाचे प्रतिबिंब : गुलजार

साहित्यिक दामोदर मावजो यांनी आपली​ माती, समाज, भाषा, लोक यांच्याशी असलेली नाळ कधीही तोडली नाही. समाजाशी त्यांचे घट्ट नाते आहे. समाजातील वास्तव ते आपल्या साहित्यातून सातत्याने मांडत आहेत. साहित्याच्या क्षेत्रातील इतक्या वर्षांच्या मेहनतीचे फळ म्हणूनच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला, असे सुप्रसिद्ध गीतकार गुलजार म्हणाले. भाषांना ‘स्थानिक’ म्हणून चौकटीत अडकवणे चुकीचे आहे. देशातील सर्वच भाषा श्रीमंत आणि समृद्ध आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

मावजोंना पुरस्कार हा गोव्याचा सन्मान : गावडे

मंंत्री गोविंद गावडे म्हणाले, भाषेला सीमा नसतात. ज्या भाषेतून संस्कार घडले, त्याच भाषेतून दामोदर मावजो आपल्या भावना साहित्याच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवत आहेत. चुकते ते दाखवणारी माणसे ज्या प्रदेशात असतात, त्याच प्रदेशाचा सर्वांगीण विकास होत असतो. दामोदर मावजोंच्या साहित्यातून हेच दिसून येते, असे ते म्हणाले. दामोदर मावजोंना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा संपूर्ण गोव्याचा सन्मान आहे. अशा पुरस्कारांमुळे नवसाहित्यिकांना प्रेरणा, ऊर्जा मिळत असते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा