एका रात्रीत कोट्यधीश होण्याचे व्यसन घातक

जर प्रत्येक सामन्यागणिक एखाद्या अॅपच्या माध्यमातून दोन-चार लाेक कोट्यधीश होत असतील, तर एकट्या आयपीएल स्पर्धेदरम्यान ७४ सामन्यांतून किमान तीनशे जणांचे कोट्यधीश बनण्याचे ‘ड्रिम’ पूर्ण व्हायला हवे. पण तसे निश्चितपणे घडत नाही, हे समजून घ्यायला हवे. अब्जावधी लोकांमध्ये एखादाच चेहरा समोर येतो, जो ही रक्कम जिंकतो. इतर लोक कुठे गडप होतात, हे एक मोठे कोडेच आहे.

Story: विचारचक्र | सचिन खुटवळकर |
26th May 2023, 11:48 pm
एका रात्रीत कोट्यधीश होण्याचे व्यसन घातक

समजा मी तुम्हाला सांगितले की, ‘तुम्ही मला अ​निश्चित काळासाठी दररोज किमान ५० रुपये देत जा. त्या बदल्यात मी तुम्हाला कधी तरी एक कोटी रुपये देईन. किंवा तुम्ही नशीबवान नसाल, तर ते एक कोटी रुपये तुम्हाला मिळणारही नाहीत. आणि हे दररोज मला दिले जाणारे पैसे तुम्हाला परत मिळणारही नाहीत.’ कुठलाही माणूस यावर, ‘असे रोज रोज ५० रुपये द्यायला मी वेडा आहे का? ज्यात एक कोटी रुपये मिळण्याची शाश्वती ९९ टक्के नाहीच आहे,’ असे सांगून वेड्यात काढेल आणि पैसे देणार नाही. पण सध्याच्या चंगळवादी जगात अशी बिनडोक उधळपट्टी करणारे आपल्या अवतीभोवती शेकडोंनी सापडतील. त्याला ‘फॅन्टसी गेम्स’ असे गोंडस नाव दिले गेले आहे.            

सध्या आपल्या देशात २०० पेक्षा जास्त ‘लोकप्रिय’ फॅन्टसी गेमिंग कंपन्या कार्यरत आहेत आणि रोज त्यात भर पडत आहे. एका रिपोर्टनुसार, अशा कंपन्यांची संख्या ९००च्या आसपास आहे. कधी क्रिकेट, कधी फुटबॉल, कधी पत्त्यांचा खेळ, तर कधी सापशिडीसारख्या ऑनलाईन खेळात मालामाल होण्याची स्वप्ने दाखवून ही लुबाडणूक राजरोसपणे सुरू आहे. या बाबतीत काहींनी न्यायालयांमध्ये धाव घेऊन हा घातक ‘खेळ’ आवरण्याची विनंती केली. मात्र ‘हा जुगार नसून त्यात कौशल्याचा भाग असल्याने तो खेळाचाच प्रकार असल्याचे गृहीत धरावे,’ असे म्हणून न्यायालयीन यंत्रणांनी हात वर केले. यामुळे फॅन्टसी अॅपचा कारभार अाणखी जोमाने फोफावला आणि गोरगरिबांपासून ते कोट्यधीशांपर्यंत सर्वांचे खिसे रिकामे होऊ लागले, रिकामे होत आहेत. सर्वच वयोगटांतील लोकांना कमी कष्टात कोट्यधीश होण्याच्या आमिषाने आपल्या कह्यात घेतले आहे. आयपीएलच्या दरम्यान या अॅप्सच्या माध्यमातून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज​ आहे. यावरून फॅन्टसी गेमिंग अॅपचा सध्याच्या काळातील दबदबा स्पष्ट होतो.            

काही दिवसांपूर्वी कर्नाटकात घडलेल्या एका घटनेवरून या फॅन्टसी गेमिंग अॅपचा धोका अधोरेखित झाला. एका मुलाने ऑनलाईन गेम खेळून करोडपती होण्याच्या आमिषापोटी लाखो रुपये गमावले. या गेमच्या माध्यमातून तो पैसे काही मिळवू शकला नाही. मात्र त्यातून आलेल्या नैराश्यामुळे त्याने आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला. प्रकाशझोतात आलेली ही एकच घटना आहे. अशा किती तरी लोकांनी आपल्या कमाईचा मोठा हिस्सा कमी श्रमांत पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी उधळला असेल. या मनोवृत्तीला दोष देण्याचे कारण म्हणजे, आजच्या घडीला कष्टाची कामे करून मोठी स्वप्ने पाहण्याची वृत्ती कमी होत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येते. शिकण्याच्या वृत्तीचे, श्रमप्रतिष्ठेचे मोल अनेकांना मानवत नाही. ‘काही वर्षे खडतर प्रयत्न कर, त्यानंतर यश तुझेच असेल,’ असे सल्ले आजच्या​ पिढीला नको असतात. त्यांना कमी श्रमांत, कमीत कमी वेळेत यश मिळवून अमाप संपत्ती, मानमरातब आणि प्रसिद्धी हवी असते. तरुणाईच्या भावना इतका दुबळ्या बनलेल्या आहेत की, त्यांना कोणी सबुरीचे सल्ले दिले, जुने दाखले देऊन अधिकारवाणीने काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या भावना दुखावतात. अशा मनोवृत्तीतूनच ऑनलाईन गेमिंगचा मध्यममार्ग अवलंबला जातो आणि पैसे मिळविण्याची दिवास्वप्ने बघितली जातात.            

सर्वसामान्यांचे कोट्यधीश होण्याचे ‘ड्रिम’ पूर्ण करण्याचा दावा करणारे एक अॅप बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. फॅन्टसी गेमिंगमध्ये पहिली पसंती असणारे हे अॅप वापरणारे आपल्या अवतीभोवती अनेक जण दिसून येतील. या अॅपवरून कोणी किती रुपये जिंकले, याचा जरा आढावा घ्या. पूर्ण वर्षभर खेळूनही मोठ्या मुश्किलीने पाचशे ते हजार रुपये मिळविण्यापलीकडे काेणाची मजल गेलेली नसेल. त्याबदल्यात त्यांनी हजारो रुपये गमावलेले असतात. या अॅपची चर्चा माध्यमांतूनही अधूनमधून मोठ्या प्रमाणात होताना दिसते. कोल्हापूरच्या एका मुलाने जिंकले एक कोटी, बिहारच्या केशकर्तनकाराने जिंकले एक कोटी, अशा बातम्या कानावर पडल्या की, भलेभले चेकाळतात. जर ​निरक्षर किंवा अर्धशिक्षित माणसे या अॅपवरून कोट्यधीश होऊ शकतात, तर माझ्यासारखा सुशिक्षित का होऊ शकत नाही, हा अहंगंड एकादा पछाडला की, या अॅपच्या प्रेमातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. हे एक नशेचे नवे साधन बनले आहे. अट्टल जुगारी माणसाला जशी जुगारात हरल्यावाचून चैन पडत नाही, तशी काहीशी अवस्था या अॅपच्या मायाजालात गुरफटलेल्यांची बनली आहे. एखाद्या दिवशी क्रिकेटचा माेठा सामना नसेल आणि त्या अॅपवर कोट्यवधींची रक्कम बक्षीसस्वरूपात दिसली नाही, तर अनेकांना चैन पडत नाही, इतके गारूड या अॅपने लोकांच्या मनावर केले आहे. हीच गत रमी खेळणारे आणि इतरांच्या बाबतीत दिसून येते. कोल्हापूरमधील मुलाच्या एक कोटी जिंकण्याचे कौतुक करणाऱ्यांनी एकदा स्थिरपणे विचार करावा की, या वयाच्या मुलांना जुगार खेळायला लावणारी आपली सरकारी यंत्रणा कितपत आपल्या भविष्याबाबत गंभीर आहे?            

केंद्र सरकारने या अॅप्सच्या वाढत्या प्रभावाला नियंत्रित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र ती काही उपयोगाची नाहीत. सिगारेट किंवा गुटख्याच्या पाकिटावर कॅन्सरमुळे तोंड कुजलेल्या माणसाचा फोटो लावून जशी या दोन्ही उत्पादनांची विक्री घटत नाही, तोच प्रकार या मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत दिसून येतो. एका बाजूला जुगार, सट्टेबाजी बेकायदा आहे म्हणायचे आणि दुसरीकडे, ऑनलाईन जुगार हा कौशल्याचा खेळ आहे, असे म्हणायचे. या दुटप्पीपणातून या नव्या व्यसनाला पायबंद घालण्यात सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्याचेच दिसून येते. सरकारला या माध्यमातून बक्कळ रक्कम करस्वरूपात मिळत असते. त्यामुळे हजारो कोटींवर पाणी सोडून सरकारी यंत्रणेकडून या जुगारावर नियंत्रण आणले जाईल, अशी अपेक्षा धरणे सयुक्तिक होणार नाही. तरीही या चक्रव्यूहातून युवा पिढी वाचवायची असेल, तर ऑनलाईन गेमिंगसंबंधी कठोरात कठोर नियम, पैसे गुंतविण्यावरील मर्यादा, वयोमर्यादेचे निकष आदी गोष्टींवर सरकारी यंत्रणांनी विचार करायला हवा. त्याव्यतिरिक्त प्रत्येक घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आपल्या मुलांना असे व्यसन तर लागले नाही ना, याची सतत चाचपणी करावी. हातातून वेळ निघून जाण्यापूर्वी ज्यांनी अशा गेम्सच्या नादी लागून हजारो, लाखो रुपये गमावले आहेत, त्यांनी स्वत:ला तर सावरावेच, शिवाय इतरांनाही हा धोकादायक सापळा कसा घातक ठरू शकतो, याबाबत सतर्क करावे. एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, जर प्रत्येक सामन्यागणिक एखाद्या अॅपच्या माध्यमातून दोन-चार लाेक कोट्यधीश होत असतील, तर एकट्या आयपीएल स्पर्धेदरम्यान ७४ सामन्यांतून किमान तीनशे जणांचे कोट्यधीश बनण्याचे ‘ड्रिम’ पूर्ण व्हायला हवे. पण तसे निश्चितपणे घडत नाही, हे समजून घ्यायला हवे. अब्जावधी लोकांमध्ये एखादाच चेहरा समोर येतो, जो ही रक्कम जिंकतो आणि त्याची बातमी होते. इतर लोक कुठे गडप होतात, हे एक मोठे कोडेच आहे. किंबहुना गेमिंग अॅपच्या मायाजालात हे विजेते त्यांचे स्वत:चेच कर्मचारी/मालक असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कष्टाची मीठभाकरी हीच खरी, हे आपल्या जुन्याजाणत्यांचे तत्त्व लक्षात घ्या आणि या व्यसनाला मोबाईलमधून आणि तुमच्या आयुष्यातून कायमचे हद्दपार करा!