स्तनपान करताना...

आईचे दूध बाळासाठी अमृतासमान असते आणि स्तनपान बाळाच्या शारीरिक तसेच बौद्धिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते हे सगळ्यांनाच माहीत आहे. अगदी आपल्यालाही स्तनपानाबद्दल बरंच काही ज्ञात असतं पण जेव्हा प्रत्यक्षात आई झाल्यावर हे ज्ञान वापरण्याची वेळ येते, तेव्हा मात्र आपण अगदी गांगरून जातो. अशा वेळेस मदत घेण्यात काहीच चुकीचे नसते. कारण आपला दिनक्रम, प्राधान्यक्रम बदलून गेल्याने सगळ्या स्त्रियांना सुरुवातीला तडजोड करणे कठीण जाते. पहिल्यांदा आई झालेल्या स्त्रियांना संयमाने स्तनपानाचे कौशल्य आणि योग्य ज्ञान शिकावे लागते. त्यामुळे आज आपण स्तनपानाबद्दल थोडीफार माहिती घेऊ.

Story: आरोग्य । डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
26th May 2023, 11:24 pm
स्तनपान करताना...

स्तनपानासाठी योग्य स्थिती 

स्तनपान देताना आई आणि बाळ दोघांची स्थिती बरोबर असणे महत्त्वाचे आहे.

क्रॉस क्रेडल होल्ड: सुरुवातीच्या काळात स्तनपानासाठी ही स्थिती चांगली. प्रसूतीनंतर लगेच बाळाची स्तनांवरील पकड योग्य ठेवण्यासाठी ही स्थिती सोपी पडते. यात खुर्चीवर ताठ बसून बाळाला पोटाशी धरून हाताच्या एका तळव्याने बाळाच्या डोक्याला आधार देऊन दुसरा हात स्तनाला आधार देण्यासाठी आणि बाळाचे तोंड स्तनाग्रांपर्यंत आणण्यासाठी वापरला जातो. 

क्रेडल होल्ड: बाळाला नीट धरण्याची सवय झाल्यावर ही स्थिती वापरतात. ताठ बसून बाळाला मांडीवर एका कुशीवर घेऊन हातांनी बाळाचे डोके, पाठ आणि नितंबाकडील भागाला आधार देऊन दुसऱ्या हाताने स्तनाला आधार दिला जातो. 

फ़ुटबाँल होल्ड: सी-सेक्शननंतर किंवा जुळ्या बाळांना स्तनपान करायचे असल्यास ही स्थिती उत्तम. बाळाला खाली आधार देऊन, बाळाचे डोके आणि मान हातात धरून बाळाला पाजायच्या बाजूने मागे बाळाला त्याचे पाय न्यायला देऊन, हाताने बाळाचे तोंड स्तनापर्यंत नेले जाते. 

साईड लाईंग (एका कुशीवर): सिझेरिअन प्रसूतीनंतर किंवा नंतर शरीर नाजूक झाले असल्यास कुशीवर झोपून खालच्या स्तनाजवळ बाळाचे डोके येईल असे बाळाला ठेवून एका हाताने बाळाच्या डोक्याला आधार देऊन मोकळ्या हाताने स्तन तोंडाजवळ नेले जाते. 

रिक्लायनिंग होल्ड: बेड किंवा सोफ्यावर आरामदायक स्थितीत बसून उशीचा आधार घेऊन पाठीचा वरचा भाग, मान आणि डोके आरामदायक स्थितीत ठेवून बाळाला पोटावर झोपवून छातीजवळ घेतले जाते. 

बाळाची पकड (लॅच) नीट असावी

स्तनपान करताना बाळाचे तोंड स्तनाग्रांना नीट लागलेले असावे आणि बाळाच्या तोंडाने स्तनाग्रे आणि त्याभोवतालचा वर्तुळाकार भाग नीट आच्छादला गेला असावा. बाळाची हनुवटी आणि नाक स्तनांना चिकटला तर बाळाचे तोंड स्तनांना नीट बसले आहे असे समजावे.

पकड नीट असली तरच दुधाचा प्रवाह नीट होतो, नाहीतर बाळ फक्त स्तनाग्रे चोखत बसते त्यामुळे स्तनाग्रांना भेगा पडून सूज येते आणि दुधाचा प्रवाह नीट होत नाही, दुधाऐवजी हवा पोटात जाऊ शकते. ज्यामुळे बाळाला गॅस किंवा कोलीक दुखणं उद्भवण्याची शक्यता असते. पकड नीट नसल्याचे लक्षात आल्यास घरातील वृद्ध किंवा प्रशिक्षित व्यक्तीची मदत घेऊन योग्य पद्धत शिकावी. 

बाळाला किती वेळ स्तनपान द्यावे?

नवजात बाळाला प्रत्येक दोन तासांनी स्तनपान करावे. स्तनपान करताना साधारणपणे एका वेळेला २०-३० मिनिटे लागू शकतात. पण ही वेळ ६० मिनिटांपर्यंत वाढू शकते. प्रत्येक बाळ वेगळे असल्याने स्तनपानास किती वेळ लागेल हे ठरवू शकत नाही. आई पाजत असतानाच बाळ झोपी गेल्यास बाळाला गुदगुल्या करा व उठवा. दुसऱ्या स्तनावर पाजायला घ्या आणि ढेकर काढा त्यामुळे बाळाची झोप उडते. 

स्तनपानाचे विशिष्ट वेळापत्रक करण्यापेक्षा बाळाच्या मागणीनुसार स्तनपान द्यावे. भूक लागल्यावर बाळ रडेल आणि मग आपण त्याला दूध पाजू असा विचार नसावा. शांत असणारं बाळ अचानक हालचाल करू लागलं, आसपासच्या गोष्टी, आपल्या हाताची बोटे तोंडात घालून चोखू लागलं तर समजावे की त्याला भूक लागली आहे. कधी कधी बाळ स्वत:हून संकेत देतं. सवयीनुसार त्याच्या वेळा समजून घेऊन त्याला दूध पाजावे व बाळाची भूक मिटेपर्यंत स्तनपान करावे.