आधुनिक तंत्रज्ञान- समस्या की समाधान

आजच्या या स्पर्धात्मक युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली कामे सहजरीत्या काही तासांऐवजी काही सेकंदात पूर्ण होत असली तरी दुसऱ्या बाजूने या तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या अनेक समस्यासुध्दा नजरअंदाज करता येत नाहीत.

Story: पालकत्व । पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
26th May 2023, 11:29 pm
आधुनिक तंत्रज्ञान- समस्या की समाधान

मोबाईल, लॅपटॉपसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. घरातील गरजू सामानाच्या खरेदीपासून ते भारतात कुठेही राहून एकमेकांशी सहज संपर्क आपण या तंत्रज्ञानाच्या माध्यतून साधू शकतो. पण त्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर होत आहे का यावर विचार करणे गरजेचे आहे. कुठल्याही कार्याने आपली मर्यादा ओलांडली की त्याचे दुष्परिणाम कालांतराने दिसतातच. विशेषत: मुलांच्या बाबतीत हे तंत्रज्ञान अती धोकादायक ठरत आहे. 

मोबाईल, लॅपटॉपमुळे मुले एकाकी होऊन त्यांना अंगणातल्या खेळांचा विसर पडलेला आहे. तंत्रज्ञानासोबत राहता राहता ती स्वत: एका यंत्रात परिवर्तीत होत आहेत असे तुम्हाला वाटत नाही का? मुद्दाम विचार करा. पालक म्हणून हा विषय आपल्याकरीता नक्कीच चिंतेचा विषय आहे. माता पित्याने जर काही मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले, तर नक्कीच आपण मुलांना तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्यापासून वाचवू शकतो.

मुलांसाठी आदर्श बनणे

मुले नेहमीच अनुकरणप्रिय असतात व सर्वात प्रथम ती पालकांचे निरीक्षण करून अनुकरण करतात. त्यामुळे जर आपल्याला त्यांची मोबाईलची सवय कमी करायची असेल तर नक्कीच सर्वात प्रथम आपण आपल्या सवयी बदलायला हव्या. एका मुलासमोर जर त्याचे माता पिता सतत मोबाईलवर व्यस्त असतील तर मूलसुध्दा नक्कीच त्या मार्गावर चालेल. मी पालकांवर कुठलीही टीका करत नाही, पण हीच सत्यपरिस्थिती आहे. पालक आपल्या कार्यालयाची अनेक कामे मोबाईल लॅपटॉपवर करतात. पण मुलांना हा मुद्दा समजत नाही. त्यामुळे मुलांसोबत असताना पालकांनी आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईलला न देता मुलांना द्यावा.

मुलांचे योग्य हट्ट पुरवा

अनेकदा काही हट्टी स्वभावाची मुले आपल्या भोळ्या माता पित्याकडून मोबाईल मिळवण्याकरीता जीवालासुध्दा धोका निर्माण करण्याची धमकी देतात. अशा परिस्थितीत माता पिता घाबरून मुलांच्या हातात कमी वयातच मोबाईल देतात. अशी चूक न करता, मुलांना मोबाईलचे फायदे व तोटे पालकांनी सांगावे. त्यांना स्वत: ही जाणीव व्हायला हवी, की मोबाईल हातात घेण्याचे त्याचे हे योग्य वय नाही. पालक या नात्याने मुलांचे एक हास्य माता पित्याकरीता सर्वस्व असते पण त्यामुळे मुलांना कुठल्याही प्रकारचे नुकसान होता कामा नये याची खबरदारी घ्यावी.

मुलांना अंगणातील खेळांमध्ये गुंतवणे

क्रीडा म्हणजे केवळ मनोरंजनच नव्हे तर, योग्य व्यायामसुध्दा आहे. खरा खेळ तोच ज्यामुळे आपल्या शरीराला योग्य व्यायाम घडेल. पालक आपल्या मुलांना घेऊन घरातील अंगणात किंवा कुठेही बागेत खेळायला घेऊन जाऊ शकतात, ज्यामुळे मोबाईलवरच्या खेळांचा त्यांना विसर पडेल व मुले खऱ्या खेळांमध्ये रंगून जातील.

काटेकोरपणे नियम बनवणे

घरातील मुलांना मोबाईलच्या वापरासाठी नियम असणे अत्यंत गरजेचे आहे. जर त्यांनी मोबाईल वापरला तर तो कमीतकमी दिवसातून फक्त पाच ते दहा मिनिटांकरीताच योग्य आहे. ते सुध्दा जर मोबाईलचा सदूपयोग होत असेल तरच. मोबाईलची वाट सोडून आता मुलांना वाचनालयाची वाट दाखवली पाहिजे.

आपल्या हातातच आपल्या मुलांचे भविष्य आहे, ज्याला आपणच आकार द्यायला हवा.