कर्नाटक सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार

२४ आमदार मंत्रिपदाची घेणार शपथ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
26th May 2023, 10:23 pm
कर्नाटक सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार

बंगळुरू : कर्नाटक सरकारचा २७ मे रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात २४ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार व पक्ष नेतृत्वाच्या बैठकीत मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यावर सोनिया व राहुल गांधी अंतिम शिक्कामोर्तब करतील.

सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री व डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून २० मे रोजी शपथ घेतली. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांच्यासह आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

कर्नाटकात डॉ. जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज व एमबी पाटील यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. तर सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी व जमीर अहमद खान यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

कर्नाटकात लिंगायत समाज राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. काँग्रेसच्या विजयात आपला मोठा वाटा असल्याचे सांगत या समाजाने मुख्यमंत्रीपदाची मागणीही केली होती. मात्र, मुख्यमंत्री लिंगायत समाजातून झाले नसल्याने मंत्रिपदाचा मोठा वाटा लिंगायत समाजातील आमदारांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय

२२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या. याशिवाय भाजपने ६६, तर माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दलाने (सेक्युलर) १९ जागा जिंकल्या आहेत.

सिद्धरामय्या, शिवकुमार यांच्यात चुरस

सिद्धरामय्या आणि शिवकुमार मंत्रिपदासाठी आपल्या जवळच्या आमदारांची नावे पुढे करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यात आतापर्यंत खाते वाटप झालेले नाही. विविध समुदायांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन मंत्रिपदांची यादी तयार करणे आणि खात्यांचे वाटप हे काँग्रेससमोरील मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही.

हेही वाचा