इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार

माजी आमदाराला अटक; जाळपोळीत सहभाग असल्याचा ठपका

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
24th May 2023, 11:56 pm
इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार

इंफाळ : मणिपूरच्या इंफाळ पूर्व जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार उसळला. न्यू चेकॉन भागात शस्त्रधारी टोळक्याने दोन घरांना आग लावून दिली. माजी आमदाराने जाळपोळीच्या घटनेत सहभाग घेतल्याचे आढळून आले आहे. त्याला अटक करण्यात आली.

न्यू चेकॉन परिसरात काही व्यावसायिकांनी सकाळी आपली दुकाने उघडली. मात्र, त्यांना काही जणांनी शस्त्राचा धाक दाखवित दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यात एका माजी आमदाराचा सहभाग आहे. यानंतर संतप्त जमावाने एका शस्त्रधारी व्यक्तीस चोप दिला तर अन्य तीन जण पळून जाण्यास यशस्वी ठरले. इंफाळ पूर्व जिल्ह्यात घडलेल्या या घटनाक्रमानंतर काही स्थानिक आपल्या परिसरात हल्ला होऊ नये, यासाठी शस्त्रांच्या माध्यमातून स्वसुरक्षेसाठी सज्ज झाल्याचे दिसून आले. त्यांनी बंकर्सही उभारले. पश्चिम इंफाळ जिल्ह्यातील सिनाम खैथॉग येथे असलेले असेच काही बंकर्स सुरक्षा दलांनी हटविले. पहाटे पाच ते दुपारी दोन या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच राज्यात उद्रेक वाढू नये यासाठी दहा हजार सैन्य दलासह आसाम रायफल्सचे जवान चिता हेलिकॉप्टरद्वारे तातडीने पाठविण्यात आले आहेत.

स्थानिक महिलांचे आंदोलन

कुकी समुदायाविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवाईला तसेच जमीन अधिग्रहणास महिलांनी विरोध केला. याशिवाय म्यानमारकडून होणारी घुसखोरी रोखण्यात यावी, डोंगराळ भागात होणारी खसखस पीक लागवड थांबवावी, राज्याच्या विभाजनाची मागणी फेटाळण्यात यावी, अशा मागण्या आंदोलक महिलांनी केल्या.

शांतता राखण्याचे आवाहन

मुख्यमंत्री बिरेनसिंह यांनी मणिपूरवासीयांना शांतता राखण्यासह निष्पाक लोकांची घरे जाळू नका, असे आवाहन केले आहे. जाळपोळ झालेल्या घटनांमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पीडित व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

इंटरनेट सेवा बंद

राज्यातील सामाजिक परिस्थिती आणखी भडकू नये, यासाठी इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. राज्याबाहेर कुकी आणि मैतेई समुदायाच्या नागरिकांपर्यंत चुकीची आणि अर्धवट माहिती जाऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.