उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा
पणजी : मेरशी येथील ‘शांताबन’ वसाहतीजवळ निर्माणाधीन इमारतीत २०१६ मध्ये झारखंड येथील बिश्वनाथ मेहर (४८) या मजुराचा खून झाला होता. या प्रकरणी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी हिरा लोहर याला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडांची शिक्षा ठोठावली आहे. हा निवाडा सत्र न्यायाधीश शेरीन पाॅल यांनी दिला आहे.
या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार, मेरशी येथील शांताबन वसाहतीजवळ ‘पूनम शांती’ वसाहतीचे बांधकाम सुरू होते. यातील एका इमारतीच्या पहिला मजल्यावर १५ जुलै २०१६ रोजी सकाळी बिश्वनाथ मेहर याचा मृतदेह आढळून आला होता. तेव्हा तत्कालीन पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सगुण सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा बिश्वनाथचा मृतदेह दरवाजाच्या खांबाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला होता. पण त्याचे पाय जमिनीला टेकले होते. तसेच पोटावर जखमा होत्या. त्यामुळे खून करून हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना प्रथमदर्शनी आढळून आले होते. त्यानंतर बिश्वनाथ याच्या बरोबर राहत असलेल्या सर्व कामगारांची पोलिसांनी चौकशी केली. याच दरम्यान, पोलिसांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला. तसेच त्याने पोलिसांना आरोपी हिरा लोहर याने बिश्वनाथ मेहर याचा गळा आवळून चाकूने वार करून त्याला खांबाला लटकून खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार, जुने गोवा पोलिसांनी बिश्वनाथ मेहर याच्या खून प्रकरणी आरोपी हिरा लोहर याला १५ जुलै २०१६ रोजी अटक केली.
पोलिसांनी तपास पूर्ण करून १० ऑक्टोबर २०१६ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. नंतर हे प्रकरण सत्र न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत असल्यामुळे उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२२ रोजी आरोपी हिरा याला सशर्त जामीन मंजूर केला.
सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य
- मेहर खून प्रकरणी न्यायालयात सरकारी वकील अनुराधा तळावलीकर यांनी युक्तिवाद करून पोलिसांची बाजू मांडली. ती ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी हिरा लोहर याला दोषी ठरविले. सरकारी वकील अॅना मेंडोसा यांनी आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली.
- दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी हिरा याला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन वर्षांचा अतिरिक्त कारावास तर, दंड जमा केल्यास त्यातील ५० हजार रुपये मेहरच्या कुटुंबीयांना देण्याचा निवाडा जारी केला आहे.