मणिपूरमध्ये जाळपोळ सुरूच

संचारबंदी लागू : कुकींनी मैतेई भागात घरे जाळली

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
25th May 2023, 11:21 pm
मणिपूरमध्ये जाळपोळ सुरूच

इंफाळ : मणिपूरमधील मैतेई समुदायाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात गत ३ मे रोजी सुरू झालेला हिंसाचार वीस दिवसांनंतर पुन्हा चिघळला आहे. कर्फ्यू शिथिल झाल्यानंतर लगेचच बिष्णापूर जिल्ह्यातील ट्रोंगलाओबी गावात हिंसाचार उसळला. कुकी लोकांनी मंगळवारी येथे मैतेईंची ३ घरे जाळली. या घटनेचा बदला घेत दुसऱ्या समाजानेही ४ घरे जाळली. त्यानंतर सशस्त्र लोकांनी विष्णुपूरमधील मोइरांगच्या काही गावांवर हल्ला केला.

मोइरांग येथील मदत शिबिरातील काही जण गदारोळ सुरू असताना बाहेर आले. तेव्हा तोयजाम चंद्रमणी नामक तरुणाच्या पाठीत लागलेली गोळी छातीतून आरपार गेली. या घटनेची माहिती मिळताच आसाम रायफल्सचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मैतेई तरुणांना हुसकावून लावत हिंसाचारावर नियंत्रण मिळवले. जवानांनी कुकींचे अनेक बंकर जमीनदोस्त केले. या घटनेनंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जखमी चंद्रमणीचा नंतर मृत्यू झाला.

मंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड

हिंसाचारामुळे बिशनपूर, इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व जिल्ह्यांतील संचारबंदी अधिक कठोर करण्यात आली. मैतैई समुदायाच्या महिलांनी मंत्री गोविंद कोंथौजम यांच्या निवासस्थानी तोडफोड केली. बिष्णुपूरमधील हिंसाचारानंतर नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. इतर जिल्ह्यातही हिंसाचार झाला.

मिझोरम, नागालँड सीमेवर बंदोबस्त

मणिपूरमधील हिंसाचारानंतर ईशान्येकडील इतर राज्यांमधील चिंता वाढली आहे. मिझोराम व आसाममध्ये दहा हजारहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा म्हणाले की, मणिपूरची समस्या गंभीर आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दंगलखोरांवर कडक कारवाई करावी. मणिपूरमधील हिंसाचारामुळे नागालँडही हैराण झाले आहे. त्यांनी सीमेवर कडक बंदोबस्त ठेवला आहे.

५ बंदुकांसह शस्त्रास्त्रे जप्त, ३ अटकेत

लष्कराने सेनापती जिल्ह्यातील कांगचूप चिंगखोंग जंक्शनवर वाहनांची तपासणी केली. त्यात २ सिंगल बोअर गन व डबल बोअर गन, २ फोल्डिंग बट गन, १२ बोअरची २८० जिवंत काडतुसे, १२ बोअरच्या बंदुकीच्या ८१ राउंड, दारूगोळा, एअरगन व ५ देशी बॉम्ब जप्त करण्यात आले. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा