लखनऊला नमवून मुंबई उपांत्य फेरीत

१८३ धावांचा पाठलाग करताना लखनऊ १०१ धावांत गारद : मढवालचे ५ बळी


25th May 2023, 12:35 am
लखनऊला नमवून मुंबई उपांत्य फेरीत

न्यूज डेस्क । गोवन वार्ता            

चेन्नई : मुंबई इंडियन्स टीमने लखनऊ सुपर जायंट्स संघावर ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले होते; मात्र मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर आणि क्षेत्ररक्षणासमोर लखनऊचा डाव १६.३ षटकांतच १०१ धावांत आटोपला.

लखनऊला सर्वबाद फक्त १०१ धावाच करता आल्या. आकाश मढवाल मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मढवालने निर्णायक क्षणी लखनऊनला झटके दिले. मढवालने एकूण ५ बळी टिपले. मुंबईने शानदार क्षेत्ररक्षण करून लखनऊच्या तीन फलंदाजांना धावबाद केले. लखनऊचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून या विजयासह मुंबईने क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. २६ मे रोजी मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. गुजरात आणि मुंबई यांच्यातील विजेता संघ २८ मे रोजी अंतिम सामन्यात चेन्नईसोबत भिडणार आहे.

चेपॉकची खेळपट्टी दुसऱ्या डावात संथ होते. त्यात दव पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या जोडीला अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करता आले नाही. नवीन उल हक आणि यश ठाकूर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईची फलंदाजी ढेपाळली. मुंबईने निर्धारित २० षटकांत आठ विकेटच्या मोबदल्यात १८२ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून कॅमरून ग्रीनने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. त्याशिवाय सूर्यकुमार यादवनेही ३३ धावांचे योगदान दिले. नवीन उल हक आणि यश ठाकूर या जोडीने मुंबईच्या ७ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

मुंबईचे सलामीवीर पुन्हा अपयशी

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशन आणि रोहित शर्मा यांची जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. रोहित शर्मा अवघ्या ११ धावांवर बाद झाला, तर इशान किशन १५ धावांवर तंबूत परतला. रोहित शर्माने एक चौकार आणि एक षटकार लगावला, तर इशान किशनने तीन चौकार लगावले. दोन विकेट झटपट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.       

सूर्यकुमार आणि ग्रीन यांनी मुंबईची धावसंख्या झटपट वाढवली. दोघांनी मुंबईच्या डावाला आकार दिला. तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली; पण नवीन उल हकने ही जोडी फोडली. सूर्यकुमार यादवला ३३ धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर कॅमरून ग्रीनलाही त्याच षटकात बाद करत मुंबईला बॅकफूटवर ढकलले. कॅमरून ग्रीन याने २३ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने २० चेंडूत ३३ धावांची खेळी केली. यामध्ये सूर्यकुमार यादवने दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. कॅमरून ग्रीनने सहा चौकार आणि एक षटकार ठोकला.       

वढेराच्या खेळीमुळे मुंबईची समाधानकारक धावसंख्या

दोन विकेट झटपट गेल्यानंतर तिलक वर्माने टीम डेविडच्या मदतीने मुंबईची धावसंख्या हालती ठेवली. पण यश ठाकूरने डेविडला तंबूचा रस्ता दाखवला. डेविड फक्त १३ धावांवर बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माही बाद झाला. तिलक वर्माने दोन षटकारांच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. अखेरीस नेहल वढेराने झटपट खेळी करत मुंबईला सन्मानजक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. नेहल वढेराने १२ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २३ धावांची खेळी केली.

लखनऊचीही सुरुवात निराशाजनक

आकाश मढवालच्या भेदक माऱ्यापुढे लखनऊच्या संघाची दाणादाण उडाली.  मुंबईने दिलेल्या १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊचा संघ १६.३ षटकांत १०१ धावांत गारद झाला. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने एकाकी झुंज दिली. स्टॉयनिसने ४० धावांची खेळी केली. मुंबईकडून आकाश मढवालने लखनऊचा निम्मा संघ तंबूत धाडला. 

मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून लखनऊच्या फलंदाजांवर वर्चस्व ठेवले. डावाच्या दुसऱ्याच षटकांत सलामीची जोडी फोडण्यात मुंबईला यश मिळाले. प्रेरक मंकड ६ चेंडूत ३ धावा करून आकाश मढवालचा बळी ठरला. त्याचा झेल हृतिक शोकिनने टिपला. त्यानंतर पुढच्याच षटकात कायल मेयर्स (१८) तंबूत परतला. त्याला जॉर्डनने ग्रीनकरवी झेलबाद केले. त्यानंतर फक्त स्टॉयनिसनेच एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. समोरून एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत होते. तरीदेखील स्टॉयनिस किल्ला लढवत होता. त्याने २७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४० धावा फटकावल्या. तो बाराव्या षटकात धावचित झाला. या डावात केवळ तीनच फलंदाजांनी दुहेरी संख्या गाठली. मुंबईच्या खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररक्षण केले. लखनऊच्या तीन फलंदाजांना त्यांनी अचूक थ्रोद्वारे धावचित केले.

महत्त्वाच्या सामन्यांतच रोहित फ्लॉप     
आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा लाजीरवाणा विक्रम कायम राहिला आहे. या सामन्यात तो केवळ ११ धावा काढून बाद झाला. एलिमिनेटर किंवा क्वालिफायर यांसारख्या महत्त्वाच्या सामन्यांत संघाला कठीण परिस्थितीत ढकलून तंबूचा रस्ता धरणे हे रोहितचे नेहमीचे झाले आहे. हिटमॅन रोहितने आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये एकूण १४ डाव खेळले आहेत. या डावांत त्याने केवळ ९ च्या सरासरीने १२५ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट एकूण ८८ आहे, मात्र प्लेऑफमध्ये त्याच्या सर्वाधिक धावा फक्त २६ आहेत. आयपीएल २०२३ मध्ये रोहित शर्माचे प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे. हिटमॅनने या हंगामात १५ सामन्यांत आतापर्यंत एकूण ३२४ धावा केल्या आहेत. या काळात त्याने १३४ स्ट्राईक रेटने फक्त दोन अर्धशतके नाेंदवली आहेत. मागील हंगामही त्याच्यासाठी खूप चांगला नव्हता. धावांसाठी त्याला खूप झगडावे लागत होते.
नवीन उल हकचा भेदक मारा 
नवीन उल हकने भेदक मारा केला. नवीनने अचूक टप्प्यावर मारा करत मुंबईच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. नवीनने चार षटकांत ३८ धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि कॅमरुन ग्रीन या मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांना नवीन उल हकने बाद केले. यश ठाकूर यानेही भेदक मारा करत मुंबईच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. मोसीन खान याला एक विकेट मिळाली. कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम आणि रवि बिश्नोई यांची बळीची पाटी कोरीच राहिली.
मुंबईने या विजयासह क्वालिफायर २ मध्ये धडक दिली आहे. मुंबईची एलिमिनेटर खेळण्याची ही चौथी वेळ होती. मुंबईने याआधी २०११, २०१२ आणि २०१४ मध्ये एलिमिनेटर सामना खेळला होता. मुंबईने २०११ मध्ये एलिमिनेटरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर ४ गड्यांनी विजय मिळवत क्वालिफायर २ मध्ये धडक दिली होती. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी एलिमिनेटर जिंकण्याची कामगिरी मुंबईने केली आहे. मुंबईला २०१२ आणि २०१४ साली एलिमिनेटर सामन्यात चेन्नईकडून पराभूत व्हावे लागले होते.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत 
८ बाद १८२
लखनऊ सुपर जायंट्स : 
१६.३ षटकांत सर्वबाद १०१