मालदीवची माझी सफर

मालदीवची माझी सफर माझ्या इतर देशांच्या सफरींपेक्षा (आणि इतर लोकांच्या ‘मालदेवियन रोमँटिक एस्कपेड्स’पेक्षा) निराळी होती. माझ्या वर्गमैत्रिणींबरोबर केलेली ही माझी पहिली वाहिली ट्रिप. लहानपणापसून ज्यांना ओळखत होते अशा माझ्या दोन जीवाभावाच्या मैत्रिणी आणि मी, आमचं त्रिकूट आपापल्या वाट्याला आलेले आयुष्यातले संघर्ष विसरून (आणि विसरायला) मालदीवला निघालं होतं.

Story: प्रवास | भक्ती सरदेसाई |
27th May 2023, 11:03 pm
मालदीवची माझी सफर

मालदीवची राजधानी आणि सगळ्यात जास्ती लोकवस्ती असलेलं ‘माले बेट’ वगळून सरळ एखाद्या रिमोट लोकेशनला जाता येईल का असा शोध सुरू असताना, “स्काय स्कॅनर” च्या मदतीने, आम्हाला ‘गण’ नावाचं एक बेट दिसलं. मालदीवच्या दक्षिण टोकाला असलेल्या ‘अड्डू अटॉल’ नावाच्या द्वीपसमूहामधलं हे एक बेट. इथेही इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं. विमानाची तिकिटं मुंबई ते माले या प्रवासापेक्षा स्वस्त निघाली. मात्र थेट फ्लाईट नव्हती. श्रीलंकेत एक छोटासा विश्राम होता. आणि मग श्रीलंका ते गण, असा प्रवासाचा दुसरा टप्पा होता. एकंदर विचार केल्या आम्हाला हीच फ्लाईट सोयीची नि स्वस्त वाटली. आणि आम्ही तिची तिकिटं काढली. 

तिकीटं काढताना थोडी गडबड झाली आणि माझं नाव पासपोर्ट वर असलेल्या नावापेक्षा वेगळं नोट झालं. अशी चूक मग इम्मिग्रेशनच्या वेळी डोकेदुखी ठरते, म्हणून मग ज्या साईट वरून बुक केली होती, त्या साईटच्या हेल्पलाइन शी मी पुढचा एक तास बोलून झालेली चूक दुरुस्त करून घेतली. नशीब! वेळेत लक्षात आली आणि दुरुस्तही झाली. 

प्रवास लांबलचक होता. संपता संपेना पण जाणवला नाही. आम्ही मस्त गप्पा मारत मारत गोवा ते मुंबई ट्रेनने आणि मुंबई ते कोलंबो फ्लाईटने कधी पोहोचलो तेच कळलं नाही. मुंबई एअरपोर्ट वर under nineteen क्रिकेट सामन्यासाठी जाणारी टीम इंडिया भेटली. तेही आमच्या बरोबरच कोलंबोपर्यंत आले. कोलंबो एअरपोर्ट वर रात्र घालवायची होती. Lounge access मिळेना, आणि मऊ मऊ खुर्च्यासुद्धा कुठेच दिसेनात. त्यामुळे पूर्ण रात्र मेटलच्या खुर्च्यांवर बसून घालवली.

 पुढे मग परत इम्मिग्रेशन सिक्युरिटी इत्यादी इत्यादी. पहाटे पाऊणे सहाचं विमान होतं. विमानात मात्र कोणीच नाही. मोजके लोक सोडले तर विमान रिकामं. इतकं मोठं विमान आणि इतका मोठा प्रवास (खरंतर प्रवास २ तासंचाच होता पण आंतरराष्ट्रीय असल्यामुळे मोठा वाटला) असूनही रिकामी जागा पाहून भरपूर पेट्रोल फुकट गेलं असा विचार मनात आला. आणि मी चुटपुटले. 

आम्ही गण इंटरनॅशनल एअरपोर्टवर सकाळी साधारण आठ वाजता उतरलो. आदल्या रात्री झालेला निद्रानाश आणि एकंदर प्रवासाचा थकवा असूनही, विमान खाली उतरताना मालदीव बेटांचं पहिलं दृश्य पाहिलं आणि मी सगळा त्रास विसरून गेले. मनाला मोहून घेणारं हे दृश्य मी कधीही विसरणार नाही. हलक्या निळ्या रंगाचं पाणी आणि मधोमध असलेलं आमचं ‘अड्डू अटॉल’. आमच्या या द्वीसमूहातल्या एका बेटावर विमानसाठी बांधलेला रनवे स्पष्ट दिसत होता. या विमानतळ असलेल्या आमच्या गण बेटाला टेकून असणाऱ्या दुसऱ्या एका बेटावरचं ‘शांग्री-ला’ ही स्पष्ट दिसलं. पाण्यात बांधलेले ‘water villas’ पाहिले आणि एक क्षण वाटलं की ‘इथे का नाही आपण आपला मुक्काम बुक केला?’ पण मग त्यांचा दर रात्री पाठीचा दर आठवला आणि आम्हाला अगदी स्वस्तात मिळालेलं लक्झरी रिसॉर्टंच बरं वाटू लागलं. 

विमान हलकेच लॅंड झालं. स्मूथ लँडिंगची मजाच निराळी. त्यात भर म्हणजे विमातळावर अगदी रॉयल ट्रीटमेंट मिळाली. त्यामुळे तिघिंचाही मूड सुधारला. हे विमानतळ एखाद्या सामान्य २BHK फ्लॅट इतक्याच आकाराचं. मोजकेच लोक इथे कामाला होते. ‘इंडियन पासपोर्ट होल्डर’ म्हणून आम्हाला अगदी स्पेशल वागणूक देत होते. भारतीयांना मालदीव पाहायला व्हिसा लागत नाही. इम्मिग्रेशनचा अनुभवही फर्स्ट क्लास - ना फी द्यावी लागली, ना कोणतेही प्रश्न विचारले गेले. आमच्या पुढे असलेल्या फिरंगी जोडप्याला मात्र पैसे वगैरे काढून दाखवावे लागले होते. असो, निदान इथे तरी भारतीयांना चांगली वागणूक मिळते यातच आम्ही धन्यता मानली आणि पुढे निघालो.

क्रमशः