सत्पुरुष फुटबॉल स्पर्धेत परेश ब्रदर्स अजिंक्य

मोरजीत आंतरग्राम स्पर्धा : बीएससी युनायटेड उपविजेता


25th May 2023, 12:20 am
सत्पुरुष फुटबॉल स्पर्धेत परेश ब्रदर्स अजिंक्य

मोरजी-कट्टेवाडा श्री सत्पुरुष क्लब फुटबॉल स्पर्धेतील चॅम्पियन परेश ब्रदर्स संघासोबत सरपंच सुरेखा शेटगावकर, उपसरपंच पवन मोर्जे, मुकेश गडेकर, अमित शेटगावकर, मच्छिंद्र शेटगावकर, विजेश शेटगावकर व इतर.      

वार्ताहर। गोवन वार्ता

हरमल : कट्टेवाडा मोरजी येथील सत्पुरुष स्पोर्ट्स क्लब आयोजित आंतरग्राम मर्यादित फुटबॉल स्पर्धेत बीएससी युनायटेड संघाचा पराभव करून परेश ब्रदर्स मोरजी संघाने स्पर्धेचे जेतेपद पटकावले.      

या स्पर्धेतील विजेत्यांना रोख ५५ हजार रुपये व चषक, तर उपविजेत्या संघाला रोख ३५ हजार रुपये व चषक बक्षीस स्वरूपात देण्यात आले. उपांत्य फेरीतील पराभूत  संघांना रोख रक्कम व चषक देण्यात आले. वैयक्तिक गटात सर्वाधिक गोल प्रणेश अश्वेकर, उत्कृष्ट बचावपटू रूपेश मोर्जे, उत्कृष्ट गोलरक्षक नेहाल मोर्जे, प्लेअर ऑफ टुर्नमेंट प्रतीक सावंत, सामनावीर शशांक अश्वेकर व उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ युनायटेड एफसी मोरजी यांना देण्यात आली.

बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुरेखा अमित शेटगावकर, तर खास निमंत्रित म्हणून उपसरपंच पवन मोर्जे, पंच मुकेश गडेकर, फटू शेटगावकर, उद्योजक मच्छिंद्र शेटगावकर, उद्योजक अमित शेटगावकर, माजी पंच रत्नाकर शेटगावकर, व्ही.जी. शेटगावकर, क्लबचे उपाध्यक्ष गोविंद शेटगावकर, क्लबचे अध्यक्ष विजेश शेटगावकर उपस्थित होते. क्लबच्या युवा व ज्येष्ठ सदस्यांनी पाठिंबा व सहकार्य दिल्याने भव्य स्पर्धा यशस्वी झाली. युवा क्रीडापटूंच्या खेळाला संधी देण्यासाठी सत्पुरुष क्लब कार्यरत असून त्याचा लाभ घ्यावा. मोरजीतील उद्योजकांनी पुढे येऊन युवा खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन माजी सरपंच, उद्योजक अमित शेटगावकर यांनी केले. यावेळी सरपंच सुरेखा शेटगावकर, उपसरपंच पवन मोर्जे, मुकेश गडेकर आदींची भाषणे झाली. सूत्रनिवेदन व्ही. जी. शेटगावकर यांनी केले. क्लबचे अध्यक्ष विजेश शेटगावकर यांनी आभार मानले.